कोंबडे कितीही झाकले तरी सूर्य उगवणारच...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019   
Total Views |


 

मतदानोत्तर चाचण्यांचा कौल विरोधकांना अनुकूल असा दिसून आला असता, तर सर्व विरोधक फेर धरून आनंदाने नाचले असते! विजयाचा उन्माद त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला असता! पण तसे काही न झाल्याने ते हिरमुसले झाले आहेत. काही विरोधी नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता त्यांची काय अवस्था झाली आहे, याची कल्पना यावी.


रविवार, १९ मे रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. या शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या ५९ जागांसाठी मतदान झाले. सात राज्ये आणि चंदिगढ या केंद्रशासित प्रदेशातील या जागा असून रविवारच्या मतदानात सुमारे ६४.१५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. या मतदानादरम्यान प. बंगाल आणि पंजाबमधील हिंसाचाराच्या घटना वगळता मतदान एकंदरीत सुरळीत पार पडले. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडताच चर्चा सुरू झाली ती मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मतदारांनी कोणाला कौल दिला याची! या सर्व चाचण्यांचे निष्कर्ष रविवारी जनतेसमोर आले. सर्वच्या सर्व चाचण्यांमध्ये मतदारांनी निर्विवादपणे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस कौल दिल्याचे दिसून आले आहे. निव्वळ भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल की नाही याबाबत कौल घेणाऱ्या काही संस्थांनी मतभिन्नता व्यक्त केली असली तरी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा कौल एकमताने दिला आहे. हा कौल पाहता, पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या अनेक विरोधी नेत्यांच्या स्वप्नभंग होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा कौल पाहून हादरलेल्या विरोधी नेत्यांनी त्याविरुद्ध सूर लावला असला तरी, त्या सर्वांच्या नाकावर टिच्चून देशात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, असे स्पष्टपणे दिसत आहे. विरोधकांनी विविध प्रकारे कोंबडे झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण भाजप आणि राष्ट्रीय आघाडीरूपी सूर्याचा उदय रोखणे ही त्यांच्यासाठी अशक्य कोटीतील बाब असल्याचे दिसून येत आहे. २३ मे रोजी या जनमत कौलावर अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे इतकेच!

 

सात टप्प्यांमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप यांच्यावर वाट्टेल ते आरोप करण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू, कमल हसन यांच्यापासून गल्लीबोळांतील नेत्यांनी भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधानपदी असलेल्या मोदी यांच्यावर सातत्याने असभ्य भाषेत प्रचार चालविला होता. काँग्रेसचे अन्य नेते म्हणजे प्रियांका गांधी, मणिशंकर अय्यर, अहमद पटेल, दिग्विजय सिंग, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेकांनी मोदी आणि भाजप यांच्या बदनामीची मोहीम उघडली होती. भाजपच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांमध्ये काहीच चांगले घडले नाही, असे मतदारांच्या कानीकपाळी ओरडून मतदारांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करण्याचा प्रयत्न विरोधी नेत्यांनी केला. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल, अशी आवईही उठविली. पण त्या कशाचाही देशातील मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे या मतदानोत्तर कौलावरून दिसून आले आहे. नरेंद्र मोदी सरकारने जनतेचे काही भले केले नाही, राफेल विमान खरेदीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला, नोटाबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेस संकटात लोटले, वस्तू आणि सेवा कर लादून अनेकांवर अन्याय केला, अशाप्रकारचे आरोप करून मोदी सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा मुद्दा पुढे करून मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोबेल्सच्या प्रचारतंत्राचा अवलंब करून वारंवार तेच ते आरोप मोदी यांच्यावर करण्यात आले. भारतीय मतदार अशा अपप्रचारास मुळीच बळी पडला नसल्याचे हा कौल पाहता दिसून येत आहे. रविवारी विविध वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झालेला कौल पाहता विरोधी पक्षांना तोंडात मारल्यासारखे झाले आहे. तरीही, ‘पडलो तरी नाक वर’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव निश्चितपणे होणार, असे कल्पून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न चंद्राबाबू यांनी चालविला होता. पंतप्रधान कोणाला करायचे, अशी चर्चा चालू होती. मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, राहुल गांधी, देवेगौडा आदी नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत बसले आहेत. पण, त्या सर्वांची स्वप्ने प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नाही.

