राहुल, पित्रोदा, ममता... सगळे एकाच माळेचे मणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019   
Total Views |



मतदानाचा आता शेवटचा टप्पा शिल्लक राहिला आहे. त्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असला तरी प्रचाराची पातळी खालावत चालल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाट्टेल तसे आणि वाट्टेल त्या भाषेत काँग्रेसकडून आणि विरोधी नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. काहीही विशेषणे लावून त्यांची बदनामी केली जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा रविवारी पार पडला. आता १९ मे रोजी मतदानाचा अंतिम टप्पा पार पडेल आणि सर्वांना प्रतीक्षा असेल ती २३ मेची. त्याआधीच निवडणूक अंदाज व्यक्त करण्यात स्वत:स ‘पारंगत’ म्हणविणारे ‘सेफॉलॉजिस्ट’ कोणास किती जागा मिळणार, कोणाचे सरकार येणार, याचे अंदाज व्यक्त करण्यात आपला वेळ घालवत असल्याचे जनतेला दिसून येईल! त्या कथित ‘तज्ज्ञ’ मंडळींचे अंदाज किती खरे आणि किती खोटे ठरतात ते २३ मे रोजीच स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाले, तर प. बंगालमध्ये सुमारे ८० टक्के मतदान झाले. प. बंगालमधील प. मेदिनीपूरसह विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या. भाजप उमेदवार भारती घोष यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घाटाल येथे घडला. तसेच तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गाडीची या गुंडांनी मोडतोड केली, असा आरोप भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान झाले. उत्तर प्रदेशात १४ जागांसाठी, हरियाणामध्ये १० जागांसाठी, मध्य प्रदेशातील आठ जागांसाठी, बिहारमध्ये आठ जागांसाठी, दिल्लीमधील सात जागांसाठी, झारखंडमधील चार जागांसाठी, तर प. बंगालमध्ये आठ जागांसाठी मतदान झाले. २०१४ मध्ये भाजपने या ५९ जागांपैकी ४४ जागा जिंकल्या होत्या.

 

मतदानाचा आता शेवटचा टप्पा शिल्लक राहिला आहे. त्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असला तरी प्रचाराची पातळी खालावत चालल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाट्टेल तसे आणि वाट्टेल त्या भाषेत काँग्रेसकडून आणि विरोधी नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. काहीही विशेषणे लावून त्यांची बदनामी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सेना दले ही मोदी यांची खासगी मालमत्ता असल्याची टीका काही कारण नसताना केली. त्यावर नरेंद्र मोदी यांनी, राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी ‘आयएनएस विराट’ या युद्धनौकेचा वापर ‘व्यक्तिगत टॅक्सी’ म्हणून केला होता, असा आरोप करताच काँग्रेसवाल्यांच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या! ज्या राजीव गांधी यांची प्रतिमा ‘मिस्टर क्लीन’ अशी निर्माण करण्यात आली होती ते नंतर ‘भ्रष्टाचारी नं. एक’ ठरल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी करताच, दिवंगत माजी पंतप्रधानांबद्दल नरेंद्र मोदी यांनी असे बोलावयास नको होते, याचे राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना ‘स्मरण’ झाले. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यमान पंतप्रधानांना शिव्यांची लाखोली वाहताना, त्यांच्यावर वाट्टेल त्या भाषेत टीका करताना, काही विधीनिषेध पाळायचा असतो, तारतम्य ठेऊन बोलायचे असते, याचे स्मरण या महाभागांना कसे काय झाले नाही? उचलली जीभ लावली टाळ्याला, असेच त्यांचे वर्तन होते ना!

 

