हतबल विरोधकांचे आरोपांचे बाण निष्प्रभ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019   
Total Views |



भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचा प्रचाराचा धूमधडाका सुरू असतानाच हतबल झालेले विरोधक पंतप्रधानांच्या भाषणांवरून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, त्यामध्येही त्यांना यश मिळत नसल्याचेच दिसते आहे. तसेच इव्हीएमचा हुकूमी पत्ताही विरोधकांनी आतापासूनच राखून ठेवल्याचे दिसतेय.


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता मतदानाचे फक्त दोन टप्पे उरले असून त्यासाठी येत्या दि. १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील लोकसभेच्या ५१ जागांसाठी मतदान झाले. या ५१ जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या होत्या, तर संयुक्त पुरोगामी आघाडीस अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. सोमवारच्या टप्प्यानंतर लोकसभेच्या ४२५ जागांसाठीचे मतदान पूर्ण झाले असून आता उर्वरित ११८ जागांसाठी मतदान होणे बाकी आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचा प्रचाराचा धूमधडाका सुरू असतानाच हतबल झालेले विरोधक पंतप्रधानांच्या भाषणांवरून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, त्यामध्येही त्यांना यश मिळत नसल्याचेच दिसते आहे. तसेच इव्हीएमचा हुकूमी पत्ताही विरोधकांनी आतापासूनच राखून ठेवल्याचे दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध प्रचारसभांमधील भाषणांवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींकडे आयोगाकडून लक्ष दिले जात नसल्याचे कारण पुढे करून काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. निवडणूक आयोग मोदींच्या विरुद्धच्या तक्रारींबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोपही करण्यात आले. खरे म्हणजे पंतप्रधानांच्या आक्रमक भाषणांमुळे निष्प्रभ ठरलेल्या विरोधकांचा आयोगाकडे तक्रार करून त्यांच्या आक्रमक प्रचारावर निर्बंध घालण्याचा विचार होता. पण, निवडणूक आयोगाने मोदींविरुद्ध ज्या तक्रारी केल्या होत्या, त्यांची दखल घेतली आणि आयोगाने पंतप्रधान मोदींना ‘क्लीन चीट’ दिली. आयोग पंतप्रधानांवर काही निर्बंध आणेल, अशी अपेक्षा असलेले विरोधक आयोगाच्या या निर्णयामुळे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. मोदींनी वायनाड मतदार संघापासून ते “आमच्याकडील अण्वस्त्रे ही काही दिवाळीत फटाके फोडण्यासाठी ठेवलेली नाहीत, इथपर्यंतची जी विधाने केली होती,” त्यामध्ये आयोगास काही चुकीचे आढळले नाही. आता आयोगाने याबाबत जो निर्णय दिला, तो एकमताने दिला नव्हता. तीन निवडणूक आयुक्तांपैकी एक निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी यातील पाच तक्रारींमध्ये मोदी यांना निर्दोष ठरविण्यास विरोध केला होता, अशा बातम्या झळकू लागल्या आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणभूमीवर येत असलेल्या अपयशाने वैफल्यग्रस्त झालेले विरोधक न्यायालयात धाव घेऊन भाजप आणि मोदी यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

 

