विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा

    02-May-2019
Total Views |


सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांची स्थिती तोळामासा असली आणि या दोन्ही पक्षांनी कितीही आघाड्या-बिघाड्या केल्या, तरी त्यांच्यातील वाद कधीही किरकोळ नसतात, हे गेल्या साडेचार वर्षांतही वेळोवेळी सिद्ध झाले. या दोन पक्षांमध्ये अहमदनगरची जागा कोणी लढवायची याबाबत एकमत न झाल्यानेच काँग्रेसच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना आपल्या विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडावे लागले. आता तर ते काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखेच आहेत. अशात आता नव्या विरोधी पक्षनेत्याच्या नावावरून दोन्ही पक्षांमध्ये कुरबुर सुरू झाली आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद, असे साधे सरळ गणित काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरले आहे. त्यानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. परंतु, आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आघाडीत नव्या गणिताची चर्चा रंगते आहे. काँग्रेसकडे ४२, तर राष्ट्रवादीकडे ४१ अशी आमदार संख्या आहे. परंतु, आता विखे-पाटील काँग्रेसच्या उंबरठ्यावरच उभे आहेत. ते कोणत्याही क्षणी आमदारकीचाही राजीनामा देऊ शकतात. त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे आमदार असलेले स्वाभिमानी नितेश राणे व कालिदास कोळंबकर हे काँग्रेसला सभागृहात कोणत्याही विषयावर कदापिही साथ देणार नाहीत. त्यात राष्ट्रवादीच्या आ. हनुमंत डोळस यांचे नुकतेच निधन झाल्याने राष्ट्रवादीचीही आमदारसंख्या एकने कमी झाली आहे. अशी अटीतटीची परिस्थिती असली तरी एका अधिवेशनाचाच प्रश्न असल्याने राष्ट्रवादीने कधी नव्हे ती समजुतीची भूमिका घेतली आहे. ‘तुम्हीच घ्या विरोधी पक्षनेतेपद,’ असा संदेश राष्ट्रवादीने काँग्रेसला दिल्याचे समजते. परंतु, राष्ट्रवादीच्या समजुतीच्या निरोपावर कितपत विश्वास ठेवायचा, यावर आता काँग्रेसमध्ये खल रंगला आहे. अहमदनगरच्या जागेच्या वाटपाबाबतही सुरुवातीला राष्ट्रवादीने असाच समंजसपणा दाखवला होता. पण, नंतर काँग्रेसला गाफील क्षणी गाठून राष्ट्रवादीने आपली पॉवर दाखवून दिली होती. या पॉवरगेममुळेच पुढचे नगरी रामायण घडले व काँग्रेसला आपला मोठा लोकनेता गमवावा लागला.

जातीय-प्रादेशिक संतुलनाची कसरत

 

काँग्रेस जरी इतर राजकीय पक्षांवर जातीयवादाचा आरोप करत असली तरी सर्वाधिक जातीय, प्रादेशिक गणिते काँग्रेसमध्येच केली जातात. काँग्रेसमध्ये फक्त गुणवत्तेवर फार अपवादानेच पदे दिली जातात. आता महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतही काँग्रेसमध्ये हीच समीकरणे जुळवली जात आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे नगरी नेते विरोधी पक्षनेतेपदावरून पायउतार झाल्यानंतर या पदासाठी बाळासाहेब थोरात या दुसऱ्या नगरी नेत्याचे नाव घेतले जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच थोरात यांच्या संस्थेतच अचानक मुक्काम केल्याने थोरात यांचे नाव माध्यमांमध्ये आघाडीवर आहे. थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांची पक्षश्रेष्ठींबरोबर कितीही जवळीक असली तरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मात्र थोरात यांच्या नावाला विरोध आहे. याआधीच विखे यांच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्याला व मराठा समाजाला प्रतिनिधित्त्व देण्यात आले होते. त्याचबरोबर चव्हाण हे स्वतः मराठा असल्याने पक्षाकडील दुसरे मोठे पद मराठेतर नेत्याला मिळावे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यात थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अशोक चव्हाण यांच्या या गणितामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचाही पत्ता आपोआप कट झाला आहे. विजय वडेट्टीवार, विरेंद्र जगताप व यशोमती ठाकूर ही तीन वैदर्भीय नावे अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केली असल्याचे समजते. त्यातही यशोमती ठाकूर यांचे नाव दिल्लीवरूनच चव्हाण यांना पुढे ठेवायला सांगितल्याचे समजते. यशोमती या राहुल टीममधील असल्याने त्यांनाही लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या पदाच्या निवडीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. विखे-पाटील यांना पक्षविरोधी भूमिका घेण्यापासून रोखू न शकल्याने आधीच खर्गे चव्हाण यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. विखे-पाटील यांचे बंड राज्य प्रभारी म्हणून खर्गे यांचेही अपयश असल्याचे दिल्लीत बोलले गेल्याने यावेळी खर्गे राज्यातील कोणत्याही नेत्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे जातीय-प्रादेशिक संतुलनाचा विचार करून ते एखादे नवीन नाव समोर आणण्याची शक्यता आहे. पण, सध्यातरी ओबीसी आणि मूळचे शिवसैनिक असलेल्या विजय वडेट्टीवार यांचेच नाव या पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

- शाम देऊलकर 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat