यंदाही मुंबईची तुंबई होणार?

    14-May-2019   
Total Views | 63


मान्सूनचे आगमन आता अवघ्या महिन्यावर असून दरवर्षीप्रमाणे मुंबई आणि परिसरात नालेसफाईच्या कामांनी वेग घेतला आहे. तेव्हा, यासंदर्भातील पालिकेची कामे, पर्जन्यजलवाहिन्या आणि पाण्याचा निचरा याचा आढावा घेणारा हा लेख...

 

पावसाळा आता साधारण महिन्यावर असताना मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामांनी आणि पूर नियंत्रण उपाययोजनांनी वेग घेतला आहे. परंतु, मुंबईत ज्या ठिकाणी मेट्रोची व इतर प्रकल्पांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी महापालिकेला अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहेत.

 

तत्कालीन मुंबईमहानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दि. ११ मे रोजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे व इतर अधिकार्‍यांबरोबर कामाच्या परीक्षणाकरिता एक बैठक घेतली होती. त्यामध्ये एमएमआरडीए व एमएमआरसीएलची मेट्रोची कामे आणि त्यासंबंधात महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. या प्रकल्पांमुळे पर्जन्यवाहिन्यांमध्ये गाळ व चिखल जाऊन, त्या खराब होऊ शकतात म्हणून अशा ठिकाणी कोणती खबरदारीची कामे करता येतील, याविषयी जास्त चर्चा झाली.

 

मुंबई महापालिकेला गेल्या वर्षीच्या अनुभवावरून मेट्रोच्या कामांमुळे पाणीनिचर्‍यास अडथळा निर्माण होतो, हे माहीत झाले होते. 'मेट्रो ३'च्या कामांमुळे हुतात्मा चौक, विधानभवन, कफपरेड, कुलाबा-वांद्रे सीप्झ या भागात पाणी तुंबले होते. त्याविषयी 'मेट्रो ३'च्या चालकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देऊन एमएमआरडीए व एमएमआरसीएलच्या प्रतिनिधींनी संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले.

 

मुंबई शहरात एकूण २७६.९२ किमी लांबीच्या मोठ्या व ४३८.०९ किमी लांबीच्या छोट्या पर्जन्यवाहिन्या आहेत. पालिका अधिकार्‍यांच्या अंदाजाप्रमाणे, मोठ्या जलवाहिन्यांमधील ३ लाख, ३४ हजार, ७६२ टन चिखल व गाळापैकी १ लाख, ४८ हजार, ६६४ टन गाळ ३० एप्रिलपर्यंत तसेच छोट्या जलवाहिन्यांमधील २ लाख, ०६ हजार, १८५ टन गाळापैकी ४१ हजार, ९२५ टन गाळ काढून झाला आहे. म्हणजे सुमारे ४० टक्के गाळ उपसण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 

सर्व विभागांमधील 'धोकादायक' इमारतींकडे जास्त लक्ष द्यावे, अशा पालिका आयुक्तांनी आणखी सूचना दिली. शहरातील ६१९ इमारती 'सी १' प्रकारात मोडणार्‍या म्हणजे जास्त मोडकळीस आलेल्या असून, त्याकडे त्वरित लक्ष द्यावयास हवे. त्यातील नागरिकांना स्थलांतरित करून त्या इमारती रिकाम्या कराव्यात आणि त्या इमारती धोका टाळण्याकरिता पाडून टाकाव्यात. पूरबाधित २२५ अधिक ४८ ठिकाणांकडे लक्ष देणे व उघडी असणारी मॅनहोल्स तातडीने बंद करण्याची कामे लगेच हाती घ्यावी

 

मोरी सफाईसाठी रेल्वेची कामे

महापालिका रेल्वेला ४.५५ कोटी देणार व त्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्यास पाणी तुंबण्याची भीतीहील पालिकेने व्यक्त केली आहेपश्चिम, मध्य व हार्बर रेल्वेवरील कचर्‍याने तुडुंब भरलेल्या मोर्‍यांची (र्लीर्श्रींशीीं) सफाई पूर्ण करावी, अशी पालिकेने पत्राद्वारे रेल्वेला विनंती केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. पश्चिम रेल्वेवर १६०, मध्य रेल्वेवर ११० व हार्बर रेल्वेवर ६६ मोर्‍यांचा त्यात समावेश आहे. एकूण ३३६ मोर्‍यांपैकी २३१ मोर्‍या अधिक संवेदनशील आहेत. या संवेदनशील मोर्‍यांमुळे पाणी साठून मुंबईच्या जीवनवाहिनीला फटका बसत आहे, असे पालिकेच्या निदर्शनास आले. रेल्वेने घोषित केले आहे की, आमची ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत व योग्य त्या ठिकाणी पाणी खेचणारे पंप बसविले आहेत.

