मेहबूबांची दास्ताँ मिटली...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019   
Total Views |



संपूर्ण देशभरामधील निवडणुकीमध्ये आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीमध्ये कायमच अंतर राहिले आहे. कश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर या तीन जिल्ह्यांतील काही भागांमध्ये रूतून बसलेला दहशतवाद हेच त्याचे कारण आहे. या जिल्ह्यातील काही तुरळक भागामध्ये अतिरेकी लपूनछपून दहशतवादी कारवाया करतात, मात्र त्यांच्या कारवायांना जगभर अतिप्रसिद्धी दिली जाते. त्यावरूनच जम्मू-काश्मीरच नव्हे, तर देशाच्याही निवडणूक मानसिकतेवर बदल होतो

 

जम्मू-काश्मीर राज्याचे निकाल तसे काहीसे धक्कादायक, तर काहीसे अंदाजाला मूर्त स्वरूप देणारे. जम्मू-काश्मीरच्या 6 जागांपैकी 3 जागा भाजपने तर 3 जागा जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या आहेत. मात्र, त्याचवेळी गेल्या निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरचे तीन जिल्हे जिंकणाऱ्या पीपल्स डेमोके्रटिक पार्टीला खाते उघडता आले नाही. यावेळी शून्य मिळवले आहेत, तर काँग्रेसनेही गेल्या निवडणुकीचाच ’झिरो’ पुन्हा मिरवला आहे. संपूर्ण देशभरामधील निवडणुकीमध्ये आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीमध्ये कायमच अंतर राहिले आहे. कश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर या तीन जिल्ह्यांतील काही भागांमध्ये रूतून बसलेला दहशतवाद हेच त्याचे कारण आहे. या जिल्ह्यातील काही तुरळक भागामध्ये अतिरेकी लपूनछपून दहशतवादी कारवाया करतात, मात्र त्यांच्या कारवायांना जगभर अतिप्रसिद्धी दिली जाते. त्यावरूनच जम्मू-काश्मीरच नव्हे, तर देशाच्याही निवडणूक मानसिकतेवर बदल होतो. इतकेच नाही तर जम्मू-काश्मीरचे विविध मुद्देही देशाची राजकीय मानसिकता घडविण्यासाठी कारणीभूत झालेले आहेत, हेच यावेळच्या निवडणुकीनेही सिद्ध केले आहे. निवडणूक रंगली ती 370 कलम आणि 35 ए या कलमांवरून. तसेही या कलमांवरून हे राज्य कायम विवाद आणि चर्चेतच असते.

 

यावेळच्या जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीमध्ये 370 कलम आणि 35 ए हे मुद्दे केंदस्थानी होतेच. पण, त्याचबरोबर पार्श्वभूमीला बुर्हान वाणी या दहशतवाद्याचा भारतीय लष्कराने केलेला खात्मा आणि पुलवामामध्ये पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला भ्याड हल्ला त्यानंतर भारतीय सरकारने आणि लष्कराने घेतलेली आक्रमक आणि निर्णायक भूमिका हे मुद्देही होतेच. त्याच्या परिणामांची परिणीती म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर राज्याचा निकाल म्हणावा लागेल. राज्याचे तीन जिल्हे अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर इथे 2009 सालापासूनच पाहिले तर कायमच मुस्लीम उमेदवारांच्या पारड्यात मते गेलेली आहेत, तर उर्वरित तीन जम्मू, उधमपूर, लडाख येथे अन्यधर्मीय उमेदवार जिंकले आहेत.

 

