राहुल गांधींचे पुढे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019   
Total Views |



 

राहुल गांधींना जनतेने का नाकारले? त्यांचे नेमके चुकले तरी काय? राजीनामानाट्यातून काँग्रेसच्या पदरात शेवटी काय पडणार? पराभवातून राहुल शिकतील की राजकारणातून फारकत घेतील? यांसारख्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे देणारा हा लेख...

 

नरेंद्र मोदी यांच्या विजयाची देशभर जशी चर्चा चालू आहे, तशी राहुल गांधी यांचे ‘पुढे काय होणार,’ याचीही चर्चा चालू आहे. राहुल गांधी ही निवडणूक हरले आहेत. व्यक्तीश: ते केरळमधून निवडून आले आहेत. परंतु, ते ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्या पक्षाचा सर्व देशात दारुण पराभव झालेला आहे. २०१४ मध्ये त्यांच्या पक्षाला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१९च्या निवडणुकीत केवळ ५१ जागा मिळाल्या आहेत. पक्षाच्या यशाचे श्रेय जसे पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला जाते, तसे पक्षाच्या अपयशाचे श्रेयदेखील नेत्याच्याच डोक्यावर येऊन बसते.

 

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला. काँग्रेस वर्किंग कमिटीने तो स्वीकारला नाही. राजीनामा हे नाटक आहे, अशी त्यावर टीका झाली. राजीनामा स्वीकारला जाणार नाही, हे माहीत असल्यामुळे राजीनामा दिला होता, असे बोलले गेले. आपण राहुल गांधी यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवूया. आताही बातम्या अशा आहेत की, राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यांनी खरोखरच राजीनामा दिला तर तो त्यांचा शहाणपणाचा निर्णय ठरेल.

 

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी या निवडणुकीत खूप मेहनत घेतली. १४० हून सभा घेतल्या, सर्व देशात प्रवास केला, मोदी विरोधात तेच लढत राहिले, अन्य मोदी विरोधक आपापल्या राज्यात बसले. पवार बारामतीत बसले, ममता बंगालमध्ये, मायावती उत्तरप्रदेशात, कमलनाथ मध्यप्रदेशात. अखिल भारतीय स्तरावरचा एकही काँग्रेस नेता प्रचारासाठी देशभर फिरला नाही. काँग्रेसचे ब्रह्मास्त्र प्रियांका गांधी रायबरेली, अमेठी आणि वाराणसी येथेच अडकून पडले. यामुळे राहुल गांधी यांच्या कष्टाला दाद दिली पाहिजे. त्यांना यश मिळाले नाही, त्याची कारणे वेगळी आहेत.

 

पहिले कारण असे की, देश आता बदलला आहे. ही बदललेली गोष्ट राहुल गांधी, त्यांचे सल्लागार, त्यांना भाषण लिहून देणारे यांना समजली नाही. देश आता नेहरू-गांधी घराण्याचा देश राहिलेला नाही. स्वातंत्र्यानंतरची आता चौथी पिढी आलेली आहे. या पिढीला नेहरू आणि महात्मा गांधी यांचे फारसे कौतुक नाही. त्यांच्या पुण्याईवर मते मिळविण्याचे दिवस आता संपले. राहुल गांधींना हे समजले नाही. त्यांचे नेतृत्व हे लादलेले नेतृत्व ठरले. नेतृत्वासंबंधी म्हटले जाते की, काहीजण जन्मत: नेतृत्वगुण घेऊन येतात. काहीजण आपल्या कर्तृत्वाने नेतृत्व मिळवितात आणि काही लोकांवर नेतृत्व थोपवले जाते. राहुल गांधी या तिसर्‍या प्रकारात मोडतात.

 

दुसरे कारण असे की, सामान्य मतदार आता देशाचा विचार करू लागलेला आहे. त्याला हे समजते की, लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचा पंतप्रधान ठरविण्याची निवडणूक. देश चालविण्यासाठी कणखर माणूस लागतो. त्याच्याकडे निश्चित विचार असावे लागतात. लोकांना त्याच्याविषयी विश्वास वाटावा लागतो. उत्तरप्रदेशातील एक शेतकरी शेतीच्या वाईट स्थितीबद्दल रागाने बोलत होता. पत्रकाराने त्याला विचारले,“याला जबाबदार कोण?” तो म्हणाला,“योगी आदित्यनाथ यांचे सरकार!” त्याला पत्रकाराने विचारले,“तू मत कोणाला देणार?” तो म्हणाला,“अर्थातच मोदींना!” पत्रकाराने विचारले,“असे कसे?” शेतकरी म्हणतो,“भाईसाहब सवाल देश का है। मायावती, ममता या राहुल गांधी देश संभाल नहीं सकते। उसके लिये मोदीही चाहिये।” हेच मत सर्वसामान्य मतदाराचे होते.

