कॉंग्रेसचे आता ‘मी टू!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |

 
 
 
देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेले दिसते. मोदी हे वारंवार लष्करी कारवाईचा उल्लेख करून, आचारसंहितेचा भंग करीत आहेत, अशा तक्रारीही निवडणूक आयोगाकडे गेल्या. मोदींविरोधात तब्बल 11 तक्रारी कॉंग्रेसने नोंदविल्या. पण, आयोगाने प्रारंभी मोदींना क्लीन चिट दिल्यामुळे मग बावचळलेले कॉंग्रेसजन थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश देताना, 6 मेपर्यंत सर्व तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार एकेक तक्रार निकाली काढण्यात येत आहे. कॉंग्रेसने एवढे घाबरण्याचे कारण काय असू शकते?
त्याचे कारण स्पष्ट आहे. उरी हल्ल्यानंतर लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. तो खोटा आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला. पुरावे द्या, असा एकच धोशा लावला. म्हणजे, आमच्या लष्कराने कशा योजना आखल्या त्या उघड करा, असा याचा अर्थ. याचा लाभ पाकिस्तानला व्हावा, ही कॉंग्रेसची भूमिका. लष्कराने मग पुरावेही दिले. दरम्यान, पुलवामा हल्ल्यात आमचे 40 जवान शहीद झाले. त्या वेळी हेच कॉंग्रेसजन आणि विरोधक ऊर बडवत होते. आता कुठे गेली 56 इंचाची छाती, वगैरे टोमणे मारले. मोदी यांनी हे सर्व निमूटपणे ऐकून घेतले. वायुसेनेने ‘एअर स्ट्राईक’ करावा, असा निर्णय झाला आणि तो अंमलातही आला. आता कोणत्या तोंडाने बोलणार? मग तोसुद्धा खोटा ठरवीत पुरावे मागण्यात आले. ‘एअर स्ट्राईक’च्या वेळी आमच्या वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत पोचले. त्यावरही विरोधकांनी गदारोळ केला. पण, 30 तासांच्या आत पाकिस्तानला अभिनंदन यांची सुटका करणे भाग पडले. त्या वेळी सारा देश जल्लोशात बुडून गेला. पुन्हा कॉंग्रेसची बोलती बंद!
दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय पटलावर अनेक घटनाही घडल्या. त्यातील ठळक म्हणजे, कुख्यात दहशतवादी क्रूरकर्मा मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापक सुरक्षा परिषदेते घेतला. गेल्या कित्येक वर्षांची मागणी मान्य झाली. विशेष म्हणजे, 10 वर्षे आडमुठेपणाची भूमिका घेणार्या, नकाराधिकार वापरणार्या चीननेही मसूद अझहरच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यामुळे कॉंग्रेसजन अधिकच चवताळले. भारतात ऐन निवडणुका सुरू असताना, असा निर्णय झालाच कसा, हा पप्पूछाप प्रश्न कॉंग्रेसने विचारून आपल्या अकलेची लक्तरे वेशीवर टांगली. मोदींनी त्यावर टिप्पणीही केली. हा निर्णय घेताना, कॉंग्रेसला विचारून संयुक्त राष्ट्रसंघाने निर्णय घ्यायला हवा होता का? असा तो प्रश्न होता. चोहोबाजूने कॉंग्रेस तोंडघशी पडत असतानाच, निवडणुकीचे चार टप्पे संपले. या निवडणुकीबाबत विविध वाहिन्यांनी आणि राजकीय पंडितांनी आपापले निष्कर्ष काढले. त्यात काही गैर नाही. ते त्यांचे कामच आहे. पण, एका गोष्टीमुळे कॉंग्रेसजन घाबरले. या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार्या नवयुवकांची संख्या दीड कोटी आहे. यापैकी बहुतेक युवकांनी आणि सामान्य नागरिकांनीही देशाच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य दिले. हे दीड कोटी नवमतदार जर मोदींच्या बाजूने उभे राहिले, तर आपले कसे होणार, या भीतीने त्यांना ग्रासले. उपायही नव्हता. मग हळूच एक पत्रपरिषद घेण्यात आली. प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हीही संपुआच्या काळात सहा वेळा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते, पण त्याचा बोभाटा केला नाही. त्याचा राजकारणासाठी वापर केला नाही. यातही ते पकडले गेले. हे विधान करताना, भारतीय लष्कराने, सर्जिकल आणि एअर स्ट्राईक हे खरे होते, हे त्यांनी मान्य केले. अन्यथा आम्हीही केले होते, असे ते म्हणाले नसते. पण, दुसर्यांदाही ते पकडले गेले. 2 डिसेंबर 2018 रोजी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी असे विधान केले होते की, आम्हीही तीन सर्जिकल स्ट्राईक केले होते. आता कॉंग्रेसवाले म्हणत आहेत, सहा केले. कोण खरे बोलत आहे? त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष की प्रवक्ते?