राजीव गांधी यांनी मौजमजा करण्यासाठी, सुट्टी घालविण्यासाठी ‘आयएनएस विराट’चा वापर केल्याचा आरोप पंतप्रधानांनी करताच हा आरोप खोडून काढण्यासाठी काही माजी वरिष्ठ नौदल अधिकारी पुढे सरसावले. राजीव गांधी अधिकृत दौर्‍यासाठीच ‘आयएनएस विराट’वर आले होते, असे ‘आयएनएस विराट’चे कप्तान असलेले व्हाईस अ‍ॅडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा, कोचीस्थित दक्षिण नौदल क्षेत्राचे त्यावेळी प्रमुख असलेले माजी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल (निवृत्त) एल. रामदास यांनी स्पष्ट केले. पण, या माजी नौदल अधिकार्‍यांचा खोटेपणा अन्य माजी नौदल अधिकार्‍यांनी उघडा पाडला आणि राजीव गांधी परिवाराने सुट्टी घालविण्यासाठी नौदलाचा वापर केला होता, यास पुष्टी दिली. तसेच विदेशी नागरिक असलेल्या सोनिया गांधी, विविध प्रकारची संवेदनशील माहिती असलेल्या ‘आयएनएस विराट’वर सर्वत्र मुक्तपणे वावरत होत्या, अशीही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. अनेक नौदल अधिकार्‍यांना नौदलाचा असा वापर करणे आवडले नव्हते. पण, तुम्ही त्याविरुद्ध काही बोलल्यास तुमच्यावर कारवाई करू, असा इशारा देऊन त्यांची तोंडे बंद करण्यात आली होती. राजीव गांधी बंगारम बेटावर सुट्टी घालविण्यासाठी कोणाकोणास घेऊन गेले होते, याबाबतची माहिती समाजमाध्यमांवरून आता लोकांपर्यंत पोहोचली आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडूनही नौदलाच्या युद्धनौकांचा वापर मौजमजा करण्यासाठी झाला असल्याची सचित्र माहिती या निमित्ताने बाहेर आली आहे. तेव्हा त्यांना विचारणारे तरी कोण होते? ही सर्व माहिती लक्षात घेता, सेना दलाचा आपली खासगी मालमत्ता असल्याचे समजून कोण वापर करीत होते, ते सांगण्याची गरज आहे काय?

 

राजीव गांधी यांचे मित्र, राहुल गांधी यांचे गुरू आणि इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी, १९८४च्या दंगलीसंदर्भात आक्षेपार्ह विधान करून संपूर्ण शीख समाजाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. दिल्लीमधील निवडणुकीच्या ऐन तोंडावर पित्रोदा यांनी ‘हुआ तो हुआ’ असे भाष्य शीखविरोधी दंगलीबद्दल केल्याने शीख समाज संतप्त झाला. ज्या दंगलीत तीन हजारांहून अधिक शीख मारले गेले, त्या घटनेबद्दल पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पित्रोदा यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असे सांगितले. पित्रोदा यांचे ते मत व्यक्तिगत असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. पण, पित्रोदा यांचे वक्तव्य काँग्रेसला नक्कीच भोवल्याशिवाय राहणार नाही. पित्रोदा यांचे वक्तव्य लक्षात घेता, त्यावरून त्या पक्षाचे चारित्र्य आणि मग्रुरी दिसून येते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. आपल्या वक्तव्याने उठलेला गदारोळ लक्षात घेऊन पित्रोदा यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे म्हणून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसला जो फटका बसायचा तो बसून गेला होता.

 

इकडे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान मोदी यांच्याशी उभा दावा मांडल्यासारखे वर्तन करीत आहेत. ‘फनी’ चक्रीवादळाचा ओडिशा, प. बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांना फटका बसला. त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ममतादीदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवर येण्याचेही टाळले. एवढेच नाही तर नरेंद्र मोदी यांना आपण पंतप्रधान म्हणून मानत नसल्याचे वक्तव्य केले. ‘जे काय बोलायचे ते आपण भावी पंतप्रधानांशी बोलू,’ असे सांगून देशाच्या पंतप्रधानांचा त्यांनी पाणउतारा केला. ममता बॅनर्जी यांची देशाच्या घटनेशी हीच का बांधिलकी? देशाच्या पंतप्रधानाबद्दल अशा भाषेत आतापर्यंत कोणीही मुख्यमंत्री बोलला नसेल. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याकडे जात असताना विरोधक प्रचाराची खालची पातळी गाठत असल्याचे, वाटेल ती विशेषणे लावून देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करीत असल्याचे दिसून येत आहे. पण, पंतप्रधानांवर वाट्टेल त्या भाषेत टीका करणार्‍या या ‘महामिलावटी’ नेत्यांनी काय काय दिवे लावले याची जाणीव असलेली जनता या मंडळींना त्यांची ‘योग्य ती’ जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@