स्त्रियांच्या बाजारांचे आयाम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019   
Total Views |




औरत ने जनम दिया मर्दों को

मर्दों ने उसे बाजार दिया...

 

पण, स्त्रियांच्या शोषणाचे उघडेनागडे सत्य हेही आहे की, केवळ स्त्रीदेह बाजारात विकला जाणे, हेच स्त्रीदुःखाचे अंतिम परिमाण नाही. या चौकटीत आणि या चौकटीला व्यापून भेदून त्याही पलीकडे स्त्री शोषणाच्या दशा ऑक्टोपस होऊन जगभर दुःखवेणा प्रसवित आहेत. या सर्व शोषणांचा मागोवा घेतला तर स्त्री-पुरुष लिंगभेदाच्या पातळीवर स्त्रीचे माणूसपण नाकारले गेले आहे. 

माणूसपण नाकारणे म्हणजे केवळ तिला गुलाम बनवणे किंवा देहविक्रीच्या धंद्याला लावणे, हे इतकेच उरले नाही, तर विविध पातळीवर हे माणूसपण नाकारले जाते. जगाच्या पाठीवर माणसाच्या मुक्तीचे गाणे गाणार्‍या अमेरिकेचीही गत यापेक्षा काही फार वेगळी नाही. उत्तर अमेरिकेच्या अल्बामा राज्यात सध्या जे वादळ उठले आहे, ते वादळही स्त्रीचे माणूसपण आणि तिच्या हक्कांबाबतच टाहो फोडत आहे. अल्बामा साधारण ४९ लाख वस्तीचे राज्य. वरून साजिरे-गोजिरे मानवी हक्कांच्या बाता मारणारे राज्य.

पण, या राज्याच्या सिनेटने सध्या एक प्रस्ताव पारित केला आहे. त्यानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये स्त्रीला गर्भपात करता येणार नाही आणि जर एखाद्या स्त्रीने गर्भपात केलाच, तर तिला शिक्षा आणि दंड तर आहेच. शिवाय, जो डॉक्टर त्या स्त्रीचा गर्भपात करेल, त्याला ९९ वर्षांचा कारावास होईल.

यामध्ये जर त्या मुलीवर किंवा स्त्रीवर बलात्कार झाला असेल किंवा काही गंभीर कारणास्तव तिला बाळाला जन्म द्यायचा नसेल, तरीसुद्धा तिला गर्भपात करता येणार नाही. मग प्रश्न पडतो की, स्त्रीच्या देहावर अधिकार कुणाचा? स्त्रीच्या अभिव्यक्तीवर अधिकार कुणाचा? स्त्रीच्या मातृत्वावर अधिकार कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर अल्बामामध्ये हेच आहे की, स्त्रीचा स्वतःवर काहीच अधिकार नाही. स्वतःच्या शरीरावर आणि भविष्यात दूरगामी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तसेच आर्थिक परिणाम करणार्‍या निर्णयावर स्त्रीचा अधिकार नाही. हे अधिकार नाकारणारे राज्य कुठले तर अमेरिकेचे अल्बामा. आश्चर्य आहे! स्वातंत्र्यरूपी स्त्री देवतेचा पुतळा अभिमानाने मिरवणार्‍या आणि स्वतःला मानवी मूल्यांनी प्रेरित पुरोगामी दाखविणार्‍या अमेरिकेचे प्रतिगामी रूप जगासमोर उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर युरोपची स्थिती काय आहे? बहुसंख्य युरोपीय देशांनी जगावर साम्राज्यशाहीचा काळा इतिहास रंगवला. मात्र, सध्याच्या काळात साळसूदपणे युरोपही आपली प्रतिमा कोणत्याही भेदापलीकडे माणूसपण जपणारा देश, अशी रंगवतो. पण, याच युरोपमध्ये सामील असलेल्या बल्गेरिया या देशामध्ये ‘रोमा’ या समाजाचे जगणे वंचित-शोषितांचे मुकुटमणी जगणे ठरावे असे. बल्गेरियामधल्या रोमा समाजामध्ये वर्षातून चारवेळा मुलींचा बाजार भरतो आणि तोही विवाहाच्या नावाने. पहिल्यांदा मुलगी वयात आली की, त्याक्षणीच तिची शाळा सोडवली जाते. का? तर तिची ओळख बातचीत कोणत्याही परपुरुषाशी होऊ नये. पुरूषांशी संबंध न आल्यामुळे तीचे कौमार्य भंग होणार नाही. हे कशासाठी तर, त्यावर्षाच्या लग्नाच्या बाजारात ती कुमारिका आहे, म्हणून तिची बोली जास्त लागेल यासाठी. यावर काय बोलावे?

बरं, इथे इराणमध्येही नसरीन सोतेदोह या वकील महिलेला ३८ वर्षांचा कारावास आणि १४८ कोडे मारण्याची सजा फर्मावली गेली आहे. का? तर तिने भररस्त्यात डोके कोणत्याही वस्त्राने झाकले नव्हते. तसेच तिने मांनवी हक्कांबाबत आवाज उठवला होता. तिची ही कृती जनभावना चिथावणारी आणि इराणच्या सुप्रीम नेत्यांच्या विरोधातली आहे म्हणे. सध्या रमजानचा पवित्र महिना आहे, पण मॉना ट्वाही हिने आपण ११ वर्षांचे असताना हजच्या यात्रेत आपले लैंगिक शोषण केले गेले, असे ट्विट केले.

 

तिचे ट्विट रिट्विट करत जवळजवळ दोन हजार महिलांनी ‘मॉस्क्यू मी टू’ म्हणून आपले हजयात्रेतले अनुभव सांगितले आहेत. ‘इस्लामियत’चा वास्ता देत नबीच्या चौकटीत दुवा मागायला जाताना पावित्र्य जपण्यासाठी आपल्या विमानसेवेमध्ये संगीत वाजवले जाऊ नये म्हणून काळजी घेणार्‍या देशांचे यावर काय मत असेल? असो, हे मात्र नक्की की, स्त्रियांचे शोषण फक्त देहबाजारातच होत नाही, तर त्याची केंद्रे जगभरातल्या समाजाच्या काही विकृतांच्या मनातच घर करुन आहेत. त्यांच्या मनातला विकृतपणा कुठेही कधीही जमले तर उघडपणे आणि नाही जमले, तर काल्पनिकपणेही स्त्रियांचा बाजारच मांडतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@