'पार्टी कल्चर'मुळे हृदयविकाराचा वाढता धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |


 


ठाणे : सततच्या मानसिक ताणतणावाला सामोरे जाताना 'पार्टी कल्चर'चा आधार घेणाऱ्या मुंबईकरांमध्ये हृदयविकार वाढत असल्याचे निरीक्षण बोरिवलीतील 'अपेक्स हॉस्पिटल' समूहाने नोंदविले आहे. आपला मृत्यू हृदयविकारांमुळे होईल, अशी भीती मुंबईकरांना सतावत असल्याची नोंद गेल्या सहा महिन्यामध्ये पाचशेहुन अधिक मुंबईकरांशी संपर्क साधल्यावर अपेक्स हॉस्पिटल समूहाकडे आहे.



व्यायामाचा अभाव, सततचा मानसिक ताणतणाव, कामाच्या वाढीव वेळेमुळे जंक फूडची लागलेली सवय व मानसिक ताणतणाव घालविण्यासाठी पार्टी कल्चरचा घेतलेला आधार अशा अनेक बाबी या सर्वेक्षणामध्ये दिसून आल्या. आपला मृत्यू हा हृदयविकारामुळे होईल अशी सततची चिंता बहुसंख्य मुंबईकरांना सतावत आहे, परंतु इच्छाशक्तीअभावी आपण शिस्तबद्ध आरोग्यशैली अवलंबू शकत नाही याचीही खंत अनेक मुंबईकरांनी व्यक्त केली.
 


आजच्या मुंबईचा नकाशा पनवेल, खोपोली, पालघर, वांगणी व बदलापूरच्या पुढे विस्तारला असून दिवसातील २० ते २५ टक्के वेळ हा प्रवासात जात असल्याचे दिसून आले. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ व्रजेश शहा म्हणाले, " मुंबईतील मालाड, बोरिवली, दहिसर व मीरा रोड या उपनगरातील विविध परिसरातील ३० ते ६० वयोगटांतील व्यक्तींना घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात तंबाखू व दारूचे व्यसन हा कळीचा मुद्दा समोर आला असून, सध्या फक्त झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गातून आलेली तरुण मंडळीच नव्हे तर, अगदी विदेशी गाड्यांमधून फिरणारा तरुण वर्ग, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारा वर्गदेखील व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसतो.

 

व्यसन तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट

आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक होण्याचा धोका असल्याची माहिती काही जेष्ठ नागरिकांनी दिली, परंतु आजची पिढी ही कोणाचेच ऐकत नाही व त्यांच्या खिशामध्ये जरुरतीपेक्षा जास्त पैसा खेळू लागल्यामुळेच त्याना व्यसनांची सवय लागली आहे, असे निरीक्षण समोर आले आहे. रात्री दारूपाटर्य़ा, वीकेंडचे ऑउटिंग, काम संपल्यावर हॉटेलिंग ही आज खूप जणांची एक जीवनशैली झाली आहे.

 


फास्ट फूडही कारणीभूत

रेडिमेड फूड्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जंक फूड खाणे हा प्रकार रोजचाच होत असून ही बदलती खाद्य संस्कृती स्वीकारून आपण नकळतपणे हृदयविकाराला आमंत्रण देत आहोत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या नागरिकांमध्ये मद्यपाश म्हणजेच अल्कोहोल अब्युज किंवा दारूची गुलामी हा आजार जडतो व या आजारातून फक्त २० टक्के नागरिक बाहेर पडतात."

 

भारतात शंभरपैकी १८ मृत्यू हृदयविकारानेच

'द लॅन्सेट'च्या वैद्यकीय अहवालानुसार भारतामध्ये होणाऱ्या दर शंभर मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे हृदयविकाराने होतात. १९९० साली हृदयविकारामुळे भारतामध्ये १३ लाख लोकांचा मृत्यू हृद्यविकार व संबंधित आजारांमुळे झालं होता २०१६ साली ही संख्या वाढून २८ लाख झाली आहे. १९९० मध्ये २ करोड ५७ लाख हृदयरोगी भारतात होते व २०१६ साली ही संख्या वाढून ५ करोड ४५ लाख इतकी झाले असून २०२० साली ही संख्या ७ करोड असेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@