मोदीलाटेच्या तडाख्याने सगळेच भुईसपाट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019   
Total Views |




सदैव देशहिताचा विचार करणार्‍या मोदी यांच्यावर वाट्टेल ती भाषा वापरून अपप्रचार करणार्‍या विरोधकांना मतदारांनी जबरदस्त श्रीमुखात भडकविली. विरोधकांपैकी अनेकांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले. त्यातील काही तुरुंगात खडी फोडत बसलेले तर काही जामिनावर सुटलेले. असे ज्या विरोधकांचे चरित्र आणि चारित्र्य जनतेने जोखले, ते त्यांना कशी मते देतील?

 

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि 'आपण आता देशाचे पंतप्रधान होणार,' अशी स्वप्ने पाहणार्‍या समस्त विरोधी नेत्यांचा स्वप्नभंग आला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये सर्व विरोधक वाहून गेल्याची प्रत्यक्ष अनुभती आल्याने, आम्ही अपेक्षिले काय होते आणि प्रत्यक्षात झाले काय, हे पाहून समस्त विरोधकांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली. भाजपविरुद्ध रान उठविण्याचा जो प्रयत्न विविध विरोधकांनी केला, तो पूर्णपणे फसल्याचेच या निमित्ताने दिसून आले. जनतेच्या हिताचा विचार करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने जी अनेकानेक चांगली कामे केली, त्यावर नकारात्मक प्रचार करून विरोधी पक्षांनी पाणी फिरविण्याचा प्रयत्न केला. पण, देशातील सुजाण मतदार त्या अपप्रचारास बळी पडले नाहीत. 'सबका साथ, सबका विकास' करण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कार्य हाती घेतले, ते पुढे नेण्याचे काम केवळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार करू शकते, अशी मतदारांची खात्री पटली आणि त्या मतदारांनी मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने कौल दिला. विरोधकांच्या अपप्रचारास जनता बळी पडली नाही.

 

गेल्या वर्षी झालेल्या काही राज्यांतील विधानसभा निवडणुका, तसेच लोकसभेच्या पोटनिवडणुका यामध्ये विरोधकांना मिळालेले यश पाहून आता पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येणे अशक्य असल्याच्या आनंदात विरोधकांनी जुळवाजुळव करण्यास प्रारंभ केला. आघाडीची समीकरणे जुळविण्यासाठी विरोधी पक्षातील रथी महारथी प्रयत्नास लागले. चंद्राबाबू नायडू, मायावती, शरद पवार, ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान देवेगौडा, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव आदी नेत्यांचे विरोधी ऐक्य साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य झाल्याचे जनतेला दिसून आले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार उत्तमप्रकारे काम करीत असताना आणि विरोधी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसताना जनता त्यांच्यामागे धावायला मूर्ख आहे काय? पण, विरोधी नेत्यांच्या ते लक्षातच आले नाही. आपल्यामागे मतदार उभे राहतील, असा जो त्यांचा अंदाज होता, तो साफ कोलमडून पडला. विरोधकांची म्हैस मुळातच भरवशाची नव्हती, त्यामुळे त्या म्हशीला टोणगा होण्याचाही प्रश्न नव्हता!

 

विरोधी पक्षातील ज्या काही नेत्यांची नावे वर घेतली आहेत, त्या सर्वांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती. काही उघडपणे बोलत होते, तर काही तसे बोलत नव्हते. राहुल गांधी यांनी तर आपणास पंतप्रधान व्हायचे असल्याचे प्रथमच घोषित केले होते. त्यांना द्रमुक नेते स्टालिन यांनी पाठिंबा देऊ केला होता. पण, राहुल गांधी यांनी आधीच आपली मनीषा व्यक्त केल्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी नाराज झाली होती. आताच पंतप्रधानपदाची चर्चा नको, निवडणूक निकालानंतर त्याबाबत निर्णय घेऊ, असा काहींचा सूर होता. पण, ज्यांना निवडणूक प्रचाराच्यावेळी आपला समान शत्रू असलेल्या भाजपविरुद्ध संघटितपणे लढता आले नाही, ते निवडणुकीनंतर काय एकत्र येणार कप्पाळ! नाव 'महागठबंधन' पण त्यामध्ये काही मोजक्याच पक्षांचा समावेश!

