गांधी घराणे हटवा; कॉंग्रेस वाचवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |

 
17 व्या लोकसभा निवडणुकीत देशात कॉंग्रेसचे 2014 नंतर दुसर्यांदा बारा वाजले! राहुल गांधी कॉंग्रेसला वाचवू शकत नाहीत, हे यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले. त्यामुळे कॉंग्रेसला आपल्या राजकीय भवितव्यासाठी नव्या नेत्याचा शोध आज नाहीतर उद्या घ्यावाच लागणार आहे. कॉंग्रेसने गांधी घराण्याच्या बाहेर नव्या नेतृत्वाचा शोध न घेता, गांधी घराण्यातील नेत्यांसमोर साष्टांग दंडवत घालण्याचा आपला रिवाज सोडला नाही, तर कॉंग्रेसला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही! मुळात ‘आधी देश, मग पक्ष आणि सर्वात शेवटी मी म्हणजे व्यक्ती’ या भाजपाच्या धोरणाचा स्वीकार कॉंग्रेसला करावा लागणार आहे. जोपर्यंत कॉंग्रेस भाजपाच्या पावलावर पाऊल टाकणार नाही, तोपर्यंत स्वत:ला वाचवू शकणार नाही.
 
ज्या वेळी एखादी व्यक्ती किंवा घराणे पक्षापेक्षा तसेच देशापेक्षाही मोठे होण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याची स्थिती गांधी घराण्यासारखी होते. जेव्हा व्यक्ती आणि पक्ष यातून एकाची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा लोक पक्षाची, पक्ष आणि देश यातून एकाची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा लोक देशाची निवड करतात, हा यावेळच्या लोकसभा निवडणुकीचा धडा आहे. 2014 च्या निवडणुकीत 44 जागा जिंकणार्या कॉंग्रेसला यावेळी 52 जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसची आजवरच्या इतिहासातील ही खालून दुसर्या क्रमांकाची सर्वात खराब कामगिरी म्हणावी लागेल. एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुणांची आवश्यकता असताना त्याला 25 गुण मिळावे, दुसर्या परीक्षेतही त्याला खूप अभ्यास करून 35 च्या ऐवजी 30 गुण मिळावे, अशी कॉंग्रेसची स्थिती झाली आहे. लागोपाठ दुसर्यांदा कॉंग्रेसला एवढ्या कमी जागा मिळाल्या की, तिला पंतप्रधानपद तर सोडाच, पण विरोधी पक्षनेतेपदही मिळवता आले नाही! कॉंग्रेसच्या या दारुण पराभवाची जबाबदारी अध्यक्ष राहुल गांधी यांचीच आहे. ‘बापसे बेटा सवाई’ अशी एक म्हण आहे. राहुल गांधींच्या बाबतीत यात बदल करून ‘मॉं से बेटा निकम्मा,’ अशी त्यात दुरुस्ती करावी लागेल. कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांनी 2004 आणि 2009 अशा लागोपाठ दोन लोकसभा निवडणुका जिंकून देत कॉंग्रेसला ‘अच्छे’ दिन आणले; तर राहुल गांधी यांनी 2014 आणि 2019 अशा लागोपाठ दोन निवडणुकांत पानिपत करत कॉंग्रेसला बुरे दिन सुरू केले.
 
कॉंग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधींसोबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेही तेवढेच जबाबदार आहेत. अशोक गहलोत आणि कमलनाथसारखे, कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री राज्यात पक्ष जिंकावा म्हणून प्रयत्न करण्याऐवजी आपल्या मुलाच्या विजयासाठी त्याच्या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम् यात मागे नव्हते.
कॉंग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण तो कॉंग्रेसच्या कार्यसमितीने फेटाळून लावला. अमेठीतील जनतेसोबत संपूर्ण देशाने राहुल गांधींच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला असताना, कॉंग्रेसच्या कार्यसमितीने राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवावा, ही कॉंग्रेस कार्यसमितीची राजकीय दिवाळखोरी आहे. कॉंग्रेसची फेररचना करण्याचा सर्वाधिकारही कार्यसमितीने त्यांना दिला. आता राहुल गांधी कॉंग्रेसची फेररचना कशी करतात, ते पाहावे लागणार आहे.
जनमानसातील आपली पप्पू ही प्रतिमा राहुल गांधी तोडू शकले नाहीत, या प्रतिमेच्या बाहेर येऊ शकले नाहीत. उलट, आपल्या वागण्या-बोलण्याने आणि बालिश कृतीने त्यांनी आपल्या या प्रतिमेला हातभार लावला. त्यामुळे भर लोकसभेत भाषण करताना आपल्या जागेवरून उठून, पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेण्याचा आचरटपणा त्यांनी केला नसता. अशा कृतीने राहुल गांधी आपल्याला हास्यास्पद बनवत होते. जनमानसात आधीच फार चांगली नसलेली आपली प्रतिमा आणखी खराब करत होते, विश्वसनीयता गमवत होते.
 
