प्लॅस्टिक आणि कॉंग्रेस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2019
Total Views |

एकवेळ कॉंग्रेस संपेल; पण प्लॅस्टिक नाही संपणार, असे आम्हीच कधीतरी म्हणालो होतो. आता कॉंग्रेसला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. अगदीच वैद्यक भाषेत सांगायचे झाल्यास, ‘क्लिनिकली कॉंग्रेस इज डेड’ अशीच अवस्था आहे. त्यातही आता नातेवाईकांना विचार करायचा आहे की व्हेंटिलेशन काढायचे का? नि काढायचे असेल तर कधी? तो निर्णय मात्र अत्यंत जवळच्या नातेवाईकांनीच घ्यायचा असतो. गोतावळ्यातल्या माणसांनी तर परिस्थिती पाहून काढता पाय घेतला होता. ती मंडळी भाजपात आली. हो, उगाच मरत्या म्हातार्याच्या उपचाराला ही मंडळी आपल्याला पैसा मागतील, म्हणून ही मंडळी भाजपात आली... तर सांगायचे हे की आता कॉंग्रेस संपलेली आहे. प्लॅस्टिक मात्र संपण्याचे नाव घेत नाही. आता भ्रष्टाचारमुक्ती बर्यापैकी साधली. कॉंग्रेसमुक्त भारत तर झालेलाच आहे. आता अशा वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच ते मनावर घ्यायला हवे. कारण त्यांनी मनावर घेतले की लोक मनावर घेतात अन् मग ते होते. ‘सबका साथ’ फक्त त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता प्लॅस्टिक मुक्ती हवी असेल तर मोदीजींनाच साकडे घालावे लागेल.
मागील एप्रिल महिन्यात राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. आताच्या एप्रिलमध्ये आंबे कॅरीबॅगमध्ये खुलेआम नेत आहेत लोक... आता मराठी नववर्षापासून म्हणजे गुढी पाडव्यापासून मागील वर्षी राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर करण्यात आली. आता या बंदीचे काय होणार, हा सवाल तेव्हाच होता. काही गोष्टींवर केवळ बंदीच जाहीर करता येते, ती अंमलात येतच नाही. आता एकदम मोठा दंड केला जाणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यावरही लोक पळवाटा काढतातच... म्हणजे मग इतके मायक्रॉन, तमका रंग... अशा पळवाटा असतात. काही बाबी अविभाज्य झाल्या आहेत, नाईलाज आहे. म्हणजे बघाना, दारू, गुटखा, तंबाखू यावर बंदी कितीदा येत असते. तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. आता कॉंग्रेस विरोधी दिवस रोजच आहे या देशात. सिगारेट, तंबाखूच्या पाकिटांवर वैधानिक इशाराही लिहिला असतो. लोक धर्म नाही मानत; पण हे तर विज्ञानाने सिद्ध केले आहे ना... ते तर माना की तंबाखू हा जीवनासाठी हानीकारक आहे. ते वाचत वाचत लोक सिगारेट ओढत असतात. दारूबंदी हा तर स्वतंत्रच विषय आहे. जिथे बंदी असते तिथे मोठ्या प्रामाणात दारू मिळत असते.
 
 
स्वदेशीचा वापर करा, हे तर महात्मा गांधींपासून अनेक जण सांगत आलेत... मात्र इम्पोर्टेड वस्तूंना जमके मागणी असतेच. आता हेही खरे की आम्ही वापरतो त्या अनेक वस्तूंमध्ये विदेशीची मिसळण झालेलीच असते. गाड्या, मोबाईल, कपडे, घड्याळी... जवळपास प्रत्येकच गोष्ट. अगदी पेन अन् त्यातल्या कांड्याही! त्यामुळे आता प्लॅस्टिकचेही तसेच झालेले आहे. कसे टाळणार? प्लॅस्टिक बंदी म्हणजे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्जवरच बंदी घातली तर घालता येऊ शकते. अनेक कंपन्या, दुकानदार त्यांच्या प्रतिष्ठानांच्या जाहिराती प्रिंट केलेल्या प्लॅस्टिकच्या बॅग्ज किमान वर्षभर पुरतील अशा छापून ठेवत असतात. एकतर त्या स्वस्त पडतात, टिकावू असतात... म्हणजे त्या पाण्याने, आर्द्रतेने सडत नाहीत. त्यांचा रंग जात नाही, त्यावरचे प्रिंटींगही जात नाही... आता त्यांनी खर्च करून कोट्यवधीच्या प्रमाणात या बॅग्ज तयार करून ठेवल्या आहेत तर मग त्याचे काय करायचे? आता वातावरण शांत झाल्यावर त्या बाहेर निघाल्या आहेत.
 
