साध्वींची दुसरी माफी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |
भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवार साध्वी प्रज्ञासिह ठाकूर यांना पुन्हा एकदा देशवासीयांची माफी मागावी लागली आहे. ‘‘मी नाथूराम गोडसेच्या संदर्भात दिलेल्या माझ्या वक्तव्यावरून देशाच्या जनतेची माफी मागत आहे. माझे वक्तव्य साफ चूक होते. मी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अतिशय सन्मान करते.’’ असा माफीनामा प्रज्ञासिह यांना मतदानाच्या दोन दिवस आधी द्यावा लागणे, भाजपासारख्या पक्षाची कुचंबणा करणारा आहे. प्रज्ञासिह यांना हेमंत करकरेंबाबतही अशीच माफी मागावी लागली होती, तेव्हाच आम्ही इशारा दिला होता की, राजकारणात नवख्या असलेल्या प्रज्ञासिह यांना प्रत्येक पावलावर अत्यंत सावधगिरीने चालावे लागणार आहे. कारण केवळ देशाचाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मीडिया त्यांच्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवून आहे. वाटले होते की प्रज्ञासिह तेवढ्या चाणाक्ष असतील. परंतु, दुर्दैवाने त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना, विरोधकांच्या हातात असले आयते कोलित देणे, मूर्खपणाचेच असते. आपल्या उमेदवारीवरून देशभरात गदारोळ उसळला असताना, खुद्द पंतप्रधानांनी आपल्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले होते, याची जाण प्रज्ञासिह यांनी ठेवायला हवी होती.
 
 
 
दक्षिणेतील एकेकाळचा सुपरस्टार कमल हसन याने प्रचारसभेत, नाथूराम गोडसेला भारताचा पहिला हिंदू दहशतवादी म्हटले आणि त्यानंतर देशात गोडसे, गांधी यांच्याशी संबंधित इतिहासावर चर्चा सुरू झाली. यात राजकारण्यांनी पडायचे काहीएक कारण नव्हते आणि तुम्ही बघाल, बहुतेक राजकारण्यांना पत्रकारांनी कमल हसनच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली, पण कुणीही थेट उत्तर दिले नाही. चातुर्यानेच उत्तर दिले. प्रियांका वढेरांनाही या वादात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मोदींना प्रज्ञासिह वरून टोमणा मारलाच. ‘बापू का हत्यारा देशभक्त? हे राम! उमेदवारापासून स्वत:ला दूर ठेवणे पुरेसे नाही. भाजपातील राष्ट्रवादी महाभावांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची हिम्मत दाखवावी.’ खरेतर, प्रियांकाच काय, कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला जिंकवा कार्यकर्त्याला, प्रज्ञासिह वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. गोडसेबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणार्या कॉंग्रेसने आधी, 1984 सालच्या शीख नरसंहारात दोषी असणार्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. या नरसंहारातील एक प्रमुख आरोपी एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काय बनतो? गांधी परिवाराचा आशीर्वाद होता म्हणूनच ना? कॉंग्रेसने प्रथम त्यावर बोलले पाहिजे. गोडसे देशभक्त होता की नाही, याची जर चर्चा करायची असेल तर, मग गोडसेने महात्मा गांधींची हत्या का केली, यावरही चर्चा व्हायला हवी. सोशल मीडियावर ती सुरूही झाली आहे. आता विषयच निघाला आहे तर, दोन्ही पक्ष, पुराव्यासहित लोकांसमोर ठेवण्यात यावे आणि त्यानंतर लोकांनी काय निष्कर्ष काढायचा, तो त्यांना काढू द्यावा. पण, खरेतर ही ती वेळ नाही आणि नव्हती.
 
आज आपल्या देशात निवडणुका सुरू आहेत. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपेल. दीड महिन्यापासून देशात प्रचाराची धूम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपा सरकारने केलेली कामे व पुढील संकल्प इत्यादी मुद्दे घेऊन भाजपा प्रचारात उतरली आहे. तिकडे विरोधी पक्ष केवळ ‘मोदी हटाव’ हाच एक कलमी कार्यक्रम घेऊन जनतेत जात आहेत. असा वेळी उमेदवाराने आपापल्या मतदारसंघातील लोकांना आपण काय काम करणार आहोत, त्यांच्या कुठल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे सांगणे अभिप्रेत असते. काही मुद्दे स्थानिक असतात, काही प्रांतीय असतात तर काही देशस्तरावरचे असतात. या सर्वांच्या ऊहापोहातून मतदार कुणाला मत द्यायचे ते ठरवितो. परंतु, जे मुद्दे औचित्यहीन आहेत, गौण आहेत, त्यांनाही प्रचारात प्रधान मुद्दे बनविण्याचा प्रयत्न सुरू असतो. ते एक प्रकारे फेकलेले जाळे असते. असे जाळे प्रत्येकच पक्ष फेकत असतो. त्यात न अडकण्यात विरोधी पक्षाचे कौशल्य असते. कमल हसन यांनी गोडसेबाबत केलेले विधान हे असेच एक जाळे होते. गौण मुद्याला प्रचारात आणण्याचा एक डाव होता. साध्वी प्रज्ञािंसह यांना तो ओळखता आला नाही, असेच म्हणावे लागेल.
 