 

तिसरे कारण देशासंबंधीचा कोणताही ठोस विचार राहुल गांधी मांडू शकलेले नाहीत. भारतात राहणार्‍या प्रत्येकाच्या मनात संपूर्ण भारताची प्रतिमा असते. हा माझा भारत सुरक्षित राहिला पाहिजे आणि तो संपन्न झाला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. या भारताला धोका पाकिस्तानपासून आहे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिक हा जन्मत: पाकिस्तानविरोधी असतो. पाकिस्तानविषयी जे सहानुभूती दाखवितात ते ‘देशद्रोही’ (‘देशद्रोही’ हा शब्द चांगला नाही) आहेत, असे सर्वांना वाटते.

 

या देशाचा विचार काँग्रेस कसा करते, राहुल गांधी कसा करतात, त्याच्या सुरक्षेविषयी त्यांच्या काय संकल्पना आहेत, देशाच्या समृद्धीविषयी त्यांना काय म्हणायचे आहे, याबाबतीत राहुल गांधी यांची पाटी कोरी राहिली. भारत समजून घेणे, वाटते तितके सोपे काम नाही. त्याचा दहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, त्याची जीवन परंपरा आहे, त्याची विचार परंपरा आहे, त्याची मूल्य परंपरा आहे, त्याची एक खास संस्कृती आहे आणि तिचे थोडेसे तरी ज्ञान असावे लागते. राहुल गांधींकडे थोडे ज्ञान आहे, असे त्यांच्या भाषणातून कधीही वाटले नाही. ज्याला देश समजला नाही, तो देशाचा नेता कसा होणार?

 

महात्मा गांधी जेव्हा भारतात आले, तेव्हा नामदार गोखले यांनी त्यांना सल्ला दिला की, “एक वर्ष भारत फिरून या आणि मग राजकारणात उतरा.” आपल्या गुरूंचा सल्ला गांधीजींनी मानला. भारत समजण्यासाठी विवेकानंदांनी भारताची परिक्रमा केली. महाराष्ट्रातील थोर पुरुष वासुदेवानंद सरस्वती यांनीदेखील भारतभ्रमण केले. संत नामदेव यांनीदेखील भारतभ्रमण केले. भारतभ्रमण केल्याशिवाय भारत समजत नाही. भारताचे राजकीय भ्रमण करून काहीही उपयोग नाही. राहुल गांधींना कोणी हा सल्ला दिलेला दिसत नाही.

 

चौथे कारण असे की, सामान्य माणसाच्या दृष्टीने जे विषयच नाहीत, ते विषय राहुल गांधी यांनी प्रचाराचे केले. गांधी-गोडसे विषय, राफेलचा विषय, ‘चौकीदार चोर है’ची घोषणा, युवकांना नोकर्‍या, या विषयासंबंधी सामान्य माणसाला काही घेणेदेणे नाही. नोकर्‍या नाहीत, हे खरे नाही. मुंबईत कामाला माणसे मिळत नाहीत. लोकांना नोकर्‍या हव्यात, त्याही सरकारी. जेथे काम कमी, भ्रष्टाचाराला वाव आणि मरेपर्यंत पैसे मिळण्याची शाश्वती. एवढ्या सरकारी नोकर्‍या ब्रह्मदेव आला तरी निर्माण करू शकत नाही.

 

गांधी-गोडसे वाद, हा मूर्खपणाचा वाद आहे. गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली आणि या हत्येबद्दल त्यांना फाशी झाली, हा विषय येथे संपला. तो जेव्हा उकरून काढला जातो, तेव्हा नवी पिढी विचारते, ‘गोडसे कोण होते?’ मग “त्यांनी गांधीजींना का मारले?’, ‘गांधीजींनी असे काय केले की, गोडसेंनी गांधीजींना मारले?’ जो इतिहास विसरला पाहिजे तो इतिहास नव्याने उकरून काढला जातो. नको ते वाद उत्पन्न केले जातात. त्याचा फायदा एवढाच होतो की, ‘मी नथुराम बोलतोय’ हे नाटक बेफाम चालते. ‘सिंकदरने पोरस से की थी लडाई, कौरव ने पांडव से की थी हाथापायी तो मैं क्या करुँ’, हे १९५०च्या दशकातील एका चित्रपटातील गाणे आहे. शाळेतील विद्यार्थी ते गात असत. ‘इतिहासातील घटना आहेत, त्याला मी काय करू’ असा त्यांचा प्रश्न आहे. हाच प्रश्न ‘गांधी-गोडसे’ विषयाचा आहे.

