हिंदीभाषक राज्ये, बंगालमधील विजय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2019
Total Views |

उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील विजय भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सत्तेपर्यंत नेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. दक्षिणेत तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यांत भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना फारशा जागा मिळाल्या नसल्याने झालेली कमजोर बाजू या राज्यांनी सावरून धरली. एकंदरीत, या राज्यांनी भाजपाला दिलेली साथ देशात मोदींची निव्वळ सुप्त लाटच नव्हे, तर त्सुनामी होती, हे दर्शवून गेली. सतराव्या लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळवत 340 च्या विजयी आकड्याकडे धाव घेतली असताना, त्यात उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील जागांचे निकाल अतिशय महत्त्वाचे ठरले. या तिन्ही राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. उत्तरप्रदेशातील निवडणुकीने प्रचारादरम्यान अनेक रंग पाहिले. 2014 च्या निवडणुकीत या राज्याने भाजपाला 74 जागा देऊन सत्तेची माळ मोदींच्या गळ्यात घातली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष या राज्यात कशी कामगिरी करतो, याकडे सार्या देशातील राजकीय पंडितांच्या नजरा लागल्या होत्या. गेल्या वेळी रालोआची सत्ता आली तेव्हा राज्यात सरकार होते समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील अखिलेश यादव यांचे. पण, 2019 मध्ये भाजपाची केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता असतानाही, सपा आणि बसपाने तयार केलेल्या गठबंधनाने भाजपापुढे जबरदस्त आव्हान उभे केले होते. भाजपाला खिंडीत गाठण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण त्यापैकी एकही सफल झाला नाही.
 
निवडणुकीसाठी महिनाभर आधी देशात महागठबंधनाची चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने कॉंग्रेस पक्षाला बाजूला सारून राज्यात अर्ध्या-अर्ध्या जागा वाटून घेतल्या. केवळ रायबरेली आणि अमेठी या जागा कॉंग्रेससाठी ठेवण्यात आल्या. तथापि, हाच निर्णय महाआघाडीतील बेबनावासाठी पुरेसा ठरला. राज्यात केवळ दोन जागा सोडून जखमेवर मीठ चोळण्याच्या प्रकारामुळे संतापलेल्या कॉंग्रेस नेतृत्वाने राज्यातील सर्व 80 जागा स्वबळावर लढविण्याचा आणि गांधी परिवारातील प्रियांकाला निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांची मते विभागली गेली. महागठबंधन केवळ कागदावरच राहिले. धुंवाधार प्रचार करून भाजपाने महागंठबंधनचा हत्ती झोपविला, समाजवादी कॉंग्रेसची सायकल पंक्चर केली आणि कॉंग्रेसचा हातदेखील आडवा केला. वाराणसी मतदारसंघातील नरेंद्र मोदी यांच्या रोड शोने देशातील सारे विक्रम मोडीत काढले. वाराणशीतील नागरिक ‘हर हर मोदी घर घर मोदी’ आणि ‘फिर एक बार मोदी सरकार’ असे नारे देताना आढळून आला. या रोड शोचा परिणाम देशातील इतर मतदारसंघांवरही पडला. प्रत्येक टप्प्यात भाजपाची स्थिती मजबूत होत गेली. उत्तप्रदेशात भाजपाने आज 80 पैकी 60 जागांवर आघाडी घेतली असून, बसपाने 11, सपाने 6 तर कॉंग्रेस व इतरांनी अनुक्रमे 1 व 2 जागांवर आघाडी घेतली आहे.