 

मतदानोत्तर चाचण्यांचा कौल विरोधकांना अनुकूल असा दिसून आला असता, तर सर्व विरोधक फेर धरून आनंदाने नाचले असते! विजयाचा उन्माद त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला असता! पण तसे काही न झाल्याने ते हिरमुसले झाले आहेत. काही विरोधी नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता त्यांची काय अवस्था झाली आहे, याची कल्पना यावी. ममता बॅनर्जी यांनी मतदानोत्तर चाचण्यांच्या कौलावर आपला विश्वास नसल्याचे म्हटले आहे. “अशाप्रकारचे ‘गॉसिप’ पसरवून हजारो इव्हीएमची अदलाबदल करण्याचा हा मोठा डाव आहे. सर्व विरोधी पक्षांनी संघटित व्हावे. हे युद्ध एकत्रित लढूया,” असे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी, आता युद्ध लढून झाले आहे. आता कसली युद्ध लढण्याची भाषा करताय! कौल लक्षात घेऊन आपण गप्प बसला असता, तर ते अधिक शहाणपणाचे ठरले असते! नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि आपणच काश्मीरचे तारणहार आहोत, असे समजून चालणारे ओमर अब्दुल्ला यांचा “प्रत्येक मतदानोत्तर कौल हा चुकीचा असू शकत नाही. आपले टीव्हीसंच बंद ठेवा. समाजमाध्यमांवरून लॉगआऊट व्हा आणि २३ मेपर्यंत प्रतीक्षा करा,” असा सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी असे मतदानोत्तर कौल खरे ठरे नसतात असे सांगताना ऑस्ट्रेलियाचा दाखला दिला आहे. त्या देशामध्ये अलीकडे ज्या ५६ मतदानोत्तर चाचण्या घेण्यात आल्या होत्या, त्या चुकीच्या ठरल्या असल्याचे सांगून आपल्या आणि विरोधी नेत्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपण २३ मेपर्यंत वाट पाहू, असेही त्यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी जनमत चाचण्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका उपस्थित केली आहे. या कौलांनी केवळ गोंधळून टाकले आहे. जनतेच्या कौलाची आपण प्रतीक्षा करूया, असे त्यांनी म्हटले आहे. हे भाष्य करताना इव्हीएमबद्दल शंका उपस्थित करण्यास ते विसरले नाहीत.

 

मतदारांचा कौल कोणास आहे, हे ज्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यावरून स्पष्ट झाले. सर्वांनी एकमुखाने ‘पुन्हा मोदी सरकारच येणार,’ असे म्हटले आहे. एकाही चाचणीने विरोधी सूर लावलेला नाही. पण सर्व संस्थांचा कौल भाजपच्या दबावामुळे अनुकूल असाच दिसून आला असल्याचे म्हणणे त्या संस्थांवर आणि मतदारराजावर अविश्वास दाखविल्यासारखे होईल. सर्व वृत्तवाहिन्या आणि अन्य संस्थांचे मतदानोत्तर कौल जनतेपुढे आहेत. पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येणार असल्याचे या सर्वेक्षणांमधूनदिसून आले आहे. घोडामैदान अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. त्यानंतर अधिकृत निकाल जनतेपुढे येणार आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाहीचा होणारा विजय लक्षात घेता सरकार बनविण्याची स्वप्ने पाहण्याचे विरोधकांनी आता विसरून जावे. या संभाव्य निकालाविरुद्ध रानकसे आणि कोणत्या प्रकारे उठवायचे याची व्यूहरचना करण्याऐवजी आपली गेलेली विश्वासार्हता पुन्हा कशी मिळवायची याच्या तयारीला विरोधी पक्षांनी लागावे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@