स्मृतींकडून राहुल चारीमुंड्या चित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019   
Total Views |



 
एकेकाळी ज्या राज्यावर काँग्रेसची निरंकुश सत्ता होती, त्या पक्षाची अवस्था या निवडणुकीत मात्र अतिशय दारूण झाली. त्या पक्षास आणि त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना आणि उमेदवारांना तोंड लपविण्यासही जागा उरली नाही.
 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदीलाटेने घडविलेल्या चमत्काराचे दर्शन जसे देशातील जनतेला झाले, तसेच या चमत्कारामुळे सत्तेची स्वप्ने पाहणार्‍या अनेक नेत्यांचे मनोरथ धुळीस मिळाले. 23 मे नंतर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी नेस्तनाबूत होईल आणि आपल्या हाती सत्ता येईल, अशी आशा बाळगून असलेल्या बसप नेत्या मायावती, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या ‘महागठबंधन’चा दारूण पराभव झाला. बसप आणि सप यांच्या युतीमुळे आता देशातील या प्रमुख राज्यांमध्ये भाजपचे पानिपत होईल, असे आडाखे बांधले जात होते. पण त्या सर्वांचे अंदाज पार कोलमडले!

 

जातीय समीकरणे आखून निर्माण झालेल्या आणि केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या या ‘महामिलावटी’ महागठबंधन नावाच्या युतीस जनतेने झिडकारले. त्या राज्यातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 62 जागा जिंकून आपल्या बाजूने भक्कम जनमत असल्याचे भाजपने सिद्ध करून दाखविले. मायावती यांच्या बसपला 10 तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले! महागठबंधन करून अखिलेश यादव यांना लाभ होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागला. उत्तर प्रदेशात अपना दल (सोनेलाल) पक्षास दोन जागा मिळाल्या. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याविरुद्ध समाजवादी पक्षाने शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांना लखनौ मतदारसंघातून उभे केले होते. त्या तेथे हरणारच होत्या. मथुरा मतदारसंघातून अभिनेत्री हेमामालिनी पुन्हा विजयी झाल्या. बागपतमधून सत्यपाल सिंह, बरेलीमधून संतोषकुमार गंगवार ही काही भाजपच्या विजयी उमेदवारांची नावे.

 

एकेकाळी ज्या राज्यावर काँग्रेसची निरंकुश सत्ता होती, त्या पक्षाची अवस्था या निवडणुकीत मात्र अतिशय दारूण झाली. त्या पक्षास आणि त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना आणि उमेदवारांना तोंड लपविण्यासही जागा उरली नाही. काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख असलेल्या सोनिया गांधी यांचा रायबरेलीमधून विजय झाला. पण, त्यांचे पुत्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपच्या उमेदवार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दारूण पराभव केला. राहुल गांधी आणि काँग्रेसला, अमेठीमध्ये आपला पराभव होणार याची जाणीव झाल्यानेच त्यांनी केरळमधील वायनाड मतदार संघात धाव घेतली, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात असलेल्या अमेठीने राहुल गांधी यांचे नाक कापले गेले! उत्तर प्रदेशात काँग्रेसने एकूण 73 जागा लढविल्या होत्या. त्यातील फक्त एक जागा त्या पक्षाच्या पदरात पडली. अन्य 71 जागांवर उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशाचे नेतृत्व आपण करणार असल्याचे पतंग हवेत उडविणार्या काँग्रेसची पुरती वाताहत झाल्याचे या निकालांवरून दिसून येते.

 

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, माजी केंद्रीय मंत्री पुनिया यांचा मुलगा तनुज, जितीन प्रसाद, आर. पी. एन. सिंह, अन्नू टंडन आदी रथी - महारथी पराभूत झाले. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची धुरा ज्या राज बब्बर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली होती त्या अभिनेते राज बब्बर यांचाही फत्तेपूर सिक्री मतदारसंघात पराभव झाला. ज्या राज्यात एकेकाळी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती, त्या राज्यामध्ये त्या पक्षाच्या 73 पैकी 71 उमेदवारांची अनामत जप्त व्हावी, याला काय म्हणायचे! काँग्रेसचे उमेदवार प्रकाश जयस्वाल आणि इमरान मसूद या दोघा उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली.

