इतिहास घडविणारा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019   
Total Views |

 

‘जनमान्यता’ हा ऐतिहासिक विजयाचा अतिशय महत्त्वाचा पैलू. जनता परंपरेने हा राष्ट्रीय विचार जगतच आली आहे. त्यांच्या जगण्याला ‘भाजप’ नावाच्या राजकीय पक्षाने स्वीकृती दिली आणि लोकांच्या जगण्याप्रमाणे आम्ही जगू, आम्ही वागू,’ असे पाच वर्षे दाखवून दिले. लोकांचा विश्वास संपादन केला. ही मंडळी आपला विश्वासघात करणार नाहीत, असे लोकांना वाटले. म्हणून त्यांनी, प्रचंड विपरीत प्रचार असतानादेखील, आपलेच प्रतिबिंब असणार्या आपल्या लोकांना पुन्हा सत्तास्थानी बसविले. ही ऐतिहासिक घटना आहे.

 

ऐतिहासिक विजयया शब्दात भाजपच्या विजयाचे वर्णन केले जाते. हा विजय ऐतिहासिक का आहे? याचे उत्तर असे की, हा विजय विचारधारेचा विजय आहे. या देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून दोन मुख्य विचारधारा चालू होत्या. पहिली विचारधारा राष्ट्रीय विचारांची आहे. तिचे उद्गाते बंकिमचंद्र, विवेकानंद, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी थोर मंडळी होती. दुसरी विचारधारा समाजवादी विचारांची होती. तिचे उद्गाते पं. जवाहरलाल नेहरू, एम. एन. रॉय, श्रीपाद डांगे इत्यादी मंडळी होती. लोकमान्य टिळक हयात असेपर्यंत राष्ट्रीय विचारांचे प्राबल्य होते. गांधीजी हयात असेपर्यंत त्यांनी ‘समाजवाद’ आणि ‘साम्यवाद’ यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

 

पं. नेहरूंच्या हातात देश आल्यानंतर समाजवादी विचार, देशाचा मुख्य विचार करण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट मंडळी काँग्रेसमध्ये घुसली. त्यांनी आपली ओळख डावी विचारसरणी’ अशी केली. ते स्वतःला ‘प्रोग्रेसिव्ह’, ‘रॅशनलिस्ट’, ‘आधुनिक’ म्हणू लागले. राष्ट्रीय विचार, पुराणपंथी, मागासलेला, देशाला मध्ययुगात घेऊन जाणारा ‘प्रतिगामी’ ठरविण्यात आला. या विचारांप्रमाणे चालणार्या संस्था सार्वजनिक जीवनात अस्पृश्य ठरविल्या गेल्या. या विचारांना धरून काम करणार्यांना बौद्धिक व्यासपीठे बंद झाली. ही सर्व मंडळी समाजाला धोकादायक आहेत. ते प्रभावी झाले, तर देशाचे तुकडे होतील. देशाची बहुविधता धोक्यात येईल, असा प्रचार झाला. टिळक-गांधींची राष्ट्रीय काँग्रेस, नेहरू घराण्याची आणि विचारांंची काँग्रेस झाली. गेली जवळजवळ साठ वर्षे या देशात त्यांचे प्रभुत्व राहिले. २०१४ साली या प्रभुत्वाला फार मोठा हादरा बसला. २०१९ साली नेहरू घराण्याची विचारधारा शवपेटीत गेल्यात जमा झाली आहे. हा ऐतिहासिक विजय आहे.

 

येथून पुढे देश राष्ट्रीय विचारधारेवर चालणार आहे. या राष्ट्रीय विचारधारेची वैशिष्ट्ये अशी आहेत.


* ती सर्वसमावेशक आहे.


* विविधतेत एकता जपणारी आहे.


* सत्य एक असून ते जाणण्याचे मार्ग अनेक आहेत
, हे मानणारी आहे.


* ही विचारधारा उपासना भेद स्वीकारीत नाही.


* ही विचारधारा जातीय भेद स्वीकारीत नाही.


* ही विचारधारा अस्पृश्यता स्वीकारीत नाही.


* ही विचारधारा हे मानते की
, अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे.


* ही विचारधारा हे मानते की
, केवळ भौतिक विकास हे आपले राष्ट्रीय लक्ष्य राहू शकत नाही.


* आध्यात्मिक विकास हे आपले सर्वात मोठे राष्ट्रीय लक्ष्य आहे.