 
 
आता कुठल्याही गोष्टीच्या पॅकेजिंगला महत्त्व आहे. वस्तू कशीही असो, वेष्टण हे आकर्षकच असावे. पॅकेजिंग हे तर आता शास्त्र झाले आहे. त्याची डिग्री अन् नंतरचेही अभ्यासक्रम असतात. त्यात प्लॅस्टिकचा वापरच सर्वाधिक होतो. आमच्या लहानपणी डॉक्टर कुठल्याही आजारासाठी लाल द्रव भरून द्यायचे काचेच्या शिशीत. आता तर काचेच्या शिशा, बाटल्या जवळपास संपुष्टातच आल्या आहेत... कुठलाही द्रव पदार्थ भरण्यासाठी आता प्लॅस्टिकच्याच बाटल्या असतात. फायबरही त्यातलेच. अगदी तुमच्या दुचाकी, चारचाकींपासून घराच्या खिडक्या-दारांपर्यंत प्लॅस्टिक वापरले जात असते. प्लॅस्टिक-फायबर हे अमर्त्य आहेत.
आता भाजीही आणायची असेल विकत तर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्येच आणतात... परवा एका मित्राच्या ऑफिसला गेलो असताना त्याने जवळच्या हॉटेलमधून चहा बोलावला तर तोही त्याच्या प्युनने प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्येच आणला!
आमच्या लहानणी इतके प्लॅस्टिक नव्हते...आई, काकू, मावशी, आत्या... अशा घरच्या बायका टाकून दिलेल्या कपड्यांच्या पिशव्याच शिवायच्या... एकतर त्या काळात घरी शिवणयंत्र ही अत्यंत आवश्यक बाब होतीच. आता कपडे फाटण्याच्या आधीच टाकून दिले जातात. त्या काळात कपडे फाटल्यावरही शिवून घातले जायचे... गावात एक टेल्लर असायचा अन् एक रफ्फूवाला. त्या काळात घरचा पुरुष बाहेर पडताना ही पिशवी सोबतच घेऊन बाहेर पडायचा. गृहस्थ अन् त्यातही मध्यमवर्गीय गृहस्थ असण्याची ती खूणच होती. म्हणजे समजूतदार गृहस्थ आहे म्हणजे तो सायकलच्या कॅरिअरला पिवशी लावूनच बाहेर पडणार. म्हणजे काही आणायचे असेल तर त्यात आणता येत होते. ऑफिसहून येत असताना बाजारओळीतून भाजी अन् किराण्याचे काही जिन्नस घेऊनच आपले बाबा, काका, मामा ही मंडळी घरी यायची.
 
त्या वेळी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज नव्हत्या. एखादवेळी दुकानदार त्याच्याकडची पिशवी द्यायचे. बर्याचदा बाजारात कापडी पिशव्या विकायला असायच्या. किराणा दुकानदारही पिशव्या ठेवायचे विकायला. लोक त्याही घेत नसत फारशा. त्यापेक्षा घरीच जुन्या कपड्यांच्या पिशव्या तयार केल्या जात. आता प्लॅस्टिक आल्याने त्या पिशव्या मागे पडल्या. आता सगळेच कसे ‘वापरा आणि फेका’ सदरात जमा झालेले आहे. जुन्या काळी कपडेही अगदी चिंध्या होतपर्यंत वापरले जात. म्हणजे पिशव्या, गोधड्या करत लोक अन् मग तेही फाटले की त्यांचे हातपुसणे, जमीन पुसण्याचे पोतेरे केले जात. एक नक्की की प्लॅस्टिक आपल्या आयुष्यातून पूर्ण हद्दपार होऊ शकत नाही. कारण अगदी रंगांच्या बादल्यांपासून अशातही ते आले आहे. अगदी कपडे, चपलाही... पण किमान या कॅरीबॅग, वेष्टनासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक वापरायचे थांबविले तर खूप फरक पडणार आहे. तुम्ही कुठल्याही गावखेड्यात जा. गावाच्या भोवती असे भयाण वातावरण असते. प्लॅस्टिकच्या या पिशव्या पडून असतात. तसेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते असायचे ठणाणत. प्लॅस्टिकमुळे आता गवतही उगविणे बंद झाले आहे. आता तर कॉंग्रेस गवतही नाही उगवणार. कॉंग्रेसवर उपाय झाला, आता प्लॅस्टिकवर करावाच लागेल. सगळेच काही मोदींनीच करावे असे नाही. काही आम्हालाही करावेच लागेल. आता तर घरोघरी ही सिस्टीम सुरू करायला हवी. साड्या असतात, शर्ट- पँट असतात... खूप कपडे आहेत. त्यांच्या पिशव्या आपणच घरी तयार केल्यात ना तर पर्यावरणाची हानी थांबेल... पर्यावरण म्हणजे शेवटी असते काय? आपलेच आयुष्य ना?
@@AUTHORINFO_V1@@