देशद्रोही कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीला कॉंग्रेस आणि मीडिया, माफीनाम्यावरून स्वा. सावरकरांच्या चारित्र्यहननाचे उद्योग फार मोठ्या प्रमाणात करत असते. कॉंग्रेसचा आरोप आहे की, स्वा. सावरकरांनी अंदमानच्या जन्मठेपेची शिक्षा माफ करण्यासाठी इंग्रज सरकारला पत्र लिहून माफी मागितली. पत्र लिहिण्यामागचा उद्देश विचारात न घेता कॉंग्रेस स्वा. सावरकरांना पळपुट्या, गद्दार आणि देशद्रोही ठरवून त्यांच्या चारित्र्यहननाचे काम करत असते. कॉंग्रेस सर्मथकांचा कृतघ्नपणा पाहून त्यांना प्रश्न विचारावे की, सावरकरांच्या माफीनाम्यामुळे देशाचे काय नुकसान झाले? किती माणसे मारली गेली? एका व्यक्तिगत घटनेमुळे देशाची बदनामी कशी काय झाली? याच्या तुलनेत कॉंग्रेसच्या नेहरू-गांधी घराण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले. अनेक माणसे मारली गेली. देशाची बदनामी झाली. मग प्रश्न असा आहे की, देशद्रोही कोण? स्वा. सावरकर की नेहरू-गांधी घराणे? स्वा. सावरकरांचे चारित्र्यहनन थांबविण्यासाठी कॉंग्रेस समर्थकांना आरसा दाखविणे ही काळाची गरज आहे. स्वा. सावरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.
 
 
 
स्वा. सावरकरांच्या माफीनाम्यावर खूप काथ्याकूट झाला आहे. त्यांनी अंदमानातून इंग्रजांना पाठविलेली पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. सगळी माहिती नेटवर उपलब्ध आहे. पण, सर्वसामान्य भारतीयांना कॉंग्रेसचे, सावरकरांच्या चारित्र्यहननाच्या पाठीमागचे माहीत नसलेले मूळ कारण आहे हिंदुत्व. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे पालनपोषण, शिक्षण आणि संस्कार ब्रिटनमध्ये झाले. त्यांच्यावर युरोपीय विचारांचा पगडा होता. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि मिश्रअर्थव्यवस्था असे पाश्चिमात्य सिद्धान्त अंमलात आणले. पण, भारतात हिंदुत्वाची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की, भारतीयांना नवीन विचार एकदम अंगवळणी पडत नव्हते. यावर उपाय म्हणून नेहरूंनी हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली. त्यांनी हिंदुत्ववादी व्यक्ती, संस्था आणि संघटनांना बदनाम करणे सुरू केले. स्वा. सावरकरांना महात्मा गांधीजींच्या हत्येत गोवले. संघावर बंदी आणली. हिंदुमहासभा आणि जनसंघासारख्या पक्षांना सांप्रदायिक आणि जातीयवादी ठरविले. आजही नेहरूंची परंपरा त्यांच्या घराण्याने पुढे चालू ठेवली आहे. स्वा. सावरकरांचे चारित्र्यहनन करणार्या कॉंग्रेसच्या समर्थकांना पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवायचे आहे की, नेहरू-गांधी घराण्यातील पंतप्रधानांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले, अनेक माणसे मारली गेली आणि देशाचे नाव बदनाम झाले.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर भारताच्या फाळणीचे नियोजन करण्याची जवाबदारी होती, पण त्यांनी ती बरोबर निभावली नाही. त्यामुळे लाखो लोक मारले गेले. त्याचप्रमाणे जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी पाठवलेल्या भारतीय सैन्याला नेहरूंनी परत बोलवून काश्मीर प्रश्न युनोच्या न्यायालयात घेऊन जाण्याची फार मोठी चूक केली. ज्याचा निकाल आजपर्यंत लागला नाही. उलट, काश्मीरसाठी 370 आणि 35 ए कलम संविधानात जोडले. काश्मीरच्या काही भागावर कब्जा केल्यानंतरही पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले. फाळणीमुळेच महात्मा गांधींची हत्या झाली. आजपर्यंत