निकालासोबतच अनेकांचाही लागणार ‘निकाल’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
देशाचेच नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी सकाळी सुरू होत आहे. या मतमोजणीचा कल दुपारपर्यंत समजून जाईल आणि रात्रीपर्यंत निकालही जाहीर होऊन जातील. या लोकसभा निवडणुकीचा यावेळी निकाल काय राहील, हे सर्वच एक्झिट पोलने जाहीर केले आहे. पण, सोबतच या निकालासोबतच अनेक दिग्गजांचाही ‘निकाल’ लागणार आहे. त्यामुळे आता भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील आणि कोणत्या वाहिनीचा एक्झिट पोल तंतोतंत (एक्झॅक्ट) पोल ठरतो, एवढीच उत्सुकता आहे.
 
देशात आजपर्यंत लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्या, ही 17 वी निवडणूक होती, पण यावेळी लोकसभा निवडणुकीत जे नाट्य घडले, ते आधी कोणत्याच निवडणुकीत घडले नाही. यावेळची निवडणूक ‘न भूतो न भविष्यती’ अशी झाली. यावेळच्या प्रचारात जेवढी खालची पातळी गाठली गेली, तेवढी याआधी कधीच गेली नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. भाजपाच्या नेत्यांना प्रचारापासून वंचित करण्याचा तसेच मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला.
 
 
 
एक्झिट पोलच्या कलामुळे भाजपात पर्यायाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रचंड उत्साह संचारणे स्वाभाविक होते, तर विरोधी पक्षांनी हादरणे. बारावीच्या परीक्षेत आपण गुणवत्ता यादीत आलो आहे, हे आधीच समजल्यावर विद्यार्थ्यांची जी स्थिती होईल, तशी भाजपा आघाडीची झाली आहे, तर आपण अनुत्तीर्ण झाल्याचे दोन दिवस आधी समजल्यावर एखादा विद्यार्थी जशी आदळआपट करतो, आपल्या अपयशाचे खापर मास्तरांवर फोडण्याचा जसा प्रयत्न करतो, तशी स्थिती कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची झाली आहे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आपल्या पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडणे सुरू केले आहे. मंगळवारी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पुढाकाराने राजधानी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर, निवडणूक आयोगाची भेट घेत इव्हीएमचे रडगाणे गाण्यात आले. इव्हीएमवरून गदारोळ माजवण्याचा विरोधी पक्षांचा हा प्रयत्न म्हणजे रडीचा डाव म्हणावा लागेल.
याच इव्हीएमवरून झालेल्या निवडणुकीत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान तसेच पंजाबमध्ये कॉंग्रेसला, दिल्लीत आपला, कर्नाटकात जनता दल आणि कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले, तेव्हा हेच इव्हीएम विरोधी पक्षांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शी होते, आज त्याच इव्हीएममध्ये त्यांना गैरप्रकार दिसतो आहे. तुम्ही आपल्या डोळ्यांवर जसा चष्मा चढवाल, तसे तुम्हाला जग दिसत असते. या राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी इव्हीएममध्ये गैरप्रकार करून विजय मिळवला, असे म्हटले तर ते विरोधकांना मान्य होईल का?
 
 
 
 
कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष इव्हीएमवरून जेवढे अकांडतांडव करतील, तेवढे त्यांचेच नुकसान होणार आहे, जनमानसातील त्यांची प्रतिमा डागाळणार आहे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आपल्या वागणुकीने आधीच जनतेचा विश्वास गमावला आहे. कोणत्याही निवडणुकीत जय आणि पराजय होतच असतो. जय झाल्यावर जसा तो नम्रपणे स्वीकारायचा असतो, तसाच पराभवही खिलाडू वृत्तीने मान्य करायचा असतो, पण याचे भान विरोधी पक्षांना राहिले नाही. कोणताही विजय हा जसा अंतिम नसतो, तसा कोणताही पराभव हा अंतिम नसतो. आज पराभव झाला म्हणजे आपले राजकारण संपले, आपल्याला कोणतेही भवितव्य उरले नाही, असे समजणे चुकीचेच नाही, तर राजकीय दिवाळखोरीचेही आहे. पराभवानंतर कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करत आपल्या पराभवाच्या कारणांचा आणि आपल्याकडून झालेल्या चुकांचा आढावा घेत आपल्या वागणुकीत सुधारणा करणे अपेक्षित आहे.
विरोधी पक्षांनी निकाल लागण्याआधीच इव्हीएमवरून अकांडतांडव करणे म्हणजे त्यांनी एक्झिट पोलचा कल मान्य करण्यासारखे आहे. विरोधी पक्षांनी आधीच गळा काढण्यापेक्षा निकालाची वाट पाहात थांबायला हरकत नव्हती. निकाल लागल्यावर हंबरडा फोडला असता, तर एकवेळ ते समजून घेता आले असते. राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागले नाही तर ‘खून की नदीयॉं बहाने की’ जी धमकी दिली, ती अतिशय धक्कादायक तसेच तेवढीच निषेधार्ह आहे. कुशवाह आतापर्यंत मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांची ही कृती आणखीनच बेजबाबदारपणाची ठरते.
 