* ही विचारधारा चारित्र्य निर्माणावर
, मूल्यांनुसार जगण्यावर भर देणारी आहे.


* जसे बोलू तसे वागू
, जसा विचार तसा व्यवहार करू, हा तिचा मंत्र आहे.

 

यापूर्वी २०१४ साली या विचारधारेचा राजकीय विजय झाला. आता २०१९ साली या विचारधारेच्या राजकीय विजयावर जनतेने आपली मोहोर उमटवली आहे. याचा अर्थ असा झाला की, जनतेने हा आपला सनातन विचार स्वीकारलेला आहे. विचाराला जनमान्यता प्राप्त झाली आहे. जनमान्यता हा ऐतिहासिक विजयाचा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. जनता परंपरेने हा राष्ट्रीय विचार जगतच आली आहे. त्यांच्या जगण्याला भाजप नावाच्या राजकीय पक्षाने स्वीकृती दिली आणि लोकांच्या जगण्याप्रमाणे ‘आम्ही जगू, आम्ही वागू,’ असे पाच वर्षे दाखवून दिले. लोकांचा विश्वास संपादन केला. ही मंडळी आपला विश्वासघात करणार नाहीत, असे लोकांना वाटले. म्हणून त्यांनी, प्रचंड विपरीत प्रचार असतानादेखील, आपलेच प्रतिबिंब असणार्या आपल्या लोकांना पुन्हा सत्तास्थानी बसविले. ही ऐतिहासिक घटना आहे.

 

येथून पुढे देशाचे राजकारण राष्ट्रीय विचारांवर चालेल. राष्ट्रीय विचाराच्या राजकारणाची काही प्रमुख सूत्रे आहेत. ती अशी-

 

* देशभक्तीची भावना उपजत हवी. ती शिकवायला लागू नये.

 

* देशाची मूल्य परंपरा बलवान करणारे राजकारण करावे लागेल.

 

* देशाच्या संस्कृतीचा, सांस्कृतिक मूल्यांचा, श्रद्धास्थानांचा आदर करावा लागेल.

 

* राजकारणाचा मुख्य आधार सर्वांना न्याय, हाच ठेवावा लागेल.

 

* राष्ट्रीय भावना वाढविणारे सण-उत्सव, यात्रा-मेळावे, यांना बळ द्यावे लागेल.

 

* राष्ट्रीय दृष्टीने इतिहासाची पुनर्मांडणी करावी लागेल.

 

* जे आक्रमक आहेत, त्यांना ‘आक्रमक’ म्हणावे लागेल आणि जे कत्तलखोर आहेत, त्यांना ‘कत्तलखोर’ म्हणावे लागेल.

 

* उपासना पंथाची विविधता तशीच ठेवून आम्ही प्रथम भारतीय आहोत, भारत आमची माता आहे, भारतीय संस्कृती आमची आहे, भारतीय जीवनमूल्ये आमची आहेत, भारतीय अध्यात्म आमचा आहे, हा भाव सर्व लोकांत निर्माण करावा लागेल.

 

हे काम अवघड असले तरी धडाडीने करण्याचे आहे. विपरीत विचार बाळगणारे आपटले असले तरी पूर्ण झोपी गेलेले नाहीत. ते याचा विरोध करतील. त्यांचा आवाज, त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त असतो. पण तो कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज समजला पाहिजे. शरीर लहान असले तरी आवाज खूप मोठा. त्याला अजिबात घाबरता कामा नये. आपण सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. ‘सत्यमेव जयते’ हे आपले बोधवाक्य आहे. आजवर असत्याचा बोलबाला झाला. सत्यमेव जयते फक्त राजमुद्रेवर राहिले. ही राजमुद्रा येथून पुढे जगावी लागेल. हा जगण्याचा कालखंड हा या ऐतिहासिक विजयाचा कालखंड आहे. इतिहास घडविणाऱ्या या विजयाने नवीन इतिहास लिहिण्याची जबाबदारी सर्वांच्या खांद्यावर टाकली आहे. येथून पुढे राज्यघटना जगण्याचा कालखंड निर्माण करावा लागेल. सर्वसमावेशकता, सर्व पंथांचा आदर, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राचे ऐक्य, राष्ट्राची एकात्मता, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आणि सार्वत्रिक बंधुभाव ही आपल्या राज्यघटनेची मूल्ये आहेत. ही मूल्ये आपल्या सर्वांना जगायची आहेत. मूल्ये जगणे म्हणजे राज्यघटना जगणे आणि तिचा अंमल करणे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@