वकिलीमध्ये संस्कृती जपताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |


 


गुन्हेगारी खटल्यामध्ये अशिलाला यशस्वीपणे न्याय मिळवून देणार्‍या निरपराध व्यक्ती निर्ढावलेल्या गुन्हेगार बनू नये म्हणून काम करणार्‍या अ‍ॅड. विमला चौनाल.


खादी बाई वकिलाचा कोट घालून एखाद्या क्रिमिनल केसचा युक्तिवाद करते, हे तिकडे चित्रपटांमध्ये फार धाडसी दिसते. खर्‍या जीवनात मात्र "महिला वकिलांनी गुन्हेगारी क्षेत्रातली वकिली करूच नये. कारण, या क्षेत्रात गुन्हेगारांशी सामना, संवाद करायचा असतो. ते पडले गुन्हेगार. तू वकील असलीस तरी स्त्री आहेस. तुझ्याकडे ते कशा नजरेने बघत असतील तुला कळतं का? हे, बुद्धिमान वकील म्हणून तुला कळत असेलच. तू गुन्हेगारी प्रकरणांच्या केसेस लढवणं सोड." त्या ज्येष्ठ आणि तितक्याच सन्माननीय वकिलांनी अ‍ॅड. विमला यांना सल्ला दिला. वांद्रे बार असोसिएशनच्या सदस्या आणि परिसरामध्ये सन्माननीय महिला वकील आणि समाजसेवक म्हणून परिचित असलेल्या विमला चौनाल, या त्यांच्या समाजाच्या संघटनेच्या म्हणजे कुमाऊ अर्बन सोसायटी मुंबईच्या पदाधिकारीही आहेत. त्यांना ज्येष्ठ वकिलांनी दिलेल्या त्या सल्ल्यानंतरही आजही १० वर्षे अ‍ॅड. विमला गुन्हेगारी खटल्यांमध्ये अशिलाला न्याय मिळवून देणार्‍या वकील म्हणून सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे विकोपाला गेलेल्या घरगुती खटल्यांमध्येही यशस्वी मध्यस्थी करणारी महिला वकील म्हणून त्यांनी बरेच यश मिळवले आहे. विमला म्हणतात, "महिला आणि पुरुष जेव्हा वकिलीचे शिक्षण घेतात, तेव्हा दोघांनाही अभ्यासाला समानच विषय असतात. मग महिलांनी ठराविक क्षेत्रातच वकिली करावी, असे गृहितक का? गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर होणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार असतेच असे नाही. त्यामुळे गुन्हेगारी खटले न्यायालयात चालवताना मला कधीही भीती, दडपण वाटत नाही. उलट हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे."

 

अर्थात, कुणालाही असेही वाटेल की, या अ‍ॅड. विमला यांना कोर्टकचेरी, वकिली, न्यायालय याची पार्श्वभूमी असावी म्हणून त्या इतक्या खंबीर आहेत. पण, तसे नाही. टिकाराम पांडे आणि गोविंदी पांडे या कुमाऊ समाजाच्या दाम्पत्याला पाच मुले. त्यापैकी एक विमला. विमला तीन वर्षांची असतानाच गोविंदीबाईंचे निधन झाले. त्यावेळी मुलं मोठी होती. प्रश्न होता, तो तीन वर्षांच्या विमलाचा आणि तिच्या एका वर्षाच्या छोट्या बहिणीचा. टिकाराम टॅक्सी ड्रायव्हर. रात्री टॅक्सी चालवायची आणि दिवसा घर बघायचे, असा त्यांनी शिरस्ता ठेवला. मुलींना आईविना चांगले वळण लागावे म्हणून ते दिवसभर घरी राहत आणि रात्री टॅक्सी चालवत. तीन भाऊ आणि वडील यांच्या संरक्षक प्रेमळ वातावरणात विमला यांचे बालपण गेेले. विमला माध्यमिक वर्गात शिकू लागली. सगळे स्थिर आणि ठीकच होते. पण, त्याच काळात टिकाराम यांचे बंधु गावी उत्तराखंडमध्ये वारले, त्यानंतर वहिनीही वारली. त्यांना किशोरवयीन एक मुलगा एक मुलगी. मुंबईत आपली मुलं कामधंद्याला लागलेली, मुलीही मोठ्या झाल्या. भावाच्या मुलांना आधार देण्यासाठी टिकाराम गावाला गेले. त्यानंतर विमलाचे जगणेच बदलले. कारण, तीनही भावांची लग्न होऊन ते वेगळे रहायला लागले. दोन बहिणी कुणाकडे राहणार, याची वाटणी झाली. विमलासाठी हे दुःख मोठे होते. पण, पर्याय नव्हता. कारण, वहिनी आणि भाऊ सांभाळत तर होते. पुढे फी भरायला पैसे नाहीत म्हणून बारावीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. पुढे केव्हातरी पैशांची साठवण झाली आणि त्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. यातच विमलाला स्थळ सांगून आले. मुलगा सांताक्रुझला एका खाजगी कंपनीमध्ये कामाला. प्रथेप्रमाणे मुलींचे लग्न वयातच व्हायला हवे.

