महंती सुखाची नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |



रामदासस्वामींनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी ११००च्या आसपास मठ स्थापन केल्याचे आपण मागील लेखात पाहिले. स्वामींनी पायी प्रवास केला. त्यांना ठिकठिकाणी अनेक शिष्य मिळाले. प्रवासात कीर्तनांतून, प्रवचनांतून, बैठकांतून त्यांनी आपली मते श्रोत्यांना ऐकवलीच, पण आपल्या मतप्रसारासाठी मठांची स्थापना केली. त्या मठांसाठी अनेक प्रकारांनी शिकवून घडवून स्वामींनी महंत तयार केले. त्या महंतांना वेगवेगळ्या मठात पाठवून स्वामींनी आपल्या कार्याचा परीघ विस्तारित केला. या समर्थस्थापित मठांची माहिती गिरिधरस्वामींनी त्यांच्या ‘समर्थप्रताप’ या ग्रंथात दिली आहे.

तथापि टीकाकारांनी या ग्रंथाची अवहेलना केली आहे. ज्या गिरिधरस्वामींनी दासबोधाची सूक्ष्मपणे विषयवारी केली आहे, त्याच गिरिधरस्वामींबद्दल लिहिताना टीकाकार म्हणतात, “गिरिधराने ‘समर्थप्रताप’ नावाची एक भाकडकथा रचली आणि त्यात दिलेली नावे आणि घटिते केवळ कपोलकल्पित आहेत.” हे विद्वान टीकाकार समर्थस्थापित मठांच्या संख्येविषयी शंका उपस्थित करतात, पुरावे मागतात. पुरावे नाहीत म्हणजे सारे कपोलकल्पित! राज्य म्लेंच्छांचे, त्यांचा मूर्तिपूजा, हिंदूंचे उत्सव व संघटन याला कडवा विरोध, अशा परिस्थितीत राजकारण करताना गुप्तता ठेवावी लागते, याचे भान या टीकाकारांना नाही. पुरावे मागणार्‍या टीकाकारांची ही सवय आजही तशीच चालू आहे.

सर्वांना माहीत आहे की, दि. २६ फेब्रुवारीला आपल्या वायुदलाने पहाटे ३.४५ ला ‘मिराज’ या लढावू विमानांद्वारे पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरात जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट मुझ्झफराबाद चाकोरी येथील अतिरेक्यांच्या ठिकाणावर हवाई हल्ले केले. त्यात २०० हून अतिरेकी ठार झाल्याचे म्हटले जाते. पण, हे टीकाकार पुराव्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. तीच गत गिरिधरस्वामींच्या ‘समर्थप्रताप’मध्ये वर्णिलेल्या मठांची झाली आहे.

गिरिधरस्वामींनी रामदासी मठांची व तेथील महंतांची यादी ‘समर्थप्रताप’ ग्रंथात दिली आहे. त्यात महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, दक्षिणप्रांत, मोगलाई, गंगातीर, वर्‍हाड, सुरत, गोमंतक, गोकर्ण, बेदर, गंगासागर, अयोध्या, मथुरा, मायापुरी, काशी, द्वारका, श्रीशैल, रामेश्वर अशा अनेक दूरवरच्या ठिकाणांचा उल्लेख आहे. तिकडे स्वामींनी नि:स्पृह महंत तयार करून पाठवले होते. या याद्या भौगोलिक व राजकीय दृष्टीने पाहिल्यास असे लक्षात येते की, जेथे जेथे म्लेंच्छांचे स्तोम माजले होते, तेथे तेथे स्वामींनी मठ उभारले. त्यातून स्वामींचा हेतू स्पष्ट होतो. ‘धर्मा’च्या नावाखाली लोकांना संघटित करून भक्तिमार्गाने त्यांना हिंदू संस्कृती रक्षणार्थ प्रतिकार करण्याचे दक्ष, धूर्त, साक्षेपी शिक्षण देणे हा स्वामींचा हेतू होता. ‘महाराष्ट्र सारस्वत’कार वि. ल. भावे म्हणतात, “हे रामदासी मठ म्हणजे रामदासी विद्यापीठे होती. तेथे संप्रदायातल्या विद्येचे पाठ अष्टौप्रहर चालत.” या सर्व मठांचे मुख्यालय चाफळला होते आणि स्वतः समर्थ रामदास हे त्याचे मुख्याधिकारी होते.