कुणाला पटो अथवा न पटो, महात्मा गांधी हे केवळ आपल्या देशाचेच नाही तर, सार्या जगाचे आदराचे स्थान आहे. जगभरात भारत हा बुद्ध आणि गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. कुणाला गांधींचे विचार पटत नसतील. पण म्हणून त्यांची उंची काही कमी होत नाही. आपल्याला विचारस्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मगदुराप्रमाणे, क्षमतेप्रमाणे विचार करत असतो. तसेच आपले मत मांडण्याचाही प्रत्येकाला अधिकार आहे. ते मत दुसर्याला पटलेच पाहिजे असे नाही. परंतु, देशवासीयांच्या श्रद्धास्थानांना धक्का लागेल असे बोलणे विवेकाचे नसते. या महापुरुषांनी कोट्यवधी लोकांच्या हृदयात जे स्थान मिळविले असते, ते कुणाच्या कृपेने नसते. स्वकर्तृत्वाने ते या स्थानापर्यंत पोहचले असतात. दिवाणखान्यात, चहाच्या टपरीवर चर्चा करताना, आपण त्यांच्या कार्याचा एक हजारावा भाग तरी काम केले आहे का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कुठलीही विचारधारा असो, कुठलाही पक्ष जिंकवा संघटन असो, ती विचारधारा जिंकवा ते संघटन तुम्हाला पटत नाही अथवा आवडत नाही, म्हणून त्या संघटनेच्या जिंकवा त्या विचारधारेच्या कार्याला तुम्ही नाकारू शकत नाहीत. त्याचा आदर केलाच पाहिजे. ही जी समतोल विचार करण्याची सवय आहे ती, जे लोक जनतेत जाऊन खर्या अर्थाने काम करताना, त्यांच्या अंगी नकळत बाणली जाते. जे मूलभूत काम करत नाहीत, निव्वळ चर्चा करून तोंडाची वाफ दवडतात, त्यांच्यात मात्र हा विवेक अभावानेच दिसून येतो. भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी प्रचारासाठी संपूर्ण देश पिंजून काढला आहे. शेकडो सभा घेतल्या. चर्चा केल्यात, मुलाखती दिल्यात; परंतु एकाच्याही तोंडून असले काही निघाले नाही. विरोधातील लोकांनी एकवेळ मर्यादा सोडली असेल, पण यांनी मात्र आपली जीभ घसरू दिली नाही. याचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे.
 
देशासाठी, धर्मासाठी संपूर्ण जीवन अर्पण करण्याची भावना कितीही तीव्र असली तरी, काळोखात आसमंताचे डोळे दिपविणारी आकाशातील वीज बनायचे की, झोपडीत प्रकाश पाडणारा मिणमिणता दिवा बनायचे, हे ठरवता आले पाहिजे. भोगलेल्या मरणप्राय यातनांच्या, अपमानाच्या असह्य आठवणींचे रूपांतर प्रेमाच्या वर्षावात करता आले पाहिजे. अंगावरील भगवे वस्त्र त्याचे प्रतीक असते. अशा प्रकारे आपले जीवन समाजासाठी प्रेरक बनविणार्यांची आपल्या देशात वानवा नाही. प्रत्येक प्रांतात, प्रत्येक जातीत अशी ‘चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, अर्णव पीयूखाचे’ असलेली लोकोत्तर मंडळी निर्माण झाली आहेत. याच लोकांचे चरित्र काळावर स्वार होऊन येणार्या पिढ्यान्पिढ्यांना मार्गदर्शन करीत असतात.
 
प्रज्ञासिह निवडणुकीत विजयी होतील अथवा न होतील. परंतु, आपण सनातन धर्माचे प्रतीक असलेला भगवा रंग अंगावर घेतला आहे आणि समाजकारणासाठी एक जनप्रतिनिधी म्हणून राजकारणात आलो आहोत, या आपल्या खांद्यावर दोन महत् जबाबदार्या आहेत, याचे त्या आपल्या भावी जीवनात सतत भान ठेवतील अशी आशा करू या.
@@AUTHORINFO_V1@@