काश्मीर प्रश्नामुळे जितकी माणसे मारली गेली आणि देशाचे नाव बदनाम झाले, त्या सर्वांची नैतिक जबाबदारी नेहरूंचीच आहे. तसे नेहरूंच्या अनेक चुकांपैकी नेपाळचा भारतात विलयाचा प्रस्ताव नाकारणे, संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्य होण्याचा प्रस्ताव नाकारून चीनला देणे तसेच कोको आणि काबू घाटी म्यानमारला भेट देणे, पुढे म्यानमारने तो भूभाग चीनला दिला, यापण महत्त्वाच्या घटना आहेत. तटस्थ राष्ट्रांचे नेतृत्व करणार्या नेहरूंनी चीनला तिबेटवर कब्जा करू दिला, ही पण त्यांची फार मोठी चूक होती. ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या घोषणा देणार्या नेहरूंना चीनचे विस्तारवादी राजकारण समजलेच नाही. चीनने भारतावर आक्रमण केले, भारताचा दारुण पराभव झाला. चीनने भारताच्या अक्साई चीन भूभागावर कब्जा केला. देशाचे दुर्दैव की, नेहरू पंतप्रधान झाले. जर सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर चित्र वेगळे राहिले असते.
इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळत देशाची अपरिमित हानी झाली आणि जगात भारताची अपकीर्ती झाली. भारत-चीन युद्धात जगातील कोणत्याही देशाने भारताला मदत केली नाही. भारताचे तटस्थ राष्ट्राचे धोरण सोडून इंदिरा गांधींनी 1971 मध्ये रशियाशी मैत्रीचा करार केला. रशियाच्या मदतीशिवाय भारत 71 चे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकूच शकला नसता. रशियामुळेच बांगलादेशची निर्मिती झाली. अमेरिका, चीनसह अन्य देशांचा दबाव असल्यामुळे शरण आलेल्या 93 हजार सैनिकांना परत करूनही भारताला काहीही फायदा झाला नाही. रशियाच्या प्रभावामुळे इंदिरा गांधींनी भारतात रशियाची अर्थव्यवस्था अंमलात आणली. इंदिरा गांधींनी बँकांचे, कोळसा खाणींचे आणि इतर उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले. पहिलेच मिश्रअर्थव्यवस्थेमुळे परमिट राज सुरू होते, त्यात राष्ट्रीयीकरणामुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली. 1991 मध्ये नरिंसह राव सरकारातील अर्थमंत्री मनमोहनिंसगांनी आर्थिक उदारीकरण आणून भारताला जगाच्या मुक्त अर्थव्यवस्थेशी जोडले. असे केले नसते तर रशियाप्रमाणे भारतावरही गंभीर आर्थिक संकट आले असते. यासाठी मनमोहनिंसगांचे फार आभार मानले जातात. पण, आश्चर्य म्हणजे ज्या इंदिरा गांधींमुळे भारत अप्रगत राहिला त्यांना कुणीही दोष देत नाही. रशियाच्या संगतीचाच परिणाम की, इंदिरा गांधींनी न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेल्यावर भारतावर आणिबाणी लादली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले. संघावर बंदी आणून स्वयंसेवकांना तुरुंगात टाकले. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी संविधान संशोधन करून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद सिद्धान्त संविधानात जोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे काम नेहरू करू शकले नाहीत ते इंदिरा गांधींनी केले. यानंतर भारतात तुष्टीकरणाचे आणि जातीयवादाचे राजकारण सुरू झाले. याचाच परिणाम म्हणजे पंजाबची समस्या. इंदिरा गांधींनी पंजाबमध्ये विरोधकांना पराभूत करण्यासाठी जनरैलिंसग भिंद्रानवाल्याचे भूत उभे केले. जेव्हा त्यांनी खालिस्तानचे आंदोलन सुरू करून स्वर्णमंदिर ताब्यात घेतले तेव्हा सैन्य कारवाई केली. त्यामुळे इंदिरा गांधींची हत्या झाली. जर इंदिरा गांधींच्या कार्याची गोळाबेरीज केली तर लक्षात येईल की, भारताचे नुकसान जास्त झाले.