राहुल गांधी जेव्हा जेव्हा पक्षाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत, तेव्हा तेव्हा ‘प्रियांका लाव देश बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तर प्रियांका गांधी-वढेराही पूर्ण ताकदीने उत्तरप्रदेशात सक्रिय होत्या, पण त्याही कॉंग्रेसचा सोडा, आपल्या भावाचाही अमेठी मतदारसंघातील पराभव टाळू शकल्या नाहीत. म्हणजे राहुल गांधींसोबत प्रियांका गांधीही कॉंग्रेसला वाचू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गांधी घराण्याबाहेरच्या नव्या कर्तृत्ववान नेत्याचा शोध कॉंग्रेसला घ्यावा लागणार आहे. देशातील लोकशाही टिकावी म्हणून सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. म्हणूनच गांधी घराण्याची नसली तरी कॉंग्रेसची गरज आहे. कॉंग्रेस आता सत्तेवर येऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे किमान विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी तरी कॉंग्रेस टिकली पाहिजे, जगली पाहिजे आणि वाढली पाहिजे. गांधी घराण्याबाहेरील नेता कॉंग्रेसचे नेतृत्व करू शकत नाही, हा समज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरिंसह राव यांनी खोटा ठरवला. त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद आणि पंतप्रधानपदही यशस्वीपणे सांभाळले. आजही कॉंग्रेस पक्षात अनेक कर्तृत्ववान नेते आहेत, त्यांना कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे.
कॉंग्रेस कार्यसमितीने राहुल गांधी यांचा राजीनामा फेटाळला आहे त्यामुळे राहुल गांधींनी राजीनामा मागे घेत अध्यक्षपद सांभाळण्याची तयारी दर्शवल्याचे ताजे वृत्त आहे. मात्र, यामुळे कॉंग्रेससमोरचे प्रश्न सुटणार नाहीत, उलट आणखी वाढणार आहेत. एखाद्या रोगावर शस्त्रक्रियेची आवश्यकता असताना मलमपट्टी करण्यासारखा हा प्रकार आहे.
मुळात, कॉंग्रेस कार्यसमितीने असा निर्णय घेतला असेल, तर राहुल गांधी यांच्यावरची जबाबदारी आणखी वाढणार आहे, त्यांना आपल्या वागणुकीत सुधारणा करावी लागणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी केलेली मेहनत कुणी नाकारणार नाही. पण, ते मतदारांचा विश्वास संपादन करू शकले नाही.
राहुल गांधी एक पाऊल पुढे टाकतात आणि आपल्याच कृतीने पक्षाला दोन पावले मागे आणतात. राहुल गांधींची राजकीय समज कमी आहे, त्यांच्यात प्रगल्भतेचा अभाव आहे. मुळात, कुणाचे ऐकावे, किती ऐकावे आणि काय ऐकू नये, हे त्यांना समजत नाही.
राहुल गांधींनी आपल्या भोवती चुकीच्या माणसांचे कोंडाळे केले आहे, त्या कोंडाळ्यातून बाहेर पडण्याची त्यांची तयारी नाही. पक्षातील जुने आणि अनुभवी नेतृत्व तसेच नवी पिढी यांच्यात समन्वय राखण्यात राहुल गांधी अपयशी ठरले. आता राहुल गांधी यांनी सामान्य कार्यकर्त्यालाही वेळ दिला पाहिजे. राहुल गांधी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटायला वेळ देत नाहीत, बोलत नाहीत, अशी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. एखाद्याला भेटायला वेळ दिली, तर त्याचे म्हणणे गांभीर्याने ऐकण्यापेक्षा ते आपल्या कुत्र्याशी खेळत बसतात, असा आरोप यापूर्वीच झाला आहे. राहुल गांधी यांच्या अशा पोरकट वागणुकीनेच अनेक नेते आणि कार्यकर्ते कॉंग्रेसने गमावले आहेत. राहुल गांधी यापुढे तरी आपल्या वागणुकीत सुधारणा करत कॉंग्रेस पक्ष वाचवतात, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी हातभार लावतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे...
@@AUTHORINFO_V1@@