 

असो. विमलाला सासर चांगले मिळाले. पतीने पितांबर यांनी पुढील शिक्षणाला संमती दिली. मात्र, त्याच काळात पतीची नोकरी सुटली. त्यादरम्यान विमलाला बाळही झाले. मात्र, घर सांभाळून विमलाने पदवीपर्यंत शिक्षण पूर्णही केले. त्याच काळात पितांबर एका वकिलाकडे वाहनचालक म्हणून कामाला लागले. त्यावेळी त्यांना वकिली पेशा, वकिली शिक्षण याबाबत पूर्ण माहिती झाली. दररोज घरी आल्यावर ते विमलाशी कोर्ट, महिला वकील याबाबत चर्चाही करत. विमलाचा तोपर्यंत वकिलीबिकिलीशी काही संबंधच नव्हता. पण, कधी न पाहिलेले जग तिच्या डोळ्यात उतरे. एके दिवशी पितांबर म्हणाले, "तू पण ग्रॅज्युएट आहेस. तू वकिली शिक." इच्छेपुढे पैशांचे काय? कर्ज काढून प्रवेश घेतला.

 

विमलाचा दिनक्रम म्हणजे, पहाटे उठून घरचे आवरायचे, सासूबाई मदतीला असायच्याच. सांताक्रुझहून सकाळी वांद्य्राच्या लॉ कॉलेजला जायचे, तिथून निघून खाजगी कंपनीत कामाला जायचे. संध्याकाळी घरी आले की शिकवणी घ्यायची, मग पुन्हा घरचे आवरायचे आणि रात्री केव्हातरी अभ्यास करायचा. विमला म्हणतात, "या काळात पती आणि सासूने खूप प्रेरणा दिली." ती प्रेरणा आजही विमला वकिली पेशामध्ये जपत आहेत. विमला व्यावसायिक स्तरावर गुन्हेगारी खटल्यांची वकिली करतात. पण घरगुती हिंसाचार, घटस्फोट, महिलांचे लैंगिक शोषण या स्वरूपाच्या खटल्यांमध्ये त्या स्वतःहून समोरच्या व्यक्तीला मदत करतात. सामोपचाराने विवाद मिटवला जावा, यासाठी यशस्वी मध्यस्थी करतात. विमला म्हणतात, "कुटुंब ही मूल्यवान संपत्ती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या संपत्तीचे जतन करायला हवे. निरपराध व्यक्तीवर पहिल्यांदा विनाकारण गुन्हेगारीचा शिक्का बसतो. त्यावेळी तो आणि त्याचे कुटुंबही कोलमडते, भविष्य अंधारून जाते. एक वकील म्हणून आणि एक भारतीय स्त्री म्हणूनही एखाद्या घराला तुटण्यापासून वाचवणे, हे माझे पहिले कर्तव्य आहे."

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@