स्वामींच्या आदेशानुसार जवळच्या मठपतींनी तीन वर्षांतून एकदा, तर दूरच्या मठपतींनी ११ वर्षांतून एकदा चाफळला येऊन आपल्या कार्याचा आढावा समर्थांना द्यावा लागत असे. शिवरायांच्या व रामदासांच्या निधनानंतर राजकीय वाताहतीत तसेच काळाच्या ओघात यापैकी अनेक मठ नष्ट झाले. पण, ते गिरिधरस्वामींच्या काळी अस्तित्वात नव्हते, असे म्हणण्याचे धाडस करणे हा मूर्खपणा आहे.

 

या मठांवर रामदासांनी फक्त ब्राह्मणांना मठाधिपती नेमले, असा आरोप समर्थांवर केला जातो. पण, तो बरोबर नाही. या महंतांमध्ये ब्राह्मण महंत अधिक होते, हे खरे आहे, पण सर्वच ब्राह्मण होते असेही नाही. त्यात ब्राह्मणेतरही आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवथर मठाचे महंत बाजी गोसावी हे क्षत्रिय मराठा होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव मठाचे मठपती शंकराजी गोसावी हे मराठा महंत होते. मराठवाड्यातील लातूरजवळील भालकी मठाची परंपरा मराठ्यांची आहेसमर्थांनी नि:स्पृह महंत तयार करून त्यांना जागोजागी पाठवले. आपला शिष्य दूरदेशी पाठवताना समर्थ त्याला उपदेश करीत. तो गिरिधरस्वामींनी स्वानुभवाने वर्णन केला आहे. महंत शिष्याला दासबोध ग्रंथ देऊन समर्थ स्वहस्ते श्रीकंठमेखला देत. त्या उपदेशातील काही महत्त्वाच्या ओव्या गिरिधरस्वामींच्या ग्रंथातून देत आहे.

निरोपिती कोठे वाद घालू नको ।

भक्ति सोडू नको राघवाची ॥

राघवाची भक्ति ग्रंथाचे पूजन ।

स्वजन शोधन समुदाई ॥

नको सोडू नित्य साधन आपुले ।

पाठांतर केले पाहिजे तां ॥

वर्तावे तां सुखस्वरसे असावे ।

चंचळाच्या नावे शून्याकार ॥

 

आणखीही बराच उपदेश आहे. थोडक्यात, नि:स्पृह महंताने कोणाशीही वाद न घालता भक्ती संप्रदाय वाढवून समुदायामध्ये स्वजनांचा शोध घ्यावा. आपल्या कार्याला अनुकूल लोक निवडावे. महंतांना आपले कार्य करण्यासाठी परिस्थिती किती कठीण होती याचे वर्णन दासबोधात द. १५ स. २ मध्ये येते. पुष्कळ लोक बाटून मुसलमान झाले. कित्येकजण पोर्तुगीज राज्यात नाहीसे झाले. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थोडे चैतन्य उरले आहे. तेथे राजकारणाला वाव आहे. एकंदर परिस्थिती चांगली नाही हे खरे. पण, ज्ञानी पुरुष त्याचा भेद करून आपले कार्य करतो. असा महंत स्वतः गुप्त राहून काम करतो, तो सामान्यांसारखा दिसतो, पण त्याची कीर्ती सर्वत्र पसरते.

 

रवनाळामध्ये जाऊन राहे ।

तेथे कोणीच न पाहे ।

सर्वत्रांची चिंता आहे । सर्वकाळ ॥ (१५.२.२३)

दासबोधात द. २ स. ९ मध्ये जी विरक्त पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत, ती महंतांनाही लागू आहेत. विरक्त हा एकान्तप्रिय असूनही त्याचा लोकसंग्रह दांडगा असतो.