 

राहुल गांधी यांनी सर्वप्रथम ‘मी राजघराण्याचा राजपुत्र आहे आणि राज्य करण्यासाठीच जन्मलो आहे,’ या घमेंडीतून बाहेर पडले पाहिजे. ही घमेंड त्यांच्यामध्ये निर्माण करणारी त्यांच्या आजूबाजूची सर्व माणसे म्हातारी आहेत. त्यांची लोकप्रियता शून्य आहे. स्वत:च्या नावाने आणि कामाने ते निवडून येऊ शकत नाहीत, पण त्यांना सत्ता पाहिजे. सत्तेची मोठी पदे पाहिजेत. त्यांना राजघराण्यातील राजपुत्र पाहिजे. ‘त्याच्या करिष्म्यामुळे मते मिळतील, आपण निवडून येऊ आणि सत्ता भोगू,’ ही या म्हातार्‍यांची मनिषा आहे. राहुल गांधीना हे समजले पाहिजे.

 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस समजून घ्यायला पाहिजे. ती एक राष्ट्रीय चळवळ होती. सर्व विचारधारेची माणसे काँग्रेसमध्ये होती. ती सर्व देशभक्त होती. देशाचा त्यांचा अभ्यास चांगला होता. सामान्य माणसाशी ते मिळून-मिसळून राहत. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे, ही त्यांची धारणा होती. ‘सर्वसमावेशकता’ हा त्यांचा मंत्र होता. सर्व विचारधारांचा आदर हा त्यांचा व्यवहार होता. जेव्हा काँग्रेस ही नेहरू-गांधी घराण्याची ‘काँग्रेस’ झाली, तेव्हा ती असहिष्णू, जातवादी, धर्मवादी आणि घराणेशाहीवादी झाली.

 

राहुल गांधी यांना ‘नेहरू-गांधी घराण्याची काँग्रेस’ हवी की, ‘राष्ट्रीय काँग्रेस’ हवी याचा निर्णय करावा लागेल. राष्ट्र म्हणजे काय, हे त्यांना शिकून घ्यावे लागेल. शिकण्याची तयारी असेल तर जमेल. फ्रान्सच्या राजघराण्यासंबंधी म्हटले गेले की, ते इतिहासापासून काहीही शिकत नाहीत. फ्रान्सचे राजघराणे फ्रेंच जनतेने १७८९ ला कापून काढले. इंग्लडच्या जनतेने इंग्लिश राजघराणे ‘बकिंगहॅम पॅलेस’मध्ये बंद करून ठेवलेले आहे. लेनिनने ‘झार’ घराणे नष्ट करून टाकले. माओने चीनच्या सम्राटाला सामान्य सेवक बनवले आणि त्याचा चित्रपट निघाला. राजघराण्याची राजसत्ता इतिहासजमा झाली आहे. जेवढ्या लवकर राहुल गांधींना हे समजेल तेवढे बरे.

 

येणारी पिढी लोकशाहीने आपला नेता निवडणार आहे. ती २०२४ साली विचारेल, ‘कोण राहुल गांधी?’ ‘त्यांचे कर्तृत्व काय?’ आणि ‘कुठले आले, नेहरू-गांधी घराणे?’, ‘त्यांना आमच्यावर राज्य करण्याचा ठेका कोणी दिला?’ या प्रश्नांना समर्पक उत्तरे नाहीत. काँग्रेसचे भाट आणि गांधी घराण्याचे बूटचाटू हे या प्रश्नांची उत्तरे देतील. ती सर्व आता म्हातारी माणसे झालेली आहेत. वाहिन्यांच्या चर्चांमध्ये त्यांचे खप्पड चेहरे आपण पाहत असतो आणि त्यांचे विश्लेषण ऐकत असतो. आजचा तरुण आणि २०२४चा तरुण या म्हातार्‍यांना म्हणेल, “आजोबा, आता घरी बसा, आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या.” राहुल गांधी यांना आपला मार्ग शोधायचा आहे. त्यामानाने अजून ते तरुण आहेत. पराभव हा खूप काही शिकण्याची संधी देत असतो. पराभवातून जे शिकतात, ते ‘पराक्रमी’ होतात आणि पराभवातून जे काही शिकत नाहीत, ते ‘अभावग्रस्त’ होतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@