 

उत्तर प्रदेशात तर या 'महामिलावटी' 'महागठबंधन'ने काँग्रेस पक्षासाठी उपकार म्हणून अवघ्या दोन जागा सोडल्या होत्या. उत्तर प्रदेशात काँग्रेस कोणत्या स्थितीत आहे, हे जाणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. निकालानंतर त्याची प्रचितीही आली. आपला पराभव होणार, हे लक्षात आल्याने राहुल गांधी यांनी केरळ राज्यातील वायनाड या मतदारसंघात धाव घेऊन तेथूनही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वायनाड मतदारसंघात देशातील बहुसंख्य हे अल्पसंख्य असल्याचा लाभ त्यांना झाला आणि काँग्रेसच्या अध्यक्षाची लाज राखली गेली! विरोधकांकडे प्रचाराचे ठोस मुद्देच नव्हते. सत्तारूढ भाजपविरुद्ध नकारात्मक प्रचार करण्यापलीकडे त्यांच्या हाती अन्य काहीच नव्हते. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण, नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील, असे कथित आश्वासन दिल्याचे मुद्दे उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचा काँग्रेसने आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण, लोकांनी काँग्रेस अध्यक्षांचे म्हणणे गांभीर्याने घेतलेच नाही. विधानसभा निवडणुकांनंतर राहुल गांधी परिपक्व झाले असल्याचा प्रचार माध्यमांतील त्यांच्या भाटांनी सुरू केला होता. राहुल गांधी यांच्यामध्ये सुधारणेला प्रचंड वाव असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

 

नरेंद्र मोदी यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे, त्यांना देशात हुकूमशाही आणायची आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही, देशातील न्यायपालिका, निवडणूक आयोग या सर्वांवर त्यांना नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे, असा खोटा प्रचार विरोधकांनी बेंबीच्या देठापासून ओरडून केला. झाले काय, मोदी यांना जनतेने प्रचंड बहुमतांनी निवडून दिले. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पारड्यात घसघशीत दान टाकले. मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, भारतीय राज्यघटनेपुढे विनम्र भावाने नतमस्तक झालेल्या नरेंद्र मोदी यांचे दर्शन अवघ्या जनतेने घेतले. त्यावरून निवडणूक प्रचाराच्यावेळी विरोधक जे आरोप करीत होते, त्यातील फोलपणा उघड झाला! सदैव देशहिताचा विचार करणार्‍या मोदी यांच्यावर वाट्टेल ती भाषा वापरून अपप्रचार करणार्‍या विरोधकांना मतदारांनी जबरदस्त श्रीमुखात भडकविली. विरोधकांपैकी अनेकांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले. त्यातील काही तुरुंगात खडी फोडत बसलेले तर काही जामिनावर सुटलेले. असे ज्या विरोधकांचे चरित्र आणि चारित्र्य जनतेने जोखले, ते त्यांना कशी मते देतील?

 

प्रचारादरम्यान विरोधकांनी आपला नेहमीचा आवडीचा मुद्दा लावून धरला, तो म्हणजे इव्हीएमचा. मतदान यंत्रांमध्ये गडबड करणे शक्य आहे, असा धोशा त्यांनी सारखा लावला होता. आपल्या या मुद्द्यास भारतात कोणी धूप घालीत नाही, हे लक्षात आल्याने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन जगाचे लक्ष या मुद्द्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, सॅम पित्रोदा, कपिल सिब्बल यांच्या त्या प्रयत्नांना यश आले नाही. इव्हीएममध्ये गडबड अशक्य असल्याचे आयोगाने सांगूनही आयोगावर विरोधकांनी विश्वास ठेवला नाही. आयोग मोदी सरकारच्या तालानुसार वागत असल्याचे आरोप करण्यात आले. या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातही विरोधकांनी धाव घेऊन पाहिली, पण तेथे त्यांची डाळ शिजली नाही. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्वच्या सर्व स्लीप्सची पडताळणी करावी, अशी अवास्तव मागणीही विरोधकांनी करून पाहिली. पण, ती मान्य करण्यात आली नाही. निवडणूक निकालानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात जी माहिती दिली ती पाहिली तर इव्हीएमबद्दल किती अपप्रचार केला जात होता, ते लक्षात येईल. कोणत्याही ठिकाणी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यामध्ये कसलीही तफावत आढळली नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले! एकूणच नकारात्मक प्रचाराचा चांगलाच फटका विरोधकांना बसला. असभ्य भाषेत पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेली टीका भोवली! घराणेशाही देशाला मान्य नसल्याचे मतदारांनी दाखवून दिले! मोदीलाटेच्या तडाख्यात सर्व विरोधक भुईसपाट झाल्याचे दिसून आले!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@