इव्हीएमविरुद्धचा कांगावा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |

आज सारा देश, एका राष्ट्रीय उत्सवाच्या समारोपाच्या टप्प्यात आहे. गेला सुमारे महिनाभर चाललेल्या निवडणूकप्रकियेचा शेवट आज होऊ घातला आहे. मतमोजणीनंतर जाहीर होणार्या निकालांवर खरंतर सर्वांचाच विश्वास असला पाहिजे. कारण शेवटी त्यातून या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील गुपित उघड होणार आहे. त्यांनी बजावलेल्या मतदानाचा तो स्वाभाविक परिणाम असेल. त्यांच्या मताधिकाराचा कल त्यातून स्पष्ट होणार आहे. पण, तो सहजपणे स्वीकारून शिरसावंद्य मानतील ते राजकारणी कसले? शिवाय अलीकडच्या काळात तर भलत्याच मुजोर वळणावर चालले आहे भारतातले राजकारण. निवडणुकीचा निकाल आपल्याच बाजूने लागावा, अन्यथा सार्या प्रक्रियेवर तोंडसुख घ्यायला सरसावणार्यांची एक वेगळीच जमात तयार झाली आहे राजकारण्यांची आताशा. छत्तीसगड-मध्यप्रदेशातले निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागले. निदान दीड दशकांची सत्ता भाजपाच्या हातून हिरावली गेली. पण, म्हणून भाजपाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर आक्षेप घेतला नाही. निकाल आपल्या बाजूने लागलेले असल्याने असेल कदाचित, पण कॉंग्रेस नेत्यांनाही त्याबाबत चकार शब्दाने काही बोलावेसे वाटले नव्हते.
राजस्थानपासून तर पश्चिम बंगालपर्यंत सर्वदूर भाजपाविरोधकांची सत्ता याच इव्हीएम मशीनच्या माध्यमातून पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेद्वारे स्थापित झाली आहे. पण, आपण सोडून दुसर्या कुणाच्या विजयाची शक्यता निर्माण झाली, की अपयशाचे खापर दुसर्या कुणाच्यातरी माथ्यावर मारण्यासाठी सरसावलेल्या मंडळीच्या निशाण्यावर सध्या इव्हीएम मशीन आहे. पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांतून यश बव्हतांशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता नजरेसमोर दिसू लागताच, भाजपाविरोधक कधी नव्हे इतके बिथरले आहेत. विद्यमान केंद्र सरकारविरुद्ध एवढे रान पेटवल्यावरही यशाची कमान हाती लागत नाहीय् म्हटल्यावर अजून दुसरे काय होणार म्हणा! राहुल गांधींपासून चंद्राबाबू नायडूंपर्यंत, गुलामनबी आझादांपासून अरविंद केजरीवालांपर्यंत, ममता बॅनर्जींपासून राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांपर्यंत, झाडून सर्वांचा थयथयाट सुरू झाला आहे.
लोकसभा निवडणूक घोषित झाली. कॉंग्रेसपासून आपपर्यंत, राष्ट्रवादीपासून तृणमूल कॉंग्रेसपर्यंत, तेलुगू देसमपासून तर भाकपापर्यंत सर्वांनी त्यात सहभाग घेतला. आपापल्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे केले. ते निवडून यावेत म्हणून प्रचार केला. मोठ्ठ्यानं भाषणं ठोकलीत. विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांना पराभूत करण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न केलेत. तोवर, ही निवडणूक इव्हीएम मशीनद्वारेच होणार असल्याची बाब कुणापासून लपून ठेवली होती का निवडणूक आयोगाने? मग निवडणुकीची सारी प्रक्रिया पार पडेपर्यंत नाही आठवलं कुणालातच की, या यंत्रात फेरफार करता येऊ शकतो म्हणून? तोवर कुणालाच धाव घ्यावीशी वाटली नाही निवडणूक आयोगाकडे? तिथे अधिकृतपणे आक्षेप नोंदविण्याची गरज वाटली नाही कुणालाच? आणि आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आली असताना शहाणपण सुचले आहे या दीडशहाण्यांना? शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यालाही इव्हीएम मशीनमधील कथित उणिवांची जाणीव निवडणूकप्रकिया जवळपास अर्धी संपली असताना व्हावी, यासारखा मोठा विनोद नाही. त्यांनातरी अर्ध्यावर झाला साक्षात्कार. इतर नेत्यांना तर मतदान पूर्णपणे आटोपल्यावर या उणिवेचे स्मरण झाले असून, आता त्याविरुद्धच्या तक्रारी गुदरण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवणे आरंभले आहे. परवा तर तमाम भाजपाविरोधकांचा गोतावळा जमला होता दिल्लीत. सगळ्यांची ओरड एकच- एव्हीएम मशीनमध्ये गडबड होण्याची शक्यता आणि त्याबाबतची यांच्या मनात अचानक जागृत झालेली चिंता.