 

मध्य मुंबई तुंबणार नाही!

पालिका क्षेत्रातील पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा म्हणून एकूण तीन हजार मीटरहून अधिक लांबीच्या पर्जन्यवाहिन्यांची पुनर्बांधणीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. या वाहिन्यांची क्षमता तासाला ५० मिमी इतकी वाढणार आहे. त्यामुळे परळ, लालबाग, माझगाव या परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. ब्रिटिशांच्या वेळेस या पर्जन्यवाहिन्या तासाला २५ मिमी पाण्याचा निचरा करण्याच्या गरजेनुसार बांधल्या होत्या. शहरातील वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा होण्यास मर्यादा येतात. पर्जन्यजल खात्याचे मुख्य अभियंता श्रीकांत कावळे यांनी सांगितले की, “लालबाग पुलाखाली पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन मीटर रूंदी व दीड मीटर उंचीची बॉक्स ड्रेन तयार करण्यात आली आहे. माझगावच्या जिजाबाई राठोड मार्गालगतच्या वाहिन्या एक हजार मिमी व्यासाच्या व पुढील भाग १४०० मिमी, १८०० मिमी व्यासाच्या बनविण्यात आल्या आहेत. भायखळ्याच्या व मंडलिक पूल (ी लीळवसश) यांच्या छेदनाठिकाणी सुधारित आरेखनानुसार कामे केली आहेत.”

धोकादायक मॅनहोल्सना जाळ्या

पाणी खाते, मलजल खाते व पर्जन्यजल खाते इत्यादींचे मॅनहोल्स असतात व त्याच्या सुमारे ३ हजार, ३१५ ठिकाणी धोकादायक मॅनहोल्सच्या तोंडावर पालिकेने जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. ५५० ठिकाणी हे काम झालेले नाही. परंतु, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. या जाळ्यांची किंमत प्रत्येकी ९ हजार, ४८० आहे. ही कामे काही टप्प्याटप्प्यानेच पूर्ण करावी लागतात. पहिल्या टप्प्यात शहर भागात १ हजार, ७४२ मॅनहोल्सना जाळ्या लावलेल्या आहेत. 'जी' उत्तर भागात सर्वात जास्त ४७६ मॅनहोल्सना जाळ्या लावलेल्या आहेत. दुसर्‍या टप्प्यात १ हजार, ५७३ मॅनहोल्सना जाळ्या लावण्याचे काम बाकी आहे. वांद्रे व अंधेरी भागातही मॅनहोल्स जास्त आहेत.

 

आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र

आपत्कालीन २४ तास व्यवस्थापन करणार्‍या कार्यालयात शहरातील पालिका कार्यालयात १ हजार, ९१६ खोल्या आहेत. त्याचप्रमाणे हे कार्यालय आता परळला २ मार्चपासून सुरू झाले आहे. शहरात एकूण पाच हजार सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ५० हॉट टेलिफोन लाईन्स रुग्णालये, ट्रॅफिक पोलीस, विभाग कार्यालये, पोलीस स्थानके, सरकारी आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालय, वेधशाळा आदी ठिकाणांकरिता तसेच १०० हून अधिक टेलिफोन्स लाईन्स राखून ठेवल्या आहेत. सकाळच्या वेळी पाणीपुरवठा, घनकचरा, रस्त्यांवरच्या खड्ड्यांविषयीच्या तक्रारी जास्त येतात. रात्रपाळीच्या वेळेस बर्‍याच वेळेला जुन्या तक्रारींच्या आठवणींकरिता असतात. या आपत्कालीन व्यवस्थापनाकरिता वेळ येईल, तशा अग्निशामक दल, एनडीआरएफ, रुग्णालये, पोलीस स्थानके, सरकारी कार्यालये, वाहतूक विभाग आणि रासायनिक कंपन्यांशी त्वरित संपर्क साधला जातो.

 

पालिका कार्यालयातील आपत्कालीन विभागाचे काम कधीकधी ठप्प होते, तेव्हा परळचे केंद्र सुरू करण्यात येते. परळच्या केंद्रात आपत्कालीन कामांशिवाय अभ्यासाकरिता आर्ट गॅलरी, प्रशिक्षण केंद्र इ. असून तिथे भूकंप, पूर, वादळे, आगी इत्यादींविषयी चित्रे व माहिती दाखविली जाते. आपत्कालीन विभागाचे मुख्य अधिकारी महेश नार्वेकर हे आपत्कालीन व्यवस्थापनाकरिता पूर्ण जबाबदारीने काम सांभाळत आहेत.

आपत्कालीन तक्रारींमध्ये पाणी तुंबणे, इमारत पडणे, उंच इमारतीतील व इतर आगीविषयी तक्रारी इत्यादींचा समावेश असतोमुंबई महानगरपालिकेने नागरिकांना जोराचा पाऊस व भरतीची वेळ हे दोन्ही एकाच वेळी घडले, तर पावसाचे पाणी तुंबू शकते व खबरदारी म्हणून पावसाळ्यातील २८ वेळा मोठी भरती येईल, असे दिवस नोंदवून ठेवायला सांगितले आहेत. ते व त्यांच्या जूनमधील वेळा व भरतीची उंची मीटरमध्ये कंसात दिली आहे - जूनच्या दिवसातील भरतीच्या वेळा व उंची मीटरमध्ये अनुक्रमे - ३/६ (१२.१२, ४.५३), ४/६ (१२.५३, ४.६४), ५/६ (१.३६, ४.६८), ६/६ (२.२०, ४.६५), ७/६ (३.०७, ४.५५), १७/६ (१२.१८, ४.५०)

 

हवामान व पर्जन्य साधने

वेधविभाग, पुणे कार्यालयातर्फे पालिकेने ६० ठिकाणी आपोआप हवामानाची नोंदणी करणारी केंद्रे (अथड) स्थापली आहेत. त्यामुळे हवामान बदल व २०० रेन गेजेसच्या साहाय्याने पर्जन्याविषयी विशिष्ट स्थानाची तत्काळ माहिती उपलब्ध होते. तसेच तापमान, वार्‍याचा वेग आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता किती टक्के हेसुद्धा कळते. डब्ल्युएस केंद्रे पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये, पालिका रुग्णालयात आणि अग्निशामक दलकेंद्रात ठेवली आहेत. याविषयी २००५च्या मोठ्या पुरानंतर चितळे समितीने मार्गदर्शन केले होते.

 

पर्जन्यजल उदंचन केंद्रे

आठ संरचित उदंचन केंद्रांपैकी मुंबई मनपाकडून गझदरबंद उदंचन केंद्र सुरू करण्यासाठी दोन वेळा कालमर्यादा (वशरवश्रळपशी) सांगण्यात आल्या होत्या आणि त्या पुढे वाढविण्यातही आल्या. 'प्रतिभा इंडस्ट्रीज' या ठेकेदारी घेणार्‍या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. नव्या कंपनीने हे काम युद्धपातळीवरसुरू केले असून ते मे अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. माहुल व मोग्रा उदंचन केंद्रे ही फक्त कागदावरच राहिली आहेत. माहुल केंद्र मिठागराच्या जागेवर बांधावयाचे असल्याने अजून त्या केंद्रबांधणीला केंद्र सरकारकडून 'पर्यावरण अनुमती' मिळालेली नाही. मोगरा केंद्राचे काम सुरू करता येत नाही. कारण, ती जागा न्यायालयाच्या खटल्यात अडकलेली आहे. पालिका अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, बाकी काम मान्यता मिळताक्षणी पुरे करण्यात येणार आहे. याबाबतीत पालिका अधिकार्‍यांनी वाहिनी संरचना वा स्थान बदलून पर्यायी केंद्रे वापरात आणता येतील का, ते बघून प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण केले पाहिजे.

 

अंधेरी सब-वे पंपहाऊस काम अजून सुरू झालेले नाही. कारण, वाहतूक नियंत्रक पोलिसांनी उशिरा परवानगी दिली आणि तीही पूर्णपणे दिली नसल्याचे समजते. सध्याच्या घडीला हाजीअली, लव्हग्रोव्ह, वरळीचे क्लिव्हलँड, जुहूचे इर्ला आणि रे-रोडचे ब्रिटानिया ही उदंचन केंद्रे सुरू झालेली आहेत. पाऊस पडल्यावर ब्रिटानिया उदंचन केंद्र सुरू करण्यास उशीर झाला, तर हिंदमाता सखल भागात पाणी तुंबते. असेच इतर ठिकाणी पण घडू शकते. म्हणजेच उदंचन केंद्राची पालिकेकडून योग्य प्रकारे देखभाल ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. एकंदरीत पाणी तुंबण्याची स्थिती पालिकेच्या कामावर अवलंबून आहे. ती पालिकेची कामे पूर्ण होतील व पावसाळ्यात परिस्थिती खराब होऊ नये म्हणून आपण फक्त आशा करूया.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121