अनेकदा खोटेपणा पकडल्या गेल्यानंतरही त्यांची गुर्मी उतरली नाही. ती लष्करातील उच्च पदस्थ अधिकार्यांनी उतरविली. अगदी पहिली प्रतिक्रिया आली ती केंद्रीय मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्याकडून. सीमेवर तैनात आम्ही होतो, आम्हाला माहीत आहे काय झाले ते. त्या वेळी संपुआ सरकारची भूमिका कशी कचखाऊ होती, यावरही त्यांनी बोट ठेवले. पण, दुसरी प्रतिक्रिया अतिशय भक्कम होती. ती दिली, लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी. संपुआच्या काळात ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल, असे काहीही घडले नाही. एलओसीवर काही छोट्या घटना घडल्या, पण त्यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणता येणार नाही. पहिल्यांदा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे ध्वस्त करण्याची अनुमती दिली. अशी अनुमती यापूर्वी कधीच दिली गेली नाही. याच ले. ज. हुडा यांच्या नेतृत्वात सर्जिकल करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर आपल्या सीमांचे रक्षण कसे करता येईल, याचा एक अहवाल कॉंग्रेसकडून याच ले. ज. हुडा यांनी तयार करून दिला आहे. त्यामुळे हुडा यांच्या विधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका माजी लष्करप्रमुखांचीही प्रतिक्रिया आली- ‘‘संपुआच्या काळात अगदी लहानसहान चकमकी तेवढ्या घडल्या. पण, पहिल्यांदा पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारने घेतली. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते.’’
आणखी बर्याच माजी लष्करी अधिकार्यांच्या प्रतिक्रिया आल्या. पण, वरील दोनच प्रतिक्रिया कॉंग्रेसचा खोटेपणा उघड करण्यासाठी पुरेशा आहेत. कॉंग्रेस आणि विरोधक जर आमच्या लष्कराचा अपमान करीत असतील, त्यांचे मनोबल खच्ची करीत असतील, तर त्याला त्याच दमदारपणे उत्तर देण्याची गरज होती. कोणतेही सरकार असो, त्याने हेच केले असते. मग मोदींनी गैर काय केले? वस्तुस्थिती जनतेसमोर यावी यासाठी मोदींनी सत्यपरिस्थिती जनतेसमोर मांडली तर त्यात चुकीचे काय? म्हणजे आम्ही लष्करावर संशय घेऊन त्यांचा अपमान करू, त्यांचे मनोबल खच्ची करू. त्यासाठी कुणीही आम्हाला काहीही म्हणू नये. मोदींनी मात्र सैन्याचा उल्लेख केला तर ते दोषी. हा कुठला न्याय? याला म्हणतात, चोरी और उपरसे सीनाजोरी! मोदींनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले की, अजूनही माझी छाती 56 इंचांची आहे. हेमराजचे शिर पाकिस्तानी सैन्याने कापून नेले असता, डॉ. मनमोहनिंसग यांनी पंतप्रधान असताना असे विधान केले होते की, ते अतिरेकी होते, पाकिस्तानी सैनिक नव्हते. हे ऐकून समस्त भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात पोचली होती. आपल्या जवानांप्रती हीच होती का कॉंग्रेसची संवेदनशीलता? तेव्हा का घुसले नाही पाकिस्तानी हद्दीत? तुम्हाला कुणी रोखले होते? दम नव्हता, असे सरळ म्हणा ना. आज मोदींनी तो दम दाखवून दिला आहे. एक मात्र बरे झाले. कॉंग्रेसने मोदींविरोधात तक्रारी करून हा विषय सतत जिवंत ठेवला आहे. त्यासाठी समस्त कॉंग्रेस नेत्यांचे अभिनंदनच करायला हवे. राहुल गांधी आगे बढो...
@@AUTHORINFO_V1@@