कायपण नौटंकी करतात आपल्या देशातले राजकारणी लोक! नुसता तमाशा मांडून बसले आहेत सारे. जनतेला तर पाऽऽर मूर्खात काढले आहे या लोकांनी. जणू तिला बिचारीला काहीच कळत नाही. ना यांची लबाडी, ना यांची चलाखी! यांनी आरोप करायचे अन् जनतेने ते खरे मानायचे. मध्यप्रदेशच्या निकालानंतर इव्हीएमबाबत यांनी मौन बाळगले तेव्हाही जनतेने यांना समजून घ्यायचे अन् आता लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर यांनी त्याच यंत्रांबाबत शंका व्यक्त केली तरी समजदारी जनतेनेच दाखवायची. तसेच काही घडत असेल, या त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा. जणू मतदार म्हणजे मेंढरांचा बाजारच की नाही? यांनी यावं अन् पाहिजे तसं हाकावं. खुळीच की नाही जनता? आता निकालाच्या तोंडावर सर्वांना इव्हीएम मशीनवर, त्याची राखण करणार्या सरकारी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर, त्यांच्या इमानदारीवर शंका घ्यावीशी वाटू लागली आहे? जणूकाय सत्ताधारी पक्षाचे लोक अवजारं घेऊन इव्हीएम मशीनमध्ये बदल करायला निघालेच असल्याच्या थाटातला कांगावा विरोधकांनी चालवला आहे सध्यातर.
खरंतर, इव्हीएम मशीनसंदर्भातील आरडाओरड हे केवळ निमित्त आहे. भाजपाविरोधक यानिमित्ताने स्वत:चा पराभव जाहीरपणे कबूल करताहेत. बहुधा त्यामुळेच अस्वस्थ झाले आहेत सारे. त्यांच्या मनातली चिडचिड ही अशी, या तर्हेने व्यक्त होते आहे. निवडणुकीतला पराभव पचनी पडणारा नसल्याने उफाळून आलेला संताप या पद्धतीने ते व्यक्त करताहेत. लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास स्वत:च्या सोयीनुसार व्यक्त करण्याची त्यांची नेहमीचीच तर्हा असल्याने, इव्हीएमविरुद्धचा सारा राग यंदा लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर व्यक्त होतोय्. राग कसला, नाटकं चालली आहेत सगळ्यांची. आजचे निकाल खरोखरीच विरोधात गेले, तर त्यांच्या रागाला पारावार राहणार नाही, हे स्पष्टच आहे. आम्ही आधीपासून म्हणतच होतो... अशी आवई उठवायला तयार असतीलच सारे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, निकाल या विरोधकांच्या बाजूने लागला तर... तर त्या स्थितीतही त्यांची भूमिका या यंत्रांविरुद्धचीच असेल का? की तेव्हा त्यांचा विश्वास दृढ झालेला असेल, याच यंत्रांवरचा? विश्वास-अविश्वासाची ही अशी सोयीने बदलणारी भूमिका राजकीयदृष्ट्या योग्य ठरत असेलही कदाचित, पण त्यातून लोकशाहीव्यवस्थेचा कणा असलेल्या सामान्य माणसाच्या मनात आपण उगाच गोंधळ निर्माण करीत असल्याची जरातरी खंत बाळगावी ना कुणीतरी? आपल्या या स्वार्थी राजकारणातून आपण लोकशाहीव्यवस्थेचा पायाच ठिसूळ करायला निघालो असल्याचीही लाज वाटावी ना कुणालातरी? पण, इथे तर निकाल विरोधात लागला तर रक्तपात घडविण्याच्या धमक्या देताहेत पाटण्यातील उपेंद्र कुशवाहसारखे गुंड. हे असले लोक रक्षण करणार आहेत लोकशाहीचे? यांच्या पदरात टाकायचे जनतेने विश्वासाचे दान? आज मतदानयंत्रांतून निवडणुकीचे निकाल बाहेर येतीलच. त्यात, लोकशाहीचे असे खोबरे करणार्यांना कुठेच स्थान असू नये, एवढीच परमेश्वराचरणी प्रार्थना! बाकी, तमाम राजकीय नेत्यांनी इव्हीएम मशीनविरुद्ध चालवलेला कांगावा लोकशाहीरक्षणक्षार्थ होता की ती केवळ नौटंकी होती, हेही स्पष्ट होईलच या निकालांतून!
@@AUTHORINFO_V1@@