दुष्काळावरुन राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |


 

 

सध्या देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच वैशाखवणव्यामुळे अर्धाधिक देश अक्षरशः होरपळून निघत आहे. दुसरीकडे, निवडणुकीमुळे विविध पक्षातील राजकीय कार्यकर्ते सध्या जोशात असले तरी देशातील बळीराजा मात्र दुष्काळाचे गणित सोडविण्यात मग्न आहे. पंचवार्षिक निवडणुकीमुळे माध्यमांमधूनही दुष्काळ काहीसा दुसऱ्या स्थानावर गेला असून काही ‘दूरदृष्टी’ असणाऱ्या राजकारण्यांना मात्र या दुष्काळातही ‘उद्याचे राजकारण’ दिसत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका अवघ्या चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने काही सत्तातुर राजकीय पक्ष कमालीचे दक्ष झाले आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकताच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा झटपट आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांनी दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा, असे फर्मान काढले. निवडणुकीनंतर सालाबादप्रमाणे श्रमपरिहारासाठी कोणीही विदेशातील गारव्याचा आनंद घ्यायला जाऊ नये, असेही त्यांनी सर्वांना बजावले म्हणे! निवडणूक कोणी लढवावी, कोणी लढवू नये, याबाबत पक्षातील काहीजणच त्यांचे ऐकत असले तरी पवारांची ही दुष्काळाबाबतची सूचना मात्र सर्वजणांनी शिरसावंद्य मानायचे ठरवल्याचे समजते. पक्ष बैठकीच्या त्याच दिवशी रात्री राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुष्काळात करावयाच्या उपाययोजनांबद्दल निवेदनही दिले. सत्तेवर नसणाऱ्या नेत्यांना मुळात प्रशासन हाकण्याचे काही अधिकार नसताना, ते काही करू शकत नसताना हा दुष्काळी बैठकीचा खटाटोप कशासाठी? यातून नक्की काय साध्य होणार? दुष्काळग्रस्तांच्या हाती काय पडणार? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ एप्रिलचा राज्यातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा उलटल्यानंतर आचारसंहिता शिथिल करण्याबाबतच्या धडपडीला सुरुवात केली. कोणत्याही चुळबुळीशिवाय केल्या गेलेल्या या धडपडीला आता यश आलेले दिसत असून आचारसंहिता शिथिल करण्याला निवडणूक आयोगाने अखेर परवानगी दिली. त्यामुळे दुष्काळ निवारणार्थ सरकारी पातळीवरील उपाययोजनांना निश्चितच गती प्राप्त होईल आणि बळीराजाला दिलासा मिळेल, हे नक्की.

 

मातीतून शेती की शेतीची माती?

 

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर ‘देशातील शेतीबद्दल ओढ, आस्था व अभ्यास असणारे नेते’ अशी प्रतिमा रंगविण्यात शरद पवार नेहमीच यशस्वी ठरले. काही प्रमाणात ते खरेही आहेच. परंतु, तब्बल दहा वर्षे कृषी खात्याचे मंत्री असणाऱ्या शरद पवार यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात शरद पवार यांना माध्यमांनी किंवा विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत प्रश्न विचारला असता ते चिडत, डाफरत, वैतागत. महाराष्ट्राच्या शेतीबद्दल पवारांना त्या काळात विचारले असता त्यांनी, “मी राष्ट्रीय नेता आहे, राज्याच्या प्रश्नांबाबत राज्यातील राज्यकर्त्यांना विचारा,” असे कैकवेळा सांगितले होते. त्यावेळीही कित्येकवेळा दुष्काळजन्य परिस्थिती होती. पण, शरद पवारांनी काही अपवाद वगळता ठोस काही केल्याचे समोर आले नाही. उलट ते त्यावेळी आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या राजकारणात व्यग्र होते. त्यावेळी संपुआचे व राज्यातील जवळजवळ सर्व नेते दर मे महिन्यात विदेशातील गारव्याचा आनंद घेतच होते. आता मात्र विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे ‘पवार आणि कंपनी’ला दुष्काळग्रस्तांचे चटके प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. मात्र, आता महाराष्ट्रासारख्या राज्यातील मतदार बऱ्यापैकी परिपक्व झाला आहे. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या व ‘शेतकरी’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनीच राज्यातील शेतीची माती केली. याउलट रूढ अर्थाने शेतकरी नसणाऱ्या नेत्यांनीच शेतकऱ्यांना साहाय्य करण्याची भूमिका घेतली. आजतागायतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली, हे सर्व लोकांसमोर आले आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील विविध खेळी सर्वांना माहीत झाल्याने हल्ली पवारांच्या डावपेचांना फार अपवादानेच यश मिळाल्याचे दिसते. राज्य सरकारच्या प्रयत्नानंतर आचारसंहिता शिथिल होणार, याची अगोदरच कुणकुण लागल्याने पवारांनी छोटेखानी दुष्काळ परिषद घेऊन नेत्यांची शिकवणी घेतल्याचे समजते. पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना विदेशात न जाण्याबाबत दम दिल्याने आता कुठल्या पक्षातील कोणकोणते नेते परदेशी गेले, याच्या तपशीलवार बातम्या माध्यमांमध्ये झळकण्याचीही दाट शक्यता आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण जरी पणाला लावले असले, तरी त्यांच्या यावेळच्या इटली दौऱ्यावर मात्र टीका होण्याची दाट शक्यता आहेच.

 

- शाम देऊलकर

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@