आज साजरी होणार पुन्हा दिवाळी...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

नरेंद्र मोदी आज सायंकाळी दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संपूर्ण भारताच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक असा प्रसंग आहे. संघाचा एक स्वयंसेवक आणि प्रचारक, एवढ्या बहुमताच्या सरकारचे देशाच्या इतिहासात प्रथमच नेतृत्व करणार आहे. त्यामुळे संघपरिवाराच्या आणि देशातील कोट्यवधी हिंदूंच्या दृष्टीने ही एक अतिशय आनंददायी अशी घटना आहे. त्यामुळे आज देशभर दिवाळी साजरी केली पाहिजे! लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच, नरेंद्र मोदी दुसर्यांदा पंतप्रधान होणार, याची विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सगळ्यांनाच खात्री होती. मात्र, भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेवर जागांचा पल्ला गाठेल आणि भाजपा स्वबळावर 303 जागा जिंकेल, याची खात्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहवगळता अन्य कुणालाच नव्हती. मोदी आणि शाह मात्र सतत ‘अबकी बार तीनसौ पार’चा विश्वास व्यक्त करत होते.
सुरुवातीच्या काळात पोलिसांजवळ थ्री नॉट थ्रीच्या बंदुका राहात होत्या, भाजपानेही यावेळी आपल्या थ्री नॉट थ्रीच्या बहुमताने विरोधी पक्षांना पार गारद केले आहे. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मताप्रमाणे आणि धोरणाप्रमाणे सरकार चालवता येणार आहे. मोदी आपल्या नव्या मंत्रिमंडळात रालोआतील मित्रपक्षांना सहभागी करून घेणार असले, तरी मोदी सरकारच्या कामकाजात मित्रपक्षांना अनावश्यक हस्तक्षेप करता येणार नाही. आपल्या अटींवर सरकारला झुकवता येणार नाही. मोदी देतील तितकी मंत्रिपदं आणि जी खाती देतील ती मित्रपक्षांना घ्यावी लागणार आहेत.
सरकारला बहुमत नसले तर मित्रपक्ष कशी दादागिरी करतात, पंतप्रधानांना कसे छळतात, याचा अनुभव अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात माया, ममता आणि जयललिता यांच्या रूपात देशाने घेतला आहे.
यावेळी जयललिता या जगात नाहीत, मायावती राजकीयदृष्ट्या हतबल झाल्या, मात्र ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला जेवढा त्रास देता येईल, तेवढा देण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या परीने केला. याची शिक्षा पश्चिम बंगालमधील मतदारांनी इव्हीएमच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना दिली आहे. आतातरी ममता बॅनर्जी यांना राजकीय शहाणपण येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दुसर्यांदा बहुमत मिळवून सरकारला सत्तेवर आणण्याचा बहुमान पंडित जवाहरलाल नेहरू आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांनी या देशातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. नरेंद्र मोदीच देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतील, समृद्ध आणि बलशाली बनवू शकतील, मोदींच्या मजबूत हातात देश सुरक्षित राहील, देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची देशाच्या शत्रूची हिंमत होणार नाही, असा विश्वास मतदारांना वाटला. ही मोदी यांची पंतप्रधानपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. त्यामुळेच ‘देश एकजूट ठेवणारा नेता,’ असे नरेंद्र मोदी यांचे वर्णन टाईम मासिकाने केले.
 
 
 