 

उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये समाजवादी पक्ष आणि मायावती यांच्या बसपने युती केली होती. त्यामध्ये भाजप उमेदवारांचा झालेला पराभव लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना करण्यात आली. सप आणि बसप यांनी आपले कित्येक दशकांचे वैर विसरून ‘महागठबंधन’ निर्माण केले. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपची आता काही खैर नाही, असे वातावरण सप-बसप आणि अन्य विरोधी पक्षीयांनी तयार केले. पण मायावती-अखिलेश यादव यांनी युती करताना काँग्रेस पक्षाला दोन हात दूरच ठेवले. त्या पक्षासाठी अवघ्या दोन जागा सोडण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. त्यामुळे काँग्रेसला आपल्या पक्षाचे 73 उमेदवार उभे करावे लागले होते.

 

उत्तर प्रदेशमध्ये या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळाली, यावर नजर टाकली तरी भारतीय जनता पक्षाने त्या राज्यात सर्वांची गणिते कशी बिघडवून टाकली, हे दिसून येते. तेथे भाजपला 49.56 टक्के, बसपला 19.3 टक्के, सपला 18 टक्के, तर काँग्रेसला अवघी 6.3 टक्के मते तर राष्ट्रीय लोक दलास 1.67 टक्के मते मिळाली. तसेच 0.84 टक्के म्हणजे 7 लाख,25 हजार, 79 मतदारांनी ‘नोटा’ बटण दाबून उमेदवारांबाबतची आपली नापसंती व्यक्त केली.

 

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी जी जातीपातीची समीकरणे आखली होती, ती पार कोलमडून पडल्याचे दिसून आले. राज्यातील 20 टक्के मुस्लीम, 20 टक्के दलित आणि सात टक्के यादव अशा 47 टक्के मतांच्या आधारावर ‘महागठबंधन’ दिल्लीचे तख्त आपणास मिळेल, अशी स्वप्ने पाहात होता, पण भाजपने केलेल्या जोरदार प्रचारामुळे सप-बसपचे गणित प्रत्यक्षात येऊ शकले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळू न शकलेल्या मायावती यांच्या पक्षास दहा जागांपर्यंतच मजल मारता आली. त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न हवेत विरून गेले.

 

अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्षास रामराम ठोकून नवीन पक्ष स्थापन केला होता. आपला बालेकिल्ला असलेल्या फिरोजाबाद येथून त्यांनी निवडणूक लढविली होती पण तेथे त्यांना एक लाख मतेही मिळू शकली नाहीत. अनामत रक्कम वाचविण्यासाठी त्यांना एक लाख, 79 हजार मते मिळणे आवश्यक होते. पण तेवढीही मते त्यांना मिळू शकली नाहीत! उत्तर प्रदेशातील एक बहुचर्चित प्रस्थ म्हणजे रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या. प्रतापगढ या राजाभैय्या यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांच्या पक्षातर्फे अक्षय प्रताप सिंह उभे होते. त्यांना अवघी 46 हजार मते मिळाली आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली!

 

या निवडणुकीत समाजवादी पक्षास चांगलाच झटका बसला. त्या पक्षास फक्त पाच जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांची पत्नी डिम्पल यादव, धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव या यादव परिवारातील सदस्यांना पराभव पत्करावा लागला. अखिलेश यादव यांनी आपल्या कारकिर्दीत जे निर्णय घेतले, त्याचा त्यांना फटका बसल्याची चर्चा केली जात आहे. काका शिवपाल यादव यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय, काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय आणि मायावती यांच्या पक्षासमवेत युती करण्याचा निर्णय घेऊन अखिलेश यादव यांनी चूक केल्याची चर्चा आहे. यावरून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. पराभवाचा फटका बसलेल्या सपने आपल्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या 40 प्रवक्त्यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशसह देशभर भारतीय जनता पक्षाला जे प्रचंड यश मिळाले आहे, त्याचे श्रेय भाजप सरकारची लोकप्रियता, सरकारने हाती घेतलेल्या विविध कल्याणकारी योजना यांना दिले आहे. विद्यमान सरकारविरुद्ध देशभर वातावरण नव्हते. उत्तर प्रदेशमधील मतदारांनी ‘परिवारवाद’, ‘वंशवाद’ आणि ‘जातीवादा’चे राजकारण करणार्‍यांना धिक्कारले. विकास आणि राष्ट्रवाद यांना मतदारांनी अत्यंत महत्त्व दिल्याने पक्षाला हे यश मिळाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. एकूणच ज्या उत्तर प्रदेशवर विरोधकांची भिस्त होती, तेथेच त्यांना भाजपने अस्मान दाखविले. मतदार हा विकास आणि राष्ट्रवादासच अत्यंत महत्त्व देत असल्याचे त्या राज्याने दाखवून दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@