राजीव गांधींना वारसाहक्काने पंतप्रधानपद मिळाले. ते वैमानिकाची नोकरी सोडून पंतप्रधान झाले. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे उफाळलेल्या दंगलींना थाबविण्याऐवजी त्यांनी एकप्रकारे पाठिंबा दिला. देशात हजारो शीख मारले गेले. दिल्लीत तर अनेक शिखांना जिवंत जाळले. हे कृत्य करणार्या सज्जनकुमारला काही दिवसांपूर्वी शिक्षा झाली. राजीव गांधींना राज्यकारभाराचा काहीच अनुभव नसल्यामुळे त्यांची धरसोड वृत्ती दिसून येत होती. मुस्लिमांच्या मतांसाठी सर्वोच्च न्यायालयाने पोटगीसाठी शहाबानोच्या बाजूने दिलेला निकाल संसदेत कायदा करून परत फिरविला. विरोधानंतर हिंदूंच्या मतासाठी अयोध्येतील राममंदिराचे कुलूप काढले. भोपाळच्या युनियन कार्बाईड कंपनीमध्ये विषारी वायुगळतीमुळे अनेक लोक मेले व हजारो लोक अपंग झाले. राजीव गांधींनी त्या कंपनीचा मालक अॅण्डरसनला पळून जाण्यात मदत केली. श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठविणे, हा राजीव गांधींचा सगळ्यात चुकीचा निर्णय होता. श्रीलंकेत राहणारे तामीळ नागरिक समान हक्कासाठी आंदोलन करत होते. सरकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलन हिंसक झाले. भारताने त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी आपले सैन्य पाठविले. युद्धात एलटीटीईचे बरेच आतंकवादी आणि अनेक भारतीय जवान मारले गेले. शेवटी भारताला आपले सैन्य परत बोलवावे लागले. श्रीलंकेचे काम सोपे झाले. श्रीलंकेने सैन्य कारवाई करून हजारो तामिळांना मारले. तामिळांच्या विनाशाचा बदला घेण्यासाठी त्यांनी राजीव गांधींची हत्या केली. पंतप्रधानपदाचे निकष वंशवादाचे असावे की योग्यता असावे, हा प्रश्न भारतात आजही चर्चेचा विषय आहे.
स्वा. सावरकरांच्या असामान्य व्यक्तिमत्त्व, प्रखर बुद्धिमत्ता, जाज्वल्य देशप्रेम, इतिहासकार, लेखक, चिंतक कवी, वक्ता, जहाल क्रांतिकारक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, हिंदुत्ववादी... असे विविध गुण आणि त्यांनी अंदमानात भोगलेल्या शिक्षेची तुलना नेहरू-गांधी घराण्याशी होऊच शकत नाही. तरीही स्वा. सावरकरांचे चारित्र्यहनन करणारे कॉंग्रेस समर्थकांचे प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. तसे कॉंग्रेसने आपल्याच पक्षाच्या सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक नेत्यांविरोधात षडयंत्र केले होते. जर प्रामाणिकपणे नेहरू-गांधी घराण्याच्या कार्याचे मूल्यमापन केले तर असा निष्कर्ष निघतो की, दुसर्या महायुद्धात नेस्तनाबूत झालेले अनेक देश आज प्रगत म्हणून गणले जातात, पण भारत 70 वर्षांनंतरही विकसनशील देश म्हणूनच गणला जातो. आज भारतापुढील सर्व समस्या नेहरू-गांधी घराण्यामुळे आहेत. नेहरू-गांधी घराण्यामुळे अनेक माणसे मारली गेली, देशाचे अतोनात नुकसान झाले आणि जगात भारताचे नाव बदनाम झाले. या सर्व पुराव्यांवरून भारतीयांनी ठरवावे की देशद्रोही कोण? स्वा. सावरकर, की नेहरू-गांधी घराणे?
 
 
 
वीरेंद्र देवघरे
@@AUTHORINFO_V1@@