ममता बॅनर्जी यांचे दुहीचे घातक राजकारण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019   
Total Views |



. बंगालमध्ये लोकशाहीची जी गळचेपी ममता बॅनर्जी यांनी चालविली आहे, त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राजधानी दिल्लीसह देशात विविध ठिकाणी धरणे धरले होते. त्यामुळे ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये कसे दुहीचे राजकारण खेळत आहेत, त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

 

सध्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी प्रचार चालू आहे. येत्या १९ मे रोजी मतदान संपल्यानंतर सर्वांना निकालाची प्रतीक्षा असेल. पण, ते निकाल लागण्याआधीच काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली असल्याचे दिसून येत आहे. त्यातील एक म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या होत. प. बंगाल म्हणजे आपलीच जहागीर असल्याच्या थाटात त्या वावरत आहेत. देशाची संघराज्यीय चौकटही त्यांना मान्य नाही. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानावयासही त्या तयार नाहीत. प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षास मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्या सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवून भाजपला नामोहरम कसे करता येईल, एवढाच विचार रात्रंदिवस करीत असल्याचे दिसून येते.

 

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या 'रोड शो'चे आयोजन दि. १२ मे रोजी कोलकात्यामध्ये करण्यात आले होते. या रोड शोच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये, याची संपूर्ण जबाबदारी प. बंगाल सरकारवर होती. पण, ती जबाबदारी संभाळण्याऐवजी त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि अन्य समाजकंटकांना मोकळे रान सोडून दिले. शांततापूर्ण रोड शोच्या दरम्यान हिंसाचार, दगडफेक, जाळपोळ घडवून आणून त्यामध्ये बाधा आणण्यात आली. या दरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर महाविद्यालयाच्या परिसरात दगडफेक झाली. या हिंसाचारादरम्यान त्या महाविद्यालयात असलेल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अर्धपुतळ्याची तोडफोड झाली. या घटनेस नेमके जबाबदार कोण आहेत, याचा शोध घेण्याच्या आधीच विद्यासागर यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, त्याचे निमित्त साधून बंगालमधील जनतेला भडकविण्याचा उद्योग ममतादीदींनी सुरू केल्याचे दिसून येते. ममता बॅनर्जी सरकारने बघ्याची भूमिका घेऊन जो नाकर्तेपणा दाखविला, त्याच्या निषेधार्थ भाजपने राजधानी दिल्लीसह विविध ठिकाणी धरणे धरून लोकशाही वाचविण्याचे आवाहन जनतेला केलेममता बॅनर्जी या पुतळा विटंबनेचे निमित्त साधून, बंगालच्या अस्मितेचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून जनतेला चिथविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपला बदनाम करण्याची ही आयती संधी मिळाल्याचे लक्षात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

 

महान शिक्षणतज्ज्ञ, लेखक, तत्त्ववेत्ते, समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल प. बंगालमधील जनतेला जेवढा आदर आहे, तेवढाच प्रत्येक देशवासीयास आहे, हे ममता बॅनर्जी यांनी, तृणमूल काँग्रेसने, सीताराम येचुरी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विसरता कामा नये. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पुढील शब्दात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे वर्णन केले आहे. "One wonders how god in the process of producing ४० million Bengaliis, produced a man! " अशा श्रेष्ठ समाजसुधारकाचा अवमान करण्याचा विचार कोणाही सुजाण भारतीयाच्या मनात येणार नाही. प्रकांडपंडित असलेल्या ईश्वरचंद्र बंदोपाध्याय यांनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर 'विद्यासागर' ही बिरुदावली प्राप्त केली होती. केवळ बंगालमधील जनतेलाच नव्हे, तर सर्व भारतीयांना त्यांच्याबद्दल आदर आहे.

. बंगालमध्ये निर्माण झालेली ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्या राज्यातील निवडणूक प्रचार एक दिवस आधीच थांबविण्याचा निर्णय घेतला. देशाच्या इतिहासात असा निर्णय प्रथमच घेण्यात आला. त्या राज्यातील नऊ जागांसाठी येत्या १९ मे रोजी मतदान होणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकाता शहरातील रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कथित गुंडांनी केलेला हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक या घटनाही आयोगाच्या निर्णयास कारणीभूत आहेत. रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कथित समर्थकांनी हिंसाचार घडविला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अर्धपुतळ्याची तोडफोड केली. या घटनेस नेमके कोण जबाबदार आहे, याची शहानिशा न करताच त्या घटनेचे भांडवल करून बंगाली अस्मितेचा अपमान झाल्याची आवई ममता बॅनर्जी यांनी उठविली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही या घटनेचे निमित्त साधून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

 

पण, ज्यांना कशाचाही विधीनिषेध नसतो, ते कोणत्याही गोष्टीचे कसे भांडवल करतात, हे ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी यांच्या आणि त्यांच्या पक्षांच्या वर्तनावरून दिसून येते. अमित शाह यांच्या रोड शोवर समाजकंटकांनी हल्ला केला. हे समाजकंटक तृणमूल काँग्रेसचे समर्थक असल्याचा संशय आहे. हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक त्याच लोकांकडून झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच केली असल्याचे ठाम प्रतिपादन भाजप अध्यक्षांनी केले आहे. भाजपच्या डोळ्यास डोळा भिडविण्याची हिंमत नसलेल्या ममता बॅनर्जी या, विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे भांडवल करून दुहीचे राजकारण खेळत आहेत. बंगालमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही तृणमूलचा दावा खोडून काढला असून 'तृणमूल छात्र परिषद' ही संघटना विद्यासागर महाविद्यालयातील गुंडगिरीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तीच मंडळी त्यावेळी महाविद्यालयात होती, त्यामुळे विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी तृणमूलच्या गुंडांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.

 

ममता बॅनर्जी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे यापूर्वीही काही उदाहरणांवरून दिसून आले आहे. 'जय श्रीराम' घोषणा दिल्याबद्दल त्यांना आलेला राग देशाने अनुभवला आहे. तसेच रामाचा आणि बंगाली संस्कृतीचा संबंधच काय, असा प्रश्न विचारण्याचे धाडस करून, प. बंगालमध्ये रामनवमी उत्सवास जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्यास विरोध करण्याचा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला. एवढेच नव्हे तर दुर्गापूजेच्या दरम्यान आलेला मोहरम लक्षात घेऊन, दुर्गा विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध आणून ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण करण्याचे जे प्रयत्न केले तेही जनता विसरलेली नाही.

 

लोकशाहीने सर्वांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले असतानाही ते ममता बॅनर्जी यांना सहन होत नसल्याचे दिसून येते. देशाच्या हितापेक्षा स्वत:च्या आणि तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता टिकविण्यातच त्यांना अधिक रस आहे. आपली मतपेढी शाबूत राहावी, यासाठी दुहीचे राजकारण त्यांच्याकडून खेळले जात आहे. तसेच बंगालमधील संस्कृती वेगळी असल्याचे सांगून ममता बॅनर्जी या विविधतेत एकता असलेल्या हिंदू संस्कृतीसंदर्भात नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@