वेमावरम : कोणत्याही शिवणकामाशिवाय तसेच कापडाच्या जोडणीशिवाय एकाच धाग्यातून भारताचा राष्ट्रध्वज-तिरंगा तयार करण्याचे स्वप्न एका व्यक्तीने पाहिले आणि त्यात यशही मिळवले. आंध्र प्रदेशातील ही व्यक्ती असून आर. सत्यनारायण, असे त्यांचे नाव आहे.
आजवर कुणीही न केलेले काम करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या आर. सत्यनारायण यांना आपले हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी अनेक खडतर आव्हानांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे राष्ट्रध्वजाप्रतीच्या प्रेमापायी सत्यनारायण यांनी आपले वडिलोपार्जित घरदेखील विकले व तिरंगा साकारला.
आर. सत्यनारायण हे आंध्र प्रदेशातील वेमावर गावातील हातमाग कारागीर असून एकाच धाग्यात तिरंगा तयार करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना साडेसहा लाख रुपयांची गरज भासणार होती. काहीही करून हे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी चंगच बांधला. त्यासाठी त्यांनी आपले वडिलोपार्जित घर विकून टाकले आणि पैसे जमवले.
सत्यनारायण यांनी निर्मिती केलेल्या तिरंगा-राष्ट्रध्वजाचा आकार ८ फूट बाय १२ फूट इतका असून त्यांनी दावा केला की, अशाप्रकारे केशरी, पांढर्या आणि हिरव्या रंगासह निळ्या रंगातील अशोकचक्र असा तिरंगा खादीच्या एकाच धाग्यापासून आजवर तयार करण्यात आलेला नाही. तिरंगा तयार करताना तिन्ही रंगांचे भाग निश्चित मापांमध्ये जोडूनच किंबहुना शिवूनच तयार केले जातात.
दरम्यान, आता हा अनोखा राष्ट्रध्वज तयार झाल्यानंतर सत्यनारायण यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे स्वप्न बाळगले आहे, ते म्हणजे हा ध्वज त्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहायचे आहे. या किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करतात. त्यासाठी सत्यनारायण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ते नुकतेच विशाखापट्टणमच्या दौर्यावर आले होते, त्यावेळी भेट घेतली आणि तिरंगा त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, आपल्या या विशिष्ट कामाची माहिती पंतप्रधानांना विस्ताराने सांगण्यास त्याला पुरेसा वेळच मिळाला नाही.
अशा अनोख्या राष्ट्रध्वजाचे विणकाम करण्यासाठी सत्यनारायण यांना चार वर्षांचा कालावधी लागला. अशा वेगळ्या पद्धतीने राष्ट्रध्वज तयार करण्याची आवड कशी निर्माण झाली, या प्रश्नाला उत्तर देताना नारायण म्हणाले की, “मी लिटल इंडियन्स नावाचा एक लघुपट पाहिला होता. यामध्ये त्यातील कलाकार एकत्रितपणे शिवणकामाद्वारे तीन रंगांचा राष्ट्रध्वज तयार करतात, असे दाखवले होते. त्यातूनच प्रेऱणा घेत अनोख्या पद्धतीने कोणतेही शिवणकाम न करता राष्ट्रध्वज साकारायचे मी निश्चित केले होते.”
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat