जावेद अख्तर आणि ओवेसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2019   
Total Views |




फिर खामोशी ने साज छेडा है

फिर खयालात ने ली अंगडाई

जावेद अख्तर यांचा शेर आठवला कारण,

गलत बातों को खामोशी से सुनना हामी भर लेना

बहुत हैं फायदे इस में मगर अच्छा नहीं लगता

 

म्हणणार्‍या जावेद अख्तर यांनी नुकतेच एक वक्तव्य केले की, “फक्त बुरखाप्रथेलाच बंदी नाही, तर घुंगट प्रथेवरही बंदी आणायला हवी.” वा! कवीमन सर्व स्तराच्या भेदापलीकडे मानवी मूल्यांचे जागर करणारे असते, असे वाटायचे. पण, हाय रे दैवा, जावेद अख्तर यांचे वक्तव्य ऐकून त्यांचेच शब्द आठवले-

इस शहर मे जिने का अंदाज निराला

होठोंपे लतिफे आवाज मे छाले है

अख्तर यांनी बुरखा आणि घुंगट एकाच तराजूत मोजले. खरे तर इथे मुस्लीम महिलांचा बुरखा आणि हिंदू महिलांचा घुंगट हा मुद्दाच गौण आहे. मुद्दा आहे, मानवी जीवनाचा आणि जगण्याचा. कुणीही तोंड झाकून येते, ओळख लपवते आणि दहशतवाद माजवते आणि त्यात हकनाक निष्पाप बळी जातात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. यावर ना ओवेसी बोलले ना जावेद अख्तर. त्याहीपलीकडे जाऊन इथे जावेद यांचे बुरख्याबद्दलचे प्रेम न बोलता जाणवते. बुरखा घालणार्‍या किंवा घुंगट ओढणार्‍या स्त्रियांची वकिली करण्यापेक्षा अख्तर यांनी जगभरात हिंसा करणार्‍यांचा जिहाद कमी होतो का, यावर शेर लिहावा. आपण मोठे मानवी शाश्वत मूल्यांचे कैवारी, या आवेशात अन्याय, हिंसाचार वगैरेंवर अख्तर यांची शब्दसंपदा बहरते. आता कुणी म्हणेल की, ते बहरणे मानवी मूल्यांच्या आवेशाआड धार्मिक एककल्लीपणाकडे झुकणारे असते. असो, तरीही साहित्यिकांना आदर देण्याची भारतीय संस्कृती असल्याने या देशात अख्तर यांना नेहमी सन्मानच मिळाला. पण, आज ‘बुरखा’ आणि ‘घुंगट’ या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांची आणि धार्मिक असहिष्णू असणार्‍या ओवेसी यांची वैचारिक बैठक एकच आहे, हे स्पष्ट झाले. ओवेसी पण हेच म्हणाले की, “बुरख्यावर बंदी घालाल, तर घुंगटवरपण बंदी घाला.” अख्तर आणि ओवेसी यांचे वैचारिक बंध जुळत असतील, तर मग पुन्हा अख्तर यांच्याच शब्दात सांगायचे तर,

इन चरागों में तेल ही कम था

क्यूँ गिला फिर हमें हवा से रहे...


हम को उम्मीद क्या खुदा से...

नेकी इक दिन काम आती है

हम को क्या समझाते हो

हम ने बेबस मरते देखे

कैसे प्यारे प्यारे लोग

जावेद अख्तर यांचा आणखी एक शेर. यातील प्रत्येक शब्द वाचताना जगभरात दहशतवादाने, अतिरेक्यांमुळे मारले जाणारे निष्पाप लोकांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मरणार्‍यांची काय चूक होती? आयुष्याच्या धकाधकीत घरसंसार जगरहाटी सांभाळताना इमानेइतबारे नोकरी करून जगणारे ते जीव होते. पण, कुणा एका दहशतवादी संघटनेच्या मनात आले म्हणून त्यांना मृत्यू मिळाला. तोही अशाप्रकारे की तसा मृत्यू दुश्मनालाही येऊ नये.

धार्मिक उन्मादाच्या नावे अधर्म करत मानवी रक्ताचा सडा पाडणार्‍या अतिरेक्यांचा धर्म कोणता? यावर अनेक उत्तरे येतील. पण, त्यांच्या क्रूर कृत्यामुळे मेलेल्या लोकांचे काय? यावर जावेद अख्तर काही बोलतील का? मी वाचलेला पेपर लहूलुहान झालाय किंवा परिंद्यांना कुठे धर्म आहे वगैरे बोलणे सोपेच आहे. पण, ‘हूर’ आणि ‘जन्नत’च्या मूर्ख लोभापायी जित्याजागत्या निष्पाप माणसांच्या अवेळी मृत्यूची शोककळा अख्तर यांच्या प्रतिभेत उमटेल का? कदाचित प्रतिभासंपन्न कवी आहेत, शब्दांचे इमले उभेही करतील. पण, तरीही कुठेतरी काहीतरी राहिलच. कारण, बुरखाबंदीवरचे त्यांचे विधान. कुणी काय कपडे घालावेत? त्यातही आपले तोंड कायम झाकून घ्यावे, यात धर्माचे अधिष्ठान असते का? यात मानवी सभ्यतेचे प्राक्तन असते का? सदोदित जागृत नागरिक म्हणून स्वातंत्र्याचे गीत गाणारे अख्तर यांनी दहशतवादामध्ये मेलेल्या जिवांचा आणि त्यांच्या पश्चात त्यांच्यावर अवलंबून असणार्‍यांचा प्राणांतिक आकांत कधी पाहिला आहे का? बुरखा म्हणून त्याचा संदर्भ धर्माशी लावण्याआधी जावेद यांनी बुरखा आणि त्याच्याआड चालणार्‍या जगभरातल्या कारवाया एकदा उघड्या डोळ्यांनी आणि मनाने पाहाव्यात. मग त्यांचेच शब्द त्यांना पुन्हा आठवतील

उसके बंदोंको देख कर कहिए

हम को उम्मीद क्या खुदा से रहे ।

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


संबंधित बातमी : ... मग घुंगटबंदीही करा : जावेद अख्तर

@@AUTHORINFO_V1@@