रसिकप्रेक्षक आणि रंगभूमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019
Total Views |




मराठी रंगभूमीला स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. १९व्या शतकापासून संगीत नाटक (संगीत नाटक) आणि तमाशा (लोकनृत्य) यासारख्या मराठी कलेला खरी सुरुवात झाली. झाशीच्या राणीची नाटकं (१८७०), सवाई माधवराव मूर्ति (१८७१) आणि मल्हारराव महाराज (१८७४) यांसारखी उत्कृष्ट नाट्यनिर्मिती झाली. मराठी रंगमंचाच्या प्रारंभीच्या काळात कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी आणि अण्णासाहेब किर्लोस्कर या नाटककारांनी मराठी रंगभूमीला एक वेगळा आयाम प्राप्त करुन दिला. त्यानंतर आले ते मराठी सिनेमांचे युग सुरू. व्ही. शांताराम, मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, सुधीर फडके अशा महान कलाकारांनी मराठी चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. राजा ठाकूर यांनी तमाशा लोककलांवर आधारित मराठी चित्रपट केले. पुढे ७०च्या दशकाच्या प्रारंभी दादा कोंडके यांनी केलेले सामाजिक आणि अनेकदा व्यंग्यात्मक, विद्रोही चित्रपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. ८०च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यासारख्या कलाकारांनी मराठी सिनेमांचे दशक गाजवले. अलका कुबलसारख्या अभिनेत्रीने मराठी सिनेमा गावागावांत नेला. त्यानंतर मात्र काही वर्षं मराठी सिनेमाला घरघर लागली. व्यावसायिक आलेखावर मराठी सिनेमा आणि रंगभूमीचीही पिछेहाट झाली. मात्र, आधुनिक बदलांमुळे मराठी सिनेमा आणि नाट्यकृती नव्या रूपरंगात प्रेक्षकांसमोर आले. नवीन आणि धाडसी विषय, त्याची उत्तम मांडणी यामुळे व्यावसायिक पातळीवरदेखील मराठी चित्रपट आता कोटींची उड्डाण करताना दिसतात. थोडक्यात, मराठी रसिकजनांनीही चित्रपट निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या नवनवीन प्रयोगांना दाद दिली आणि हा प्रवास आजही असाच सुरु आहे. पण, मराठी नाटकांकडे अजूनही मराठी प्रेक्षक फारसा वळताना दिसत नाही. अपुरी नाट्यगृहे, सोयीसुविधांची वानवा आणि नाटक कंपन्यांना मायबाप रसिक प्रेक्षकांना रंगभूमीपर्यंत आणण्यासाठी एकूणच कमी पडलेले प्रयत्न ही वानगीदाखल नाटक मागे पडल्याची कारणे सांगता येतील. त्यामुळे आगामी काळात रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना रंगभूमीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न नाट्यनिर्मात्यांनी केला तरच मराठी नाट्यसृष्टीचे भवितव्य उज्ज्वल राहील, असे वाटते.

 

'शारदा' गेली, 'चित्रा'ही गेली...

 

सिंगल स्क्रीन सिनेमागृहांची जागा आता मल्टिप्लेक्सने घेतली असून सिंगल स्क्रीनच्या आठवणी आता फक्त जुन्या प्रेक्षकांच्याच स्मरणातच राहणार आहेत. एकेकाळी सोनेरी दिवस जगणार्‍या या सिनेमागृहांची खूपच परवड झाली. त्यामुळे हळूहळू ही सिनेमागृह बंद करण्यापलीकडे सिनेमागृह चालकांसमोर कुठलाही पर्याय उरलेला दिसत नाही. वाढती व्यावसायिक स्पर्धा, आधुनिक प्रेक्षकांच्या नवीन आवडी-निवडीमुळे ही सिनेमागृहे सांभाळणे कठीण झाले आहे. वाढत्या कर्जाच्या बोझ्यामुळे नामांकित मल्टिप्लेक्स कंपनींना जुने सिनेमागृह विकण्याचा निर्णयही म्हणूनच बरेचदा घेतलेला दिसतो. कारण, याशिवाय या सिंगल स्क्रीन सिनेमागृह मालकांकडे आजघडीला दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपट रसिकांचे मनोरंजन करणारे दादर पूर्वेकडील चित्रा सिनेमागृह नुकतेच बंद करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील 'न्यू एक्सेलसियर' या सिंगल स्क्रीन सिनेमागृहानंतर बंद होणारे 'चित्रा' हे आणखी एक सिंगल स्क्रीन सिनेमागृह आहे. दादरच्या सुप्रसिद्ध 'शारदा' सिनेमागृहावर देखील टाळे लावण्याची वेळ ओढवली.दादरमधील सिंगल स्क्रीन सिनेमागृहाच्या काळात 'चित्रा'ला अनेक प्रेक्षकांची पहिली पसंती असायची. 'अनुराग', 'जंगली' यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील चित्रपटांची सिल्व्हर ज्युबिली 'चित्रा'मध्ये झाली. मराठी चित्रपटांचेदेखील शो या सिनेमागृहात व्हायचे. या सिनेमागृहाच्या बंद होण्याने फक्त जुन्या रसिक प्रेक्षकांना प्रचंड दुःख होणार आहे. कारण, त्या काळातील त्यांच्या अनेक अनमोल आठवणींचा ही सिनेमागृहे साक्षीदार होती. सिंगल स्क्रीन सिनेमागृह विशेषतः कामगारवर्गासाठी खूप मोठी पर्वणी होती. कारण, अगदी कमी पैशांत त्यांचे मनोरंजन होत असे. परंतु, आताचे आधुनिक प्रेक्षक अशा सिनेमागृहांत जाणे सहसा पसंत करत नाही. आधुनिक आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा मल्टिप्लेक्सला हजार रुपयांचे तिकीट काढून जाणारा आजचा प्रेक्षकवर्ग. त्यामुळे राहिल्या फक्त आठवणी, असे म्हणत आठवणींच्या सुखद ठेवी मनात बाळगून जुना प्रेक्षक या सिनेमागृहांना अलविदा करताना त्यांचे मन नक्की भरून येईल...

 

- कविता भोसले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@