विरक्ते विरक्त धुंडावे ।

विरक्ते साधु वोळखावे ।

विरक्ते मित्र करावे । संत योगी सज्जन ॥

महंताने कसे वागावे, हे सांगण्यासाठी समर्थांनी द. १४ स. १ हा ८० ओव्यांचा मोठा समास सांगितला आहे. त्या समासात नि:स्पृह महंताने लोकसंग्रह करताना व आपले कार्य पार पाडताना कसे युक्तीने, शहाणपणाने, संयमाने वागावे याचे सविस्तर वर्णन स्वामींनी केले आहे. नि:स्पृहाने विचारपूर्वक नि:स्पृहता धरावी. एकदा धरली तर सोडू नये. या सर्व समासात नि:स्पृह महंताने काय करू नये ते स्वामींनी स्पष्टपणे सांगितले आहे. महंताने पैसा आणि बायका यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू नये. त्याच्या ठिकाणी मिंधेपणा नसावे. कोणी द्रव्य दिले, तर ते त्याने घेऊ नये. भिक्षा मागायला लाजू नये. भिक्षा थोडी घ्यावी. कोणी परातभर आणली, तर त्यातील मूठभर घ्यावे. ‘जडभिक्षा’ (म्हणजे सोने, चांदी, दागिने वगैरे) आणली तर ती घेऊ नये. मठातील महंतांना स्वतःची ‘इस्टेट’ करण्याचा अधिकार नसे. जे मिळेल ते मठात जमा करावे लागे. महंताला वैराग्याची शिकवण दिलेली असे. महंताने वैराग्य सांभाळले पाहिजे. कोणी अपमान केला तर महंताने निराश होऊ नये. कोणी वर्म काढून बोलला तर मनाला लावून घेऊ नये. दुर्जनासी भांडू नये. अतिदुष्ट माणूस भेटला तर त्याच्याशी संबंध टाळावा हे श्रेयस्कर. कोणाशीही अतिपरिचय होऊ देऊ नये. महंताने आपली स्वतंत्रता सांभाळावी. त्याने परतंत्र होऊन दुसर्‍याच्या अधीन होऊ नये. नीतीबाह्य वर्तन करू नये. कोणाशीही फार वाद घालू नये, मिंधेपण नसावे. मिंधेपणाने कधीही परमार्थ साधता येत नाही. ऐकणार्‍यांच्या मनात संशय निर्माण होईल असे बोलू नये. लोकांच्या मनात कोठल्याही बाबतीत संभ्रम निर्माण होईल, असे विधान करू नये.

नि:स्पृह हा स्वतंत्रपणे राहिला पाहिजे. आपले स्वतंत्रपण गमावले जाईल, असे नि:स्पृहाने वागू नये. नि:स्पृहाने लोकसंग्रह करावा, पण त्यासाठी लोकांच्या प्रापंचिक गोष्टीत गुरफटून जाऊ नये. म्हणून त्याने पाहुण्याप्रमाणे आमंत्रणे घेऊ नये. लोकांच्या घरी श्राद्धपक्ष, सटीसहामासी, बारसे, नवसाची व्रते, उद्यापने इ. घरगुती कार्यक्रमांना जाऊ नये. लग्नमुहूर्ताच्या प्रसंगी नि:स्पृहाने जाऊ नये. त्याने राजाच्या पदरी काम स्वीकारू नये. तसेच कोणाची सोयरीक जगवण्याच्या फंदात पडू नये. नि:स्पृहाने पैसे घेऊन पुण्यकर्म करू नये. नि:स्पृहाच्या आचारामध्ये कर्मठपणा नसावा. परंतु, आचार हा विचारहीनदेखील नसावा. फार लोकाचार सोडायचा नसला तरी, लोकांच्या अधीन होऊन राहू नये.

समर्थांच्या महंताला स्वातंत्र्य गमवावे लागेल, असे त्याने वागू नये. मिंधेपणा घेऊ नये. त्यामुळे समर्थ सांगतात, ‘महंती सुखाची नाही.’ रामदासांच्या संप्रदायात प्रवेश मिळणे हे कठीण काम असे. त्यातून महंत म्हणून निवड होणे हे भाग्याचे समजले जाई. महंताचे कार्य हे समाजोपयोगी, हिंदूसंस्कृती रक्षक व हिंदूंची राज्याला पोषक असे असले पाहिजे. तसेच महंताने दुसरे महंत तयार करावे व त्यांना कार्याला लावावे.

महंते महंत करावे । युक्तिबुद्धीनें भरावे ।

जाणते करून विखरावे । नाना देसी ॥ (११.१०.२५)

- सुरेश जाखडी

[email protected]

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@