कॉंग्रेसची पडझड...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2019
Total Views |

सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातून कॉंग्रेस अजूनही सावरलेली नाही. पक्षाध्यक्ष राहुल गांधी सध्या कुठेच दिसत नाहीत. दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार्या नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ते शपथविधी समारंभाला जरूर उपस्थित राहिले, पण सार्वजनिक ठिकाणचे त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. पराभवानंतर कॉंग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, नेहमीप्रमाणेच तो फेटाळण्यात आला. असे असले तरी राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. पक्षाला गांधी घराण्याबाहेरचाच अध्यक्ष हवा, या भूमिकेवर ते ठाम आहेत. खरेतर त्यांनी असे करायला नको. पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहेच, आता पक्षकार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याचे, तसेच पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. असे असताना ते जबाबदारीपासून पळ काढणार असतील, तर कॉंग्रेसमुक्त भारताचे मोदींचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, यात शंका नाही.
काल कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रजणजितिंसह सुर्जेवाला यांनी ट्विट करून जी माहिती दिली, ती तर कॉंग्रेस पक्षाची पराभूत मानसिकता स्पष्ट करणारीच म्हटली पाहिजे. पुढला महिनाभर कॉंग्रेसचा कुठलाही प्रवक्ता कुठल्याही वृत्तवाहिनीवर चर्चेत भाग घेण्यासाठी जाणार नाही, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कॉंग्रेसची ही कृती जबाबदारीपासून पळ काढणारीच मानली पाहिजे. निवडणुकीत जय-पराजय हा होतच असतो. आज सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी कधीकाळी फक्त दोन जागांवर निवडून आली होती. पण, म्हणून प्रश्नांना सामोरे जाणे त्या पक्षाने सोडले नव्हते. भाजपाच्या आधी जनसंघ अस्तित्वात होता. जनसंघाला तर लढण्यासाठी उमेदवारही मिळत नसत. जनसंघाचे लोक प्रचारासाठी कुठे गेलेत, तर त्यांचा उपहास केला जात असे. अनेक ठिकाणी तर लोक त्यांच्यावर दगड फेकायचे. अतिशय कठीण परिस्थितीत जनसंघाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष टिकवून ठेवला आणि वाढविलाही. परिस्थितीसमोर न डगमगता जनसंघाने धैर्याने पराभवाचा सामना केला, त्याचे फळ आज भाजपाला मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात भाजपाचीही अवस्था चांगली नव्हती. लोकसभेत दोनच जागा असणारा हा पक्ष आज 303 जागा मिळवून देशात क्रमांक एकचा बनला आहे! या यशामागे अनेकांचे कठोर परिश्रम आहेत, अनेकांची साधना आहे, अनेकांची प्रेरणा आहे. पराभवाने भाजपाचे नेते कधी खचून गेले नाहीत, की सत्ता न मिळाल्याने निराश झाले नाहीत. कॉंग्रेसने भाजपाचा हा आदर्श समोर ठेवत वाटचाल करायला हवी.
नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याएवढे यश मिळाले. पण, काही महिन्यांनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या, यावेळी त्यात 8 जागांची भर पडून त्या पक्षाला फक्त 52 जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ आणि भाजपा यांच्यावर अतिशय जहरी टीका करूनही कॉंग्रेसला प्रचंड मोठे अपयश आल्याने त्या पक्षात नैराश्य येणे स्वाभाविक मानले, तरी शस्त्र टाकून सपशेल शरणागती पत्करणे देशातल्या या सगळ्यात जुन्या आणि घराणेशाही राबविणार्या पक्षाला शोधणारे नाही. राहुल गांधींनी खरेतर देशभर दौरे करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना धीर देणे गरजेचे आहे. पराभवाची कारणमीमांसा करून पक्ष कुठे चुकला, काय करायला हवे होते, काय राहून गेले याचा शोध घेत, सर्व राज्यांमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांपुढे जाऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम राहुल गांधी यांनी करायला हवे. पण, ते तर राजीनामा देण्यावर अडून बसले आहेत. सेनापतीच असा पळ काढणारा असेल, तर सैनिकांना लढण्याची प्रेरणा मिळेल तरी कुठून? केंद्रातली कॉंग्रेसची सत्ता जाऊन फक्त पाच वर्षे झाली आहेत आणि पुढली पाच वर्षेही कॉंग्रेस सत्तेत नसणार आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ताही 2004 साली गेली होती आणि 10 वर्षे भाजपा सत्तेपासून दूर राहिली. पण, म्हणून भाजपाने लोकांमध्ये जाणे सोडले नव्हते. भाजपाचे नेते सातत्याने लोकांमध्ये गेले, झालेल्या पराभवाची कारणमीमांसा केली, चुका सुधारल्या आणि संपूर्ण तयारीनिशी निवडणुकीला सामोरे गेले. भाजपाने निवडणुकीच्या आधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी विकासाचे जे मॉडेल राबविले, त्याची चर्चा देशभर घडवून आणली. निवडणुकीच्या आधी आणि नंतर देशभर दौरे करून भाजपाचा झंझावात निर्माण केला. कॉंग्रेसच्या सत्ताकाळात झालेले गैरप्रकार अतिशय प्रभावीपणे चव्हाट्यावर आणले आणि सुराज्य देण्याबाबत जनतेला आश्वस्त केले. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे सांगत जनतेला आपल्याकडे आकर्षित केले. ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा मोदींनी दिला होता. तो जनतेच्या पसंतीसही उतरला होता. याउलट, कॉंग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत अतिशय नकारात्मक मुद्दे पुढे करत प्रचार केला, ज्याचा मोठा फटका त्या पक्षाला बसला. आता बसला तर बसला. कारण, तो बसणारच होता. कॉंग्रेसची प्रचाराची दिशाच आधीपासून चुकत आली. सॅम पित्रोदांसारखे करंटे लोक राहुल गांधी यांनी सोबत ठेवल्यावर पराभवाशिवाय हाती काही लागणारही नव्हते.
वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा जो निर्णय कॉंग्रेसने काल घेतला आहे, तो चुकीचाच आहे. चर्चांमध्ये सातत्याने जे प्रश्न विचारले जातील, त्याला उत्तरे कशी द्यायची, राहुल गांधी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना कोणती उत्तरे द्यायची, असे अनेक प्रश्न कॉंग्रेसला पडणे स्वाभाविक आहे. पण, चर्चेपासून पळ काढण्याची भूमिका योग्य नाही. उलट, वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होत, झालेल्या चुका प्रांजळपणे कबूल करीत जनतेची माफी मागण्याचे औदार्य कॉंग्रेसने दाखविले, तर जनतेला ते अधिक आवडेल आणि पक्षापासून दूर गेलेले अनेक लोक पुन्हा पक्षाकडे परत येतील. कॉंग्रेस पक्षात जी पडझड झाली आहे, ती रोखायची असेल तर राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन आणि वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभाग थांबवून फायदा होणार नाही. हा पळपुटेपणा जनतेला आवडणार नाही. पक्षाची आज आहे त्यापेक्षाही वाईट अवस्था होईल. केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना शिव्या घालूनही काही साध्य व्हायचे नाही. स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणत, कॉंग्रेसने सकारात्मक भूमिका घेत, विकासाचा अजेंडा जनतेपुढे मांडला, तरच कॉंग्रेसला भविष्यातील निवडणुकांमध्ये यश मिळू शकणार आहे. वाहिन्यांवर चमकोगिरी करून पक्षाचे वाटोळे करणार्या प्रवक्त्यांना कॉंग्रेसने खड्यासारखे उचलून बाजूला फेकले आणि त्याऐवजी पक्षावर निष्ठा असणार्या, जनहिताचे प्रश्न जाणणार्या नेत्यांकडे वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होण्याची जबाबदारी सोपविली, तर पक्षाची प्रतिमा उजळून निघेल आणि आज जी पडझड झाली आहे, ती हळूहळू थांबेल, यात शंका नाही...
@@AUTHORINFO_V1@@