मोदींनी प्रचारामध्ये राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करताच काँग्रेस अध्यक्ष आणि राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी, कन्या प्रियांका गांधी आणि अन्य अनेक काँग्रेस नेत्यांना संताप अनावर झाला. ‘मिस्टर क्लीन’ म्हणून काँग्रेस ज्या राजीव गांधी यांचा उदो उदो करीत होते, त्यांना नरेंद्र मोदी यांनी ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हटल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांच्यावर टीका केली. दिवंगत व्यक्तीबद्दल बोलायला नको, याची त्यांना आठवण झाली! पण, आपण देशाच्या पंतप्रधानांना वाट्टेल ते बोलत आहोत, त्यांचा उपमर्द करीत आहोत, याबद्दल त्या नेत्यांना पश्चाताप झाल्याचे अजून तरी दिसून आले नाही! बारक्या पोरांना ‘चौकीदार चोर आहे’ अशा घोषणा द्यायला लावून फिदीफिदी हसणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची व्हायरल झालेली छबी देशवासीयांनी पाहिली आहे. विद्यमान पंतप्रधानांवर असभ्य भाषेत सातत्याने टीका करणाऱ्या या नेत्यांनी आपली बुद्धिमत्ता तेव्हा कोठे गहाण टाकली होती? आपण जे करतो ते योग्य आणि दुसऱ्याने काही उघड केले की ते अयोग्य असे कसे चालेल? आपण काहीही बोलायचे आणि इतरांनी काही उघड केले की संतापायचे, असे नाही चालणार! गळाभेट आणि प्रेमाच्या भाषेमागील इंगित काय आहे, हे जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे. लोकसभेत डोळे मिचकविण्याची घटना लोक अजून विसरलेले नाहीत! आता राहुल गांधी हे किती हुशार आहेत, किती शिकलेले आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न राजीव गांधी यांचे परममित्र आणि ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांनी चालविलेला आहे. राहुल गांधी यांच्याशी आपण विविध विषयांवर केलेल्या चर्चेतून ते अतिशय हुशार आणि उच्चशिक्षित असल्याचे दिसून आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. समाजमाध्यमांवर भाजप समर्थकांकडून त्यांचा ‘पप्पू’ असा जो उल्लेख केला जात आहे, त्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. “आपल्याला राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत विश्वास वाटत आहे. ते पप्पू नाहीत. ते उच्चशिक्षित, बुद्धिमान आहेत,” आणि त्यांच्यासारख्या तरुण नेत्याची देशाला गरज असल्याचेही पित्रोदा यांनी म्हटले आहे. गांधी घराण्याची तळी उचलायचीच, असे ठरविल्यावर याशिवाय अन्य भाषेची अपेक्षा पित्रोदा यांच्याकडून कशी करणार? राहुल गांधी यांचे वारेमाप कौतुक करतानाच निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना जी ‘क्लीन चीट’ दिली आहे, त्याच्याबद्दल फेरविचार करण्याचा सल्लाही त्यांनी निवडणूक आयोगास दिला आहे.

 

प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्योजक अनिल अंबानी यांचा उल्लेख ‘क्रोनी कॅपिटलिस्ट’ असा वारंवार केला होता. त्यास अनिल अंबानी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाच्या काळात रिलायन्सला एक लाख कोटी रुपयांची कामे मिळाली होती, असे सांगून काँग्रेसच्या अपप्रचाराचे पितळ त्यांनी उघडे पाडले आहे. एकूणच निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले तरी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रचारास कणखर उत्तर देऊ न शकलेले विरोधक हतबल झाल्याचे दिसते. अजून विरोधी ऐक्य जवळपास दिसत नाही आणि पंतप्रधान कोणाला करायचे, याच्या चर्चा विरोधकांमध्ये झडू लागल्या आहेत. अशा घडामोडी घडत असतानाच इव्हीएमबद्दल विरोधकांच्या मानगुटीवर जे संशयाचे भूत बसले आहे, ते मुळीच उतरले नसल्याचे दिसून येत आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यास जनतेच्या न्यायालयात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही त्याचा आधार घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने आतापासूनच प्रारंभ केला आहे. बारामतीमध्ये आपली कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्यास तो इव्हीएममुळेच होईल, असे भाष्य करून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावरच त्यांनी संशय घेतला आहे. एकूणच विरोधी पक्षातील नेते बिथरून गेल्याने ते काहीही बोलत सुटले आहेत. दुसरीकडे, भाजपकडून काँग्रेसच्या ‘कर्तृत्वा’चा पाढा वाचला जात आहे. त्यांनी केलेल्या अनेक गैरव्यवहारांवर प्रकाशझोत टाकला जात आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे शासन असतानाच्या काळात राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदारास पाणबुड्याचे कंत्राट मिळाल्याचा पर्दाफाश भाजपने केला आहे. ‘बॅकोप्स सर्व्हिसेस’ या कंपनीशी राहुल गांधी यांचा संबंध नेमका काय आहे, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील भाजपचा आणि विरोधकांचा प्रचार लक्षात घेता भाजपच्या प्रचारापुढे विरोधक निष्प्रभ ठरत आहेत. आणखी दोन टप्पे बाकी आहेत. त्यामध्ये भाजप, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावर राळ उडविण्याचा प्रयत्न केला जाईलच. पण, कोण खरे आणि कोण खोटे याचा निर्णय लागण्यासाठी देशातील जनतेला २३ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. घोडामैदान जवळच आहे. पाहू या काय होते ते!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@