नाशिक लोकसभा मतदारसंघ : शिवसेनेने गड राखला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


 


नाशिकमध्ये एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येण्याची परंपरा नाही. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांत राजकीय पक्षांनी विद्यमान खासदारास पुन्हा संधी दिल्याचे दिसून आलेले नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रामुख्याने युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ, भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यात लढत होती. सन २००९च्या निवडणुकीत हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ हा रंगलेला सामना या निवडणुकीत पुन्हा पाहावयास मिळाला. तसेच, सिन्नर येथील माणिकराव कोकाटे यांची अपक्ष लढत इतर तीन उमेदवारांना जोरदार लढत देणार, असे वाटत होते. त्यांच्या उमेदवारीमुळे सिन्नर तालुक्यातील मतांचे विभाजन होऊनदेखील त्याचा फारसा फरक पडला नसल्याचे निकालावरून दिसून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचे फड रंगले होते. मात्र, पिंपळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाशिक येथे झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा या चर्चेच्या केंद्रस्थानी ठरल्या. मोदी यांच्या सभेचा फायदा हेमंत गोडसे यांना झाल्याचे या निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे. या सभेत मोदी यांनी ‘नार-पार’चा प्रश्न, कांदा प्रश्न याबाबत धोरण स्पष्ट केल्याने मतदारांना आपला निर्णय घेणे सोयीचे ठरले. त्याचीच परिणीती म्हणून गोडसे यांच्या विजयाच्या निकालाकडे पाहावयास हवे. तसेच, नाशिक शहर दत्तक घेतल्यावर फडणवीस यांनी नाशिकमध्ये केलेल्या कामांची यादीच सादर केली. त्याचाही फायदा गोडसे यांना झाला. तसेच, राज यांचे कर्तृत्व नाशिककरांनी अनुभवले असल्याने राज यांचे आवाहन साफ नाकारल्याचे चित्र या निकालावरून दिसून येते. नाशिक लोकसभा मतदार संघातून हेमंत गोडसे यांचा विजय हे नाशिक शहरात शिवसेनेची पर्यायाने युतीची पकड मजबूत असल्याचे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या निकालांच्या आडून आगामी विधानसभा निवडणुकांकडे पाहिल्यास विधानसभेत नाशिकमधून युतीचे पारडे जड असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@