पुरुषत्वाकडून मातृत्वाचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2019
Total Views |


पुरुष ते ट्रान्सजेंडर आणि एक आई हा अफलातून प्रवास गौरी सावंतने कसा केला,याची सविस्तर माहिती आपण घेऊया.

 

गौरी सावंत हे नाव आता जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. गौरीने तृतीयपंथीयांच्या जीवनातील अनेक पैलू समाजापुढे ठेवले. देशात न्यायालयाची लढाई लढून देशातील पहिली तृतीयपंथी जी एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिचा सांभाळ करतेय. तिच्यातील आणि तिच्या मुलीतील आई-मुलीचे नाते खूपच भावनिक आहे. गौरीचा हा प्रवास खूप कठीण आहेच. मात्र, यात अपमान, समाजाकडून मिळालेली तुसडी वागणूक या सगळ्यातून तावून-सुलाखून निघालेला आहे.

 

गौरीचा जन्म पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आधीचे नाव गणेश सुरेश सावंत होते. तो मुलगा होता. नऊ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्याचे पुढील संगोपन त्याच्या आजीने केले. तो जन्माने मुलगा असला तरी त्याची चाल मुलींप्रमाणे होती. शालेय दिवसांत त्याला स्वतःमध्ये एक विचित्र बदल जाणवू लागला. त्याला वाटू लागले होते की, तो मुलगा नाही तर एक मुलगी आहे.

 

अनेकदा घरात गुपचूप बहिणीची साडी घालून तो चेहर्‍यावर मेकअप लावत असे. त्याला असे राहायला खूप आवडायचे. मात्र, कोणी बघेल म्हणून घाबरून तो या गोष्टी करीत नसे. गणेशचे वडील पोलीस होते. त्यांना मुलाचा मार्ग आवडला नव्हता. गौरी सांगतात की, “घरात आई नव्हती, शाळेत मित्र नव्हते. मनातले बोलण्यासारखे कोणीही नव्हते. वडिलांनी माझा खूप द्वेष केला. आयुष्य खराब होत होते. शेजारची मुले हिजडा चिडवत. कालांतराने, आपण मुलगी आहोत, ही भावना स्पष्ट होत गेली.”

 

गणेशने शालेय अभ्यास पूर्ण केल्यानंतर, अडचणींना तोंड देऊन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. एमएसडब्ल्यू ही पदव्यूत्तर पदवी घेतल्यानंतर कुटुंबाला मदत करावी, अशी घरच्यांची इच्छा होती. मात्र, त्याने ठरवले होते की, यापुढे मुलाचे जीवन जगायचे नाही. एका रात्री कोणालाही न सांगता गणेश घरातून बाहेर पडला. ती रात्र त्याने दादर रेल्वेस्टेशनवर काढली. दुसर्‍या दिवशी चंपा नावाचा एक माणूस त्याला आपल्या घरी घेऊन गेला. मग नोकरीसाठी संघर्ष सुरू झाला, पण लोक त्याला नोकरी देण्यासाठी तयार नव्हते.

 

दरम्यान, तो एका गैर-सरकारी संस्थेच्या संपर्कात आला. वैद्यकीय सल्लामसलत केल्यानंतर त्याने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. गणेश सावंत ही जुनी ओळख पुसून गौरी सावंत ही नवी ओळख जन्माला आली. यानंतर, त्यांना अनाथ मुलांसाठी काम करायचे होते. मात्र, त्याला तसे करण्यास परवानगी मिळाली नाही. लहान मुलांजवळ मी जाऊ नये, असे मला सतत सांगण्यात येत असे. त्याचा मला खूप त्रास व्हायचा.

 

गौरीने साल २००० मध्ये किन्नर आणि ट्रान्सजेंडर लोकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी एक संस्था तयार केली. साल २००१ मध्ये तिच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले. मुंबईत एका सेक्स वर्करचा मृत्यू झाला. त्या महिलेच्या मुलीलासुद्धा विकण्यात येणार आहे, हे समजल्यावर गौरीने त्या मुलीची, गायत्रीची जबाबदारी घेतली. मग गायत्री गौरीबरोबरच तिच्या घरात राहू लागली. गायत्रीला नवीन घरात खूप प्रेम मिळाले. गायत्री शाळेत जाऊ लागली. गायत्रीसोबत गौरी अनेकदा फिरायला जायची. तिला सामान्य आईप्रमाणेच जगायला आवडते. गौरी आणि तिच्या मुलीला अनेकदा विचित्र प्रश्नांना सामोरे जावे लागत असे. गायत्रीवर चांगले संस्कार व्हावे यासाठी गौरी खूप मेहनत घेत आहे.

 

एका तृतीयपंथीयाने एका मुलीला दत्तक घेतले, ही गोष्ट सगळीकडे झाली. काहींनी याचा आदर केला तर काही लोकांनी त्याची प्रशंसा केली. गौरीने मुलीला वसतिगृहात ठेवले असून तिला मोठी अधिकारी बनविण्याचे तिचे स्वप्न आहे. गौरीच्या जीवनावर एक जाहिरातसुद्धा करण्यात आली, ज्याला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला. गौरी यांनी २००० मध्ये ’साक्षी चारचौघी’ ट्रस्टची स्थापना केली आहे. ही संस्था ट्रान्सजेंडर लोकांना मार्गदर्शन आणि आधार देते. गौरी म्हणते की,ही आपली सामाजिक जबाबदारी आहे की, केवळ ट्रान्सजेंडर्स ट्रान्सजेंडर्ससाठी काम करू शकत नाहीत, तर ते इतर समाजासाठीदेखील काम करू शकतात.

 

कारण त्यांनादेखील समाजासाठी आपले योगदान द्यायचे आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मान्यता दिल्यानंतरसुद्धा भारतातील ट्रान्सजेंडर्सचे आयुष्य बदललेले नाही. समाजात लैंगिक शिक्षण आणि लैंगिक समानता असलीच पाहिजे,” असे गौरी म्हणते. गौरी कलम ३७७ बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आनंदित आहे. तिने अनेक अनाथांना आपलेसे केले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या सद्भावना राजदूत म्हणून ट्रान्सजेंडर कार्यकर्ता गौरी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरला सद्भावना राजदूत म्हणून नेमण्यात आले आहे. तिच्या या उत्तुंग कामगिरीसाठी समाजातून तिचे खूप कौतुक केले जात आहे. तिचे हे सामाजिक काम खूप लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तसेच गौरीच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!!

 
 - कविता भोसले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@