यावेळी संपूर्ण देशात मोदी यांची लाट नव्हती, तर त्सुनामी होती. त्सुनामीची आधी चाहूल लागत नाही, ती येऊन गेल्यावर समजते, त्सुनामी आली होती. तशी स्थिती यावेळी लोकसभा निवडणुकीत होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींच्या लोकप्रियतेची त्सुनामी आल्याचे देशाला समजले. मोदींना दुसर्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार या देशातील मतदारांनी केला होता.
आपल्या मतदारसंघात भाजपाचा वा मित्रपक्षांचा उमेदवार कोण आहे, त्याने आधीच्या पाच वर्षांत खासदार म्हणून काय दिवे लावले, याचा मतदारांनी बिलकूल विचार केला नाही. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला विजयी करायचे आहे, एवढेच या मतदाराला माहिती होते, त्यामुळे मोदींसाठी त्याने मतदान केले.
राज्यात दुसर्या पक्षाकडे सत्तासूत्रे सोपवतानाही मतदारांनी पंतप्रधानपदासाठी मात्र नरेंद्र मोदी यांनाच आपली पसंती दिली. त्यामुळे ओडिशा विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांना बहुमत मिळत पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली; तर आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसला बहुमत मिळाले. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांत भाजपाला पहिल्यांदाच लक्षणीय यश मिळाले आहे.
भाजपाला सर्वाधिक चांगले यश पश्चिम बंगालमध्ये मिळाले आहे. राज्यात दोन जागांवरून भाजपाने 18 जागांवर झेप घेतली आहे. ममता बॅनर्जी यांचा गड भाजपाने लोकसभा निवडणुकीत उद्ध्वस्त केला आहे. दोन वर्षांनी राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना घरी बसवत बंगालीबाबूंनी भाजपावर विश्वास दाखवला, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ असे भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर मतदारांनाही वाटू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर व्हॉटस्अॅपवर एक संदेश फिरत होता- निवडून आलेले खासदार पंतप्रधानांची निवड करतात, हे आम्ही राज्यशास्त्रात शिकलो होतो, पण पंतप्रधान देशभरातील खासदारांना निवडून आणतात, हे पहिल्यांदाच पाहिले! असा तो वास्तव दर्शविणारा संदेश होता. हा संदेश म्हणजे यावेळच्या लोकसभा निवडणुकीची वस्तुस्थिती होती.
नरेंद्र मोदी आज दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, आजचा दिवस हा देशात दुसर्यांदा दिवाळी साजरी करण्यासारखा आहे. याआधी एकदा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी देशाने दिवाळी साजरी केली. मोदी शपथ घेत असताना देशवासीयांनी आपल्या घराच्या दारात पणत्या लावाव्या, घरावर रोषणाई करावी, फटाके फोडावेत, मिठाई वाटावी, असे आवाहन अन्य एका व्हॉटस्अॅप संदेशातून करण्यात आले. व्हॉटस्अॅप संदेशातून देशातील लोकांच्या भावना कळत असतात.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात, पंतप्रधान असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर शिव्यांचा वर्षाव करण्यात आला, त्यांच्यासाठी अतिशय खालच्या भाषेचा उपयोग करण्यात आला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी बदलले आहेत. या प्रचंड विजयाने त्यांना आणखी नम्र केले आहे. फळांनी लदबदलेले झाड जसे झुकते, तशी स्थिती या प्रचंड जनादेशाने मोदी यांची झाली आहे. त्यामुळेच झाले गेले विसरून आपण एका नव्या युगाचा प्रारंभ करू असे मोदी, विरोधकांना उद्देशून म्हणाले. एकप्रकारे त्यांनी विरोधकांना त्यांच्या भाषेसाठी माफ केले आहे. मोदी यामुळे आणखी मोठे झाले आहेत. जननायक असलेले मोदी यावेळी देशवासीयांच्या दृष्टीने महानायक झाले आहेत. यावेळी त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ असा नारा दिला आहे. प्रामुख्याने अल्पसंख्य समुदायाच्या मनात अन्य पक्षांनी जो भीतीचा बागुलबोवा उभा केला, तो कसा खोटा आहे, हे सांगून अल्पसंख्यकांनाही राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याची नवी जबाबदारी मोदींनी नव्या खासदारांकडे सोपविली आहे. त्याचे प्रतििंबग लगेच प. बंगालमध्ये उमटले. अनेक मुस्लिम नगरसेवक हे भाजपात आले, ते याच नार्यामुळे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचंड बहुमताने मोदी यांच्यावरील जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत, या अपेक्षांची पूर्तता मोदी यांना करावी लागणार आहे, लोकांच्या अपेक्षांना उतरावे लागणार आहे. जाहीरनाम्यातील आश्वासनांची कालबद्ध अंमलबजावणी करावी लागणार आहे. याशिवाय जे मुद्दे जाहीरनाम्यात नव्हते, त्यांना यावेळी स्पर्श करावा लागणार आहे. राममंदिराबाबत लवकरात लवकर ठोस अशी भूमिका घ्यावी लागणार आहे, जम्मू-काश्मीरबाबत घटनेतील 35 ए तसेच 370 कलम रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. समान नागरी कायदा तसेच गोहत्याबंदीबाबत कायदा करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येत्या वर्षभरात राज्यसभेतही भाजपा बहुमतात येणार आहे, त्यामुळे राज्यसभेत विरोधक विधेयक अडवतात, असे म्हणण्याची संधी भाजपाला आणि मोदी सरकारला यापुढे मिळणार नाही. आता कोणतीही कारणे सांगण्याची सोय भाजपाला नाही. या सुवर्णसंधीचा उपयोग भाजपाला आपला अजेंडा राबवण्यासाठी करावा लागणार आहे. हीच वेळ आहे, ‘अभी नही तो कभी नही’सारखी...
 
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@