 
 
केंद्रात पुन्हा भाजपाचे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न करणार्यांत, आधी रालोआत असलेले आणि नंतर रालोआ सोडलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, रालोसपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह तसेच योगी मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलेले ओमप्रकाश राजभरसारखे नेते आघाडीवर आहेत, हा योगायोग म्हणायचा का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली असभ्य भाषेतील टीका या देशातील जनतेला मान्य नव्हती, असे एक्झिट पोलवरून दिसते आहे. राहुल गांधींनी राफेल मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर ठरवण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. मोदी चोर नाही तर देशाच्या एकतेचे, अखंडतेचे चौकीदार आहेत, असे जनतेने आपल्या कौलातून दाखवले आहे.
विरोधी पक्ष इव्हीएमवरून गदारोळ करत असताना, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने मतमोजणीच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांचीच पुन्हा नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे आता भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड करण्याची औपचारिकताच बाकी आहे. ज्या पद्धतीने भाजपा आपल्या मित्रपक्षांना निकालाच्या आधी सन्मानाची वागणूक देत आहे, ती पाहता भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपा आपल्या मित्रपक्षांना दूर करणार नाही, तर त्यांना सन्मानाने सरकारमध्ये सहभागी करून घेईल, हे निश्चित आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून रालोआचा विस्तार होत आहे. मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आयोजित केलेल्या भोजनबैठकीला 39 राजकीय पक्षांपैकी 36 पक्षांचे नेते उपस्थित होते, अनुपस्थित असलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांनी पत्राद्वारे मोदींच्या नेतृत्वाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्यामुळे मोदी सरकारने सुरू केलेली विकासकामे तसेच कल्याणकारी योजना नव्या मोदी सरकारला पुढेही सुरू ठेवता येणार आहेत. आपल्या विजयाबद्दल तसेच भाजपाला बहुमत मिळणार असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे आश्वस्त होते, त्यामुळेच वाराणसी या आपल्या मतदारसंघात मतदान सुरू असताना मोदी तेथून काही हजार कि.मी. दूर असलेल्या केदारनाथच्या गुफेत ध्यान करत होते.
 
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेथील विरोधी पक्ष जवळपास 15 वर्षांत त्यांना ओळखू शकला नाही, आता पाच वर्षे देशाचे पंतप्रधान असताना राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्ष मोदींना ओळखू शकले नाहीत. देशात भरधाव निघालेल्या मोदींच्या विजयरथाला रोखण्याची ताकद देशात कोणत्याच पक्षामध्ये नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर मोदी यांच्या पासंगालाही पुरत नाहीत, मोदींसमोर राहुल गांधी शब्दार्थाने बच्चा आहे आणि आणखी काही वर्षंतरी बच्चाच राहणार आहे.
मोदी हे वेगळेच रसायन आहे. आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेल्या मोदींच्या नेतृत्वावर जेवढी टीका होते, विरोधक त्यांच्यावर तुटून पडण्याचा जेवढा प्रयत्न करतात, तेवढे त्यांचे नेतृत्व 24 कॅरेटच्या सोन्यासारखे उजळून निघते. विरोधी पक्षांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत मोदींवर शब्दश: शिव्यांची लाखोली वाहिली. मोदींनी शिव्यांच्या या लाखोलीचा जनतारूपी सोनाराकडून रत्नहार बनवून घेतला. आज तोच रत्नहार घालून मोदी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने पंतप्रधानपदाची दुसर्यांदा शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. नरेंद्र मोदींचे नेतृत्व हे या देशाची गरज आहे, मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एकदा जनतेला अपेक्षित अशा समृद्ध आणि बलशाली भारताच्या नव्या युगाचा प्रारंभ होणार आहे...
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@