2014 मध्येही हा कित्ता गिरवलेला आहे. बारामुल्ला लोकसभा क्षेत्रामधून येथे 2014 साली मुझफ्फर हुसैन तर तारीक हमीद कारा श्रीनगर येथून आणि मेहबूबा मुफ्ती अनंतनाग येथून विजयी झाल्या होत्या. हे तिघेही जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे उमेदवार होते. उर्वरित तीन लोकसभा क्षेत्रांमध्ये भाजपने विजय मिळवला होता. त्यामध्ये लडाखमधून थुपस्तान छेवांग, जम्मूमधून जुगल किशोर आणि उधमपूर येथून जितेंद्र सिंग हे भाजपचे उमेदवार जिंकले होते. त्यावेळी जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचा एकही उमेदवार जिंकून आला नव्हता. तसेच काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी जम्मू आणि कश्मीर राज्याच्या निवडणुकीचे चित्र 50 टक्क्याने बदलले आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपले गड राखले आहेत. जम्मूमधून पुन्हा जुगल किशोर, उधमपूरमधून पुन्हा जितेंद्र सिंग जिंकले तर यावेळी भाजपने लडाखचा आपला उमेदवार बदलला आहे. लडाखहून यावेळी जामग्यांग तेसरींग नामग्याल जिंकले आहेत. 50 टक्के स्थिती कायम आहे. उर्वरित 50 टक्के मोठा झालेला बदल म्हणजे अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर येथील जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीची जागा जम्मू अॅण्ड कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने घेतली. या तीनही जागांवर नॅशनल कॉन्फरन्स जिंकली आहे. अनंतनाग लोकसभा क्षेत्रामध्ये हसनैन मसुदी, बारामुल्लात मोहम्मद अकबर लोन, श्रीनगरमध्ये फारूख अब्दुल्ला जिंकले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्लांना घरी बसावे लागले होते. तर या निवडणुकीमध्ये अनंतनागमधून निवडणूक लढवत असलेल्या मेहबूबा मुफ्तींना जनतेने नारळ दिला. मेहबूबा मुफ्ती हरतील, अशी अटकळ राजकीय विश्लेषकांनी लावली होती. मात्र, त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जातील, हे मात्र अनपेक्षित आहे. मेहबूबा मुफ्तींचे हरणे हे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

 

कारण जम्मू-काश्मीरच्या राजकारणामध्ये भाजपशी हातमिळवणी करत पीडीपीच्या मेहबूबा मुफ्तींनी 2014 साली वेगळाच अध्याय रचला होता. जम्मू-काश्मीर पूर्णतः जरी भाजप विचारकेंद्री नसला तरी मेहबूबा ज्या लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत होत्या, त्या अनंतनागमध्ये भाजपच्या विचारांचे समर्थक कमीच होते. त्यामुळे निवडून दिल्यानंतर मेहबूबांनी भाजपशी युती केल्याचे त्यांच्या स्थानिक परिसरात पटले नाही. अनंतनाग लोकसभा क्षेत्रात मेहबूबाच्या विरोधात वातावरण तयार झाले. याचाच परिणाम इतर मुस्लीमबहुल लोकसभा क्षेत्रामध्येही झाला. बारामुल्ला आणि श्रीनगर येथेही त्याचे पडसाद उमटले, तर दुसरीकडे भाजपशी युती तुटल्यानंतर आणि काही धर्मांध मुस्लीमबहुल भागात विरोध सुरू झाल्यानंतर मेहबूबांनी आपले विचार काहीसे बदलले. अतिरेकी, दहशतवादी यांच्या घरांना भेटी देणे, सहानुभूती व्यक्त करणे, 370 कलम आणि 35 ए या कलमावर भाजपने घेतलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर करताना मेहबूबा यांनी फुटीरतावादी विधान केले. त्यांच्या प्रत्युत्तराचे पडसाद देशभर उमटले. त्याचा परिणाम म्हणून मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी पक्षाचे इतर उमेदवारही जिंकू शकले नाहीत.

 
370 कलम रद्द केले तर काय होईल, अशी धमकी देताना मेहबूबा भारताला उद्देशून म्हणाल्या होत्या, “लो ना समझोगे तो मिट जाओगे ए हिन्दुस्तान वालों, तुम्हारी दास्तान तक भी ना होगी, दास्तान.” या वेळच्या निवडणुकीमध्ये काश्मिरी जनतेने मेहबूबा यांच्या पीडीपीची दास्तानच मिटवून टाकली आहे. दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे अब्दुल्लाही जिंकले आहेत, ते काही मुस्लीमबहुल भागातील लोकसंख्येला भावेल असे विधान करूनच. मात्र, देशद्रोहाचा कायदा आम्ही काढून टाकू, असे काश्मिरी अतिरेक्यांच्या पुनर्वसनाच्या आड म्हणणाऱ्या काँग्रेसला इथल्या जनतेने नाकारले आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांनी आपली निष्ठा मात्र भाजपकडे कायम ठेवली आहे. कायम एकाच अंगाने जाणारे जम्मू-काश्मीरचे राजकीय वातावरण यावेळी बदलेल का?

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@