 
भाजपासाठी दुसरे महत्त्वाचे राज्य ठरले पश्चिम बंगाल. या राज्यात गेल्या वेळी डाव्यांचा माज उतरवून ममतादीदींनी 34 जागा तृणमूल कॉंग्रेसच्या पदरात पाडून घेतल्या होता. डाव्या पक्षांना आणि भाजपाला येथे केवळ प्रत्येकी 2 जागा जिंकता आल्या होत्या. पण, गेल्या पाच वर्षांत परिस्थिती प्रचंड बदलली. डाव्यांचा सफाया करून सत्तेत आलेल्या दीदींनी संघ आणि भाजपालाच आपले लक्ष्य केले. सातत्याने संघावर टीका करणे, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सभेवर बंदी घालणे, दुर्गापूजा आणि मोहर्रमचा सण एकाच दिवशी आला असताना दुर्गापूजेच्या मिरवणुका पुढे ढकलून शुभमुहूर्ताला खोडा घालण्याचे प्रकार ममतादीदींनी केले. मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा तर त्यांनी विक्रमच केला. मदरशांमधील शिक्षकांना सरकारी खजिन्यातून मदत, मुस्लिम सणांसाठी सवलती, रामनवमीच्या यात्रांवर बंदी अथवा बंधने, योगप्रसारावर बंदी आणि लोकसभेच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांच्या विमानांना सभास्थळी उतरू न देण्याचे पापही ममतादीदींनी केले. मा, माटी आणि मानुषच्या बाता करणार्या ममतांनी गेल्या पाच वर्षांत दडपशाहीची सीमा ओलांडली. यंदा तर त्यांनी कहरच केला. जय श्रीरामच्या घोषणा देणार्या कार्यकर्त्यांना त्यांनी तुरुंगाची हवा दाखविली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटण्यातही दीदी मागे नव्हत्या. याविरोधात जनतेच्या रोषाचा एकंदरीत परिणाम निवडणुकीच्या निकालांमधून डोकावला आहे. भाजपाने त्याविरुद्ध रणिंशग फुंकून 42 पैकी 18 जागांवर कब्जा केला. तृणमूलला 23 वर रोखण्यात यश आले असून, कॉंग्रेसला राज्यात केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. डाव्यांचे तर खातेही उघडले नाही. महागठबंधन कसे कागदावर अस्तित्वात होते, याचे एक जिवंत उदाहरण म्हणून पश्चिम बंगालमधील राजकारणाकडे बघावे लागेल. या महाआघाडीतील सारेच पक्ष येथे एकमेकांविरुद्ध लढत होते.
 
भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचविणारे आणखी एक राज्य म्हणजे बिजू जनता दलाचा दबदबा असलेले ओडिशा. या राज्यात भाजपा अतिशय कमकुवत होती आणि येथे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या लोकप्रियतेला धक्का देऊ शकणारे नेतृत्व भाजपाकडे नव्हते. पण, सत्तापक्षाच्या विरोधातील लाटेवर स्वार होत आणि बेरजेचे राजकारण करीत ओडिशातील 21 पैकी 8 जागा काबीज करीत बिजू जनता दलाला मोठा धक्का दिला आहे. या राज्यात कॉंग्रेसला फक्त 1 जागा जिंकता आली. बिजू जनता दलाने 13 जागा कायम ठेवताना राज्यातील विधानसभेत मात्र अतिशय चांगले प्रदर्शन केले. नवीन पटनायक विधानसभेच्या शंभरावर जागा जिंकून पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. सारे कयास बाजूला सारत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद स्वतःकडे खेचून आणले आहे. बिजू जनता दलाने येणार्या काळात रालोआत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. या तिन्ही राज्यांत मोदींची जादू चालली. गत पाच वर्षांत मोदींनी ज्या योजना शहरी आणि ग्रामीण जनतेसाठी लागू केल्या, त्याची परिणती विजयात दिसून आली.
 
 
 
 
जनधन योजना असो, उज्ज्वला गॅस योजना, आयुषमान भारत या सार्या योजनांचे लाभार्थी सर्वत्र बघायला मिळाले. पंतप्रधान आवास योजनेची फळेही ग्रामीण भागातील जनतेला चाखायला मिळाली. मुख्य म्हणजे ही घरे वाटप करताना लाभार्थी व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, हे बघितले गेले नाही. त्याचा मोठा परिणाम बघायला मिळाला. केंद्रातील मोदी सरकार मुस्लिमविरोधी असल्याची जी हवा निर्माण केली गेली होती, तीसुद्धा या योजनांच्या लाभामुळे आपोआपच दूर झाली. तिहेरी तलाकच्या मुद्यावरून मुस्लिमांमध्ये सरकारविरोधी वातावरण तयार केले गेले. तक्रारीवरून मुस्लिम पुरुषांना तुरुंगात जावे लागले, तर कुटुंबाच्या उदरभरणाचा प्रश्न कोण सोडवणार? असे प्रश्न उपस्थित करून हे विधेयक शरीयत कायद्यात हस्तक्षेप असल्याची आवईदेखील उठविली गेली. पण, हे सारे आक्षेप खोडून काढत मुस्लिम महिलाच भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी सत्तेसाठी एकत्र आलेल्या महागठबंधनच्या नेत्यांना झुगारून लावले. या सार्या विजयासाठी मोदी सरकारचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@