शरद पवार करताहेत दुष्काळाचे राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2019
Total Views |



कोल्हापूर : राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परंतु, याची माहिती न घेता शरद पवार आता दुष्काळाचेही राजकारण करीत आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात रविवारी केली. ते एका पत्रकार परिषेदेत बोलत होते. राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या कामांची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. पुर्वीच्या आघाडी सरकारपेक्षा विद्यमान युती सरकार कशाप्रकारे अधिक सक्षमपणे काम करीत आहे याचे विवेचन केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकताच सोलापूर भागात दुष्काळाची पाहणी करून राज्य सरकार दुष्काळाच्या प्रश्नांबाबत बाबत गांभीर्य नसल्याची टीका केली. त्याला आज मंत्री पाटील यांनी कोल्हापुरात उत्तर दिले.

 

शरद पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्याने माहिती न घेता बोलण्याची आपणाला चिंता वाटत आहे, असा उल्लेख पाटील यांनी केला. ते म्हणाले की, दुष्काळ निवारणात राज्य शासनाने कसलीही कसूर ठेवलेली नाही. ऑक्टोबर महिन्यापासूनच उपाययोजना केल्या आहेत. उलट, पूर्वीच्या शासनापेक्षा अधिक मदत केली जात आहे. आघाडी सरकारच्या काळात चाऱ्यासाठी लहान-मोठ्या जनावरांना अनुक्रमे २० व ४० रुपये प्रतिदिन दिले जायचे आता ही रक्कम ४५ आणि ९० रुपये इतकी वाढवली आहे. याचे आकडे उपलब्ध असताना पवार माहिती न घेता विधान करीत असल्याने त्यांच्यावर पाटील यांनी टीका केली. याचवेळी सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज असल्याच्या पवार यांच्या सुचनांचेही स्वागत केले जाईल, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

 

दुसरीकडे मंत्रालयातील तोडलेल्या पायऱ्यांबाबत ते म्हणाले की, मंत्रालयाच्या पायऱ्या आघाडी सरकारने बांधल्या होत्या. मात्र, त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीच्या असल्याचा गृहविभागाने आणि त्रिसदस्यीय आयएएस अधिकाऱ्यांच्या समितीने अहवाल दिल्याने हटवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरणही पाटील यांनी यावेळी दिले.

 

राज ठाकरे यांच्यावरही निशाणा

 

समाज माध्यमातून टीका करणारी पोस्ट केल्याच्या कारणावरून मारहाण करण्याची मनसेची पद्धत चुकीची आहे, अशी टीका यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. तर, बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन चालणारे राज ठाकरे बाळासाहेबांनी कधीही मदत न केलेल्या काँग्रेसच्या बाजूने कसे काय जात आहेत? असा सवालही त्यांनी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@