अनाथांच्या आयुष्यातील ‘सुरज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019   
Total Views |


वडिलांप्रमाणे देशसेवा करण्याची संधी मिळाली नाही म्हणून युद्धभूमी ऐवजी कर्मभूमीवर अनाथ मुलांसाठी समाजकार्य करण्याचे स्वप्न पाहणार्‍या सुरज दिलीप सावंत यांच्याविषयी...

 

जन्माला आल्यानंतर समाजात एक सुजाण नागरिक होईपर्यंत आणि त्यानंतरही आयुष्याच्या प्रवासात पथदर्शी आणि आसरा म्हणून सदैव पाठीशी उभे राहणारे आईवडील ही परमेश्वराची एक अमूल्य देणगी असते. मात्र, काहीजण याला बालवयातच मुकतात आणि येतो जन्मभराचा पोरकेपणा... आईवडिलांशिवायचे जगणे आणि पोरकेपणाची भावना ही जगात वावरताना मनाला प्रचंड वेदना देणारी ठरते. अशा मुलांना मायेचा आधार म्हणून काही माणसे त्यांचे जीवन अशा चिमणपाखरांसाठी वाहून घेतात. काहीजण त्याच्या चेहर्‍यावर हसू खुलवतात. काही त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी हातभार लावतात, तर काहीजण आपल्याला जमेल त्या पद्धतीने खारीचा वाटा उचलून स्वतःला प्रसिद्धीपासून नामानिराळे ठेवतात. मुंबईतील ‘स्पर्श फाऊंडेश’न त्यापैकीच एक. या मागची संकल्पना मांडणारे सुरज दिलीप सावंत...सोशल मीडिया, वृत्तपत्रे, प्रसिद्धीमाध्यमांतून बर्‍याचदा अनाथ मुलांच्या व्यथा मांडणार्‍या बातम्या ऐकीवात येतात. या मुलांना मदत करावी, अशी भावना प्रत्येकाच्या मनात येत असते. मात्र, प्रत्यक्षात उतरून कार्य करणारे हात तसे कमीच. अनेकांना सुरुवात कशी करावी, हेच मुळात कळत नाही. सुरजही त्यापैकीच एक. मात्र, प्रवास सुरू केला की वाट आपोआप सापडते, त्याप्रमाणे सुरज यांनाही मार्ग सापडला.




 

अनाथ मुलांसाठी कार्य करणार्‍या संस्थांना आर्थिक पाठबळासह त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सुरज आणि त्यांच्या मित्रांनी काम सुरू करण्याचे ठरवले आणि खेड्यापाड्यांवर राहणार्‍या मुलांसाठी मदत गोळा करण्याचा विडा त्यांनी उचलला. सुरुवातीला काही मंडळींनी जमून या कार्यात उतरण्याचे ठरवले. त्यात विद्यार्थ्यांसाठी साहित्य, खाऊ, शिक्षणासाठी राहण्यासाठीची जशी जमेल तशी आर्थिक मदत गोळा करण्यासही सुरुवात केली. हळूहळू प्रतिसाद वाढत होता. मात्र, एकत्र येण्यासाठी एखादी संस्था सुरू करावी, त्यातून आणखी पसारा वाढवता येईल, असे हितचिंतकांनी त्यांना सुचवले आणि त्यातून ‘स्पर्श फाऊंडेशन’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. दिवस होता २६ जानेवारी, २०१९. सुरज यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येत सुरू केलेल्या या संस्थेला अवघ्या काही महिन्यातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. सुरुवातीला एक-दोघांच्या इच्छाशक्तीने सुरू झालेल्या या संस्थेसाठी आता १५ ते २० पूर्णवेळ स्वयंसेवक जोडले गेलेले आहेत. “आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असू, मात्र ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी प्रत्येकजण मदतीसाठी उभा असतो,” संस्थेच्या स्वयंसेवकांबद्दलची ही खास गोष्ट सुरज आवर्जून सांगतात.

 

ठाण्यातील पत्रकार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्पर्श’ने पहिला उपक्रम सुरू केला होता. मुरबाड येथील ‘अवनी मतिमंद विद्यालय,’ माळ या शाळेला मदत करण्याबाबत कदम यांनी सुचवले होते. त्यानुसार शाळेशी संपर्क करत सुरज यांनी वेळ ठरवून घेतली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि ग्रामीण भागातील सुमारे ४० मुले येथे शिकतात. शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून मुलांच्या आवश्यकतेनुसार साहित्य आणि आर्थिक मदत गोळा करण्याचे काम सुरज यांनी सुरू केले. त्यानंतर ठरलेल्या दिवशी शाळेला भेट देऊन मुलांना खाऊ आणि साहित्य वाटप केले. शाळेला भेट देताना मुलांसोबत धमाल, गप्पा, गाणी-गोष्टी सांगितल्यानंतर दादा-ताईंना पाहून मुलेही हरखून गेली. यावेळी मुलांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद सुरज आणि त्यांच्या टीमसाठी पावती देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या कार्याबद्दल इतरांना जागृत करत अनाथ मुलांसाठी लागणारी मदत गोळा करण्याचे काम जीवनभर सुरू ठेवावे, असा विडा ‘स्पर्श फाऊंडेशन’ने उचलला. पनवेल येथील शांतीवन वृद्धाश्रम, विरार येथील तारंगपाड्यातील अनाथाश्रम आदी ठिकाणी जाऊन गरजूंना मदतीचा हातभार लावण्याचे काम सुरूच ठेवले. भविष्यात अनाथ आणि वयोवृद्धांसाठी मोठा आधारस्तंभ उभा करण्याचे स्वप्न सुरज यांनी पाहिले आहे.




 

सुरज यांचे मूळ गाव सातार्‍यातील उमरज. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षणही गावातच झाले. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी कराड आणि पुणे येथे राहिले. पुण्यात अभियांत्रिकीची पदविका पूर्ण करून रत्नागिरी इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगध्ये पदवी प्राप्त केली. सुरज सध्या पुण्यात नोकरीला आहेत. वडील सैन्यात असल्याने समाजसेवेचा वारसा घरातूनच मिळालेला आहे. त्यामुळे पुण्यात राहूनही मुंबई, ठाण्यातील मित्रांच्या मदतीने ‘स्पर्श फाऊंडेशन’चे काम नित्यनेमाने पाहतात. आपल्या रोजच्या काम व्यस्त असूनही नियमितपणे संस्थेच्या विविध कामांना वेळ देतातसुरज यांना आता त्यांच्या मित्रमैत्रिणींसह समाजातील इतर वर्गाचाही पाठिंबा मिळत आहे. अनेक जण आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून मदतीचा हात पुढे करत आहेत. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच सुरू केलेल्या या समाजकार्याला इतका चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा स्वतः सुरज यांनाही नव्हती. मात्र, मिळणार्‍या आशीर्वादाच्या जोरावर आम्हाला काम करण्याचे बळ मिळते, असे सुरज सांगतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@