अनाथांचे मायबाप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2019
Total Views |




हजारोंच्या अनाथांचे मायबाप बनलेले भारद्वाज जोडपे समाजासाठी उत्कृष्ट काम करीत आहेत. समाजसेवेसाठी त्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची ही यशोगाथा...

 

समाजात अनाथांची कामे करणे, हेच कर्तव्य समजणारे भारद्वाज जोडपे अनाथांचे सर्वार्थाने देवदूत ठरले आहेत. त्यांच्या या कामाचा प्रेरणादायी प्रवास नक्कीच सगळ्यांना दिशा देणारा ठरणार आहे. माधुरी आणि डॉ. भारद्वाज दररोज त्यांच्या गावातून अलीगढला प्रवास करायचे. बसमध्ये त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर कित्येकदा चर्चा केली. हळूहळू या चर्चेचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी त्यांच्या या सामाईक स्वप्नाबद्दल एकत्र जगण्याचा निर्णय घेतला. आठ वर्षांनंतर त्यांनी लग्न केले आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला. दोघेही पेशाने डॉक्टर. नातेवाईंकांनी रस्त्यावर, अडगळीत सोडलेल्या आजारी रुग्णांना आपल्या घरात आणून त्यांची ती सेवा-सुश्रुषा करतात. या महान समाजकार्यासाठी त्यांनी संततीसुखावरही पाणी सोडले. कुटुंबीयांनीही त्याची पूर्ण कल्पना दिली.

 

अखेरीस, सात वर्षांनंतर, राजस्थानच्या भरतपूरमध्ये माधुरीच्या 27व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी 29 जून, 2000 रोजी ’मा माधुरी ब्रिज वरिस सेवा सदन, अपना घर’ स्थापन केले. ही अपना घर संस्था, 17 आश्रमांतील चार हजारांहून अधिक लोकांना मदत करते. त्यांच्या पत्नी आणि मदतनीसांसह डॉ. भारद्वाज बेघर, गरजू, दुःखी, असाहाय्य, मानसिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी, जखमी, मरणासन्न व्यक्तींना आपल्या सदनात आणतात. सामान्यतः रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, इतर सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी अत्यंत गंभीर, अनैसर्गिक आणि वेदनादायक स्थितीत असे लोक आढळतात. डॉ. भारद्वाज अशा लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आणि त्यांना घरगुती वातावरण, निवारा, मोफत वैद्यकीय उपचार आणि अन्न देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. संस्था वेगवेगळ्या प्रकारे पुनर्वसन करते, जेणेकरून ते समाजात मान-सन्मानाचे जीवन जगू शकतील. त्याचबरोबर अशा रुग्णांना पुन्हा त्यांच्या घराचे दरवाजे कसे उघडतील, याचाही संस्था विचार करते. त्यामुळे या संस्थेचा असा विश्वास आहे की, हे देवाचे कार्य आहे आणि ते मनापासून करणे हे आपले कर्तव्य आहे. नरेश जैन, या ‘अपना घर’च्या घरमालकाने दर महिन्याला तीन लाख रुपये भाडे मागितले होते. मात्र, भरतपूरला भेट दिल्यानंतर त्याचे मन बदलले. त्यांनी आपले संपूर्ण घर भारद्वाज यांना संस्थेसाठी दिले. अशा या ‘अपना घर’मध्ये ज्याला कोणालाही वैद्यकीय मदतीची गरज आहे, मग तो लहान असो, प्रौढ असो वा प्राणी असो, जे आजारी आहेत, त्या सगळ्यांना मदत मिळते.

 

डॉ. माधुरी आणि त्यांचे समाजसेवी पती भारद्वाज दोघेही गेल्या दोन दशकांपासून हे कार्य अविरतपणे करीत आहेत. ‘अपना घर’ या संस्थेचे देशभरात एकूण 17 आश्रम आहेत, जिथे निर्वासितांना आधार मिळतो. यात बहुतांश मानसिकदृष्ट्या आजारी रुग्णांचाही समावेश असून महिलांची संख्या एक हजारांहूनही जास्त आहे. डॉ. भारद्वाज सांगतात की, “आश्रमात सर्वप्रथम एक मानसिकदृष्ट्या आजारी असणारी महिला दाखल झाली. त्यावेळी ती गरोदर होती. नंतर तिच्या बाळाचे संगोपनही आम्हीच केले.”

 

‘अपना घर’ मध्ये आजारी रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच जात आहे. एक परिस्थिती अशी होती की, जेव्हा एकाच डबलबेडवर सात-आठ मुलं झोपायची आणि डॉ. भारद्वाज जमिनीवर पाठ टेकवायचे. अनाथ मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या या जोडप्याने मुलांना फक्त निवाराच नाही, तर चांगले शिक्षण देण्याचाही विडा उचलला आहे. या संस्थेतील सर्व मुले शाळेत जातात, तर ज्यांना खेळाची आवड आहे, त्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. डॉ. भारद्वाज म्हणतात की, “एक दिवस या मुलांना हे सर्व काही कळेल. त्यामुळे त्यांचं असं या जगात कोणीच नाही, ही भावना त्यांच्या मनात येऊ नये म्हणूनच आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणूनच या मुलांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करतो.”

 

या संस्थेत भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, बंगाल, गुजरात, बिहार आणि ओडिशासह अनेक राज्यांत, निराधार आणि विशेषतः मानसिक रुग्णांचा समावेश आहे आणि सगळ्या मुलांचे पालक म्हणजे भारद्वाज जोडपे. त्यांना सर्व मुले ‘आई’ आणि ‘बाबा’ अशीच हाक मारतात. “यासारखे दुसरे कुठलेही निरागस आणि पवित्र बंध जगात दुसरे नाही,” असे डॉ. भारद्वाज भावनिक होऊन सांगतात. असे हे जोडपे समर्पण भावनेने आपले कार्य करीत आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कामासाठी सर्वांनीच त्यांच्याकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. त्यांच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

 
- कविता भोसले 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@