ती आई असते म्हणूनी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2019
Total Views |

जागतिक मातृदिन मे महिन्याच्या दुसर्या रविवारी येत असतो. आता रविवार हा जगात सुट्टीचा वार आहे. नेमका याच दिवशी का बरे मातृदिन असावा? सुट्टी म्हणजे आराम आणि सुरक्षितता... आई म्हणजेही तेच. तिच्या कुशीत खूप खूप सुरक्षित वाटते. भल्या पहाटेला नदीच्या खळखळत्या प्रवाहात देह सोडून दिल्यावर नदी जशी कवेत घेते ना आपले अस्तित्व, तसे आईच्या कुशीत वाटत असते. तसा तर मातृदिन रोजच असतो, कारण या जगात आपण असायला कारणच ती असते. जन्म देते ती जन्मदात्री अन् संगोपन करते ती आई. माता. कृष्ण हा भगवानच होता, कारण त्याने त्याच्या मानवी रूपात जगण्यातून दृष्टांतच दिले आहेत. त्याने मातृवत चिंतन असलेली गीताच सांगितली. गीता हीदेखील आईच. चिंतनांची आई... म्हणून राम हा मर्यादापुरुषोत्तमच होता. म्हणजे तो पुरुषच होता; पण कृष्ण भगवान असेच म्हणतो आपण. त्याने जन्मत:च रक्ताच्या नात्यांचा तुरुंग तोडला अन् मोह, मायादी षड्रिपूंचा महापूर पार करून तो स्वच्छंद, स्वतंत्र अशा गोकुळात गेला. जन्मदात्री आणि आई यातला फरक त्याने दाखवून दिला. देवकी ही त्याची जन्मदात्री होती आणि यशोदा ही त्याची आई होती. मातृपद प्राप्त करण्यासाठी जन्मच द्यावा लागतो, असे नाही. त्यासाठी आईपणाचा निसर्गच अंगी असावा लागत असतो. यशोदा ही कृष्णाची जन्मदात्री नव्हती, मात्र तीच त्याची माता होती. तिने त्याचे अस्तित्व घडविले. ममतेचे गोकुळ त्याच्यासाठी उभे केले आणि त्याचा अवतार सार्थकी लावला. जरा जास्तच चिंतनात्मक होतंय् हे खरंच आहे; पण विषयच तसा आहे. तुम्हाला वाटत असेल रविवारी या स्तंभात नुसत्या गमतीच असतात, तसं नाही ना भाऊ...
 
 
आई ही अशी असते. ती शिकली असो वा नसो; पण ती सुशिक्षितच असते. तिच्याकडे पदवीच असली पाहिजे असे नाही. तिने परीक्षाच दिलेली असली पाहिजे, असेही नाही. आई होण्यासाठी मोठ्या दिव्यातूनच पार जावे लागत असते. म्हणून तिला वेगळी अशी परीक्षाच नसते. चुकलेल्याला मायेनं जवळ करून त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणून सोडते ते आई असते. आईच ते करू शकते. ते तसे करण्याचे तिने काही प्रशिक्षण घेतलेले नसते. रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत अन् अखेरच्या श्वासापर्यंत ती मायाच करत असते.
 
 
 
आई ही समष्टी आहे. ती व्यक्ती नाही. देह नाही. ती स्त्री-पुरुष अशा लिंगभावातही अडकलेली नाही. ती मुक्त आहे. आपली गल्लत यासाठी होते की आपण तिला देहांत शोधतो. आकारात बद्ध करण्याचा वेडेपणा करतो. आम्ही शारीरभावांत जगत असतो. म्हणूनच शरीराच्या असण्याचे, अस्तित्वात येण्याचे अन् संपण्याचेही सोहळे करतो. आईचेही श्राद्ध करतो. श्राद्ध आपण आपल्याला जन्म देणार्या देहाचे करत असतो. जन्म देणे हा देहभाव आहे. निसर्ग आहे तो देहाचा. जन्म देते ती जन्मदात्री असते. ती तिच्या आयुष्यात एखादा क्षण तरी आई होऊ शकली तर ती पावन होऊ शकते. ती जिवशास्त्रीय माता असते. तिच्या वाट्याला ज्या काय असंख्य भूमिका येतात त्यापैकी जन्मदा हीदेखील एक भूमिका. त्यात ती तुमची आईदेखील असते. तुम्हाला दरवेळी भेटते ती आईच असते असे नाही. ती कुणाची कन्या, सून, बायको, मावशी, काकू... असे काय काय असते. कधीकधी तुम्हाला तुमची आई, आई म्हणून वाट्याला येते. तीदेखील पार्थिव आई. अपार्थिव अशा माया, ममता या ज्या काय भावना आहेत त्या नसतातच. त्या पार्थिवाशी बांधल्या असतात. त्यातही ती तिच्या अनेक पिलांची आई असते. तुमच्या भावंडांपैकी तुमच्या वाट्याला ती सारखीच येईल, असेही नसते. कारण तिनेदेखील देह ओलांडलेला नसतो. मुलांना जन्म देते अन् त्यांच्यावर माया करते ती जीवशास्त्रीय माता. ज्यांना जन्म दिला त्यांना ओलांडून ती सार्या जगावर माया करू शकते का?
ती तिच्या देहाच्या असण्याशी आधी बांधील असते.
 
आपल्याला आपलीच आई होता येतं का? ते साध्य करणं फार कठीण आहे. खरेतर ईश्वर असेल तर तो आपणच असतो. आपल्यालाच आपला परमेश्वर होता येतं; पण त्यासाठी पार्थिवाच्या कक्षा ओलांडता यायला हव्या. आईला परमेश्वर यासाठीच म्हणण्यात आले आहे. ती ईश्वराशी खूप साधर्म्य राखते. जन्मदात्रीला आई म्हणून आपण तिची पूजा करत असताना आपण आपल्यातच असलेल्या आईपर्यंत पोहोचायचे असते. आईचा शोध आपण आत घेतो आणि ती खर्या अर्थाने आत असते. आपल्यातला मातृभाव आपण जागा करू शकतो. माणूस देव होऊच शकत नाही कारण देव ही कल्पना आहे. तो आई मात्र होऊ शकतो कारण ते वास्तव आहे. स्नेह, माया, ममता हे भाव कुणीही त्याच्या मनात जागे करू शकतो आणि मग तो स्वत:च स्वत:ची आई होऊ शकतो. माणूस एकदा आई झाला की तो संकुचित राहूच शकत नाही. आी आधीच स्वत:ची असू शकत नाही किंवा केवळ तिच्या जीवशास्त्रीय अपत्यांचीच ती असते असेही नाही. जो कुठला जीव आई रूपाला पोहोचला त्याची अपत्ये या जगांतील सर्वच मानव असतात.
आई हे काही स्त्री किंवा पुरुषवाचक रूप नाही. ती शरीरातच अडकलेली नाही त्यामुळे शरीराच्या व्यवहाराच्या गलबल्यात ती अडकूच शकत नाही. ज्ञानेश्वरही माऊली होतात. रामकृष्ण परमहंस हेही माऊली होतात, स्वत:ला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेणारे गुलाबराव महाराजही माऊली होतात... त्यात त्यांचे भौतिक पुरुषपण आड येत नाही.
स्त्री ही तर जन्मत:च माता असते. त्यासाठी तिला कुठल्या पुरुषाच्या संगातून अपत्य जन्म देण्याची गरज नसते. पुरुषाच्या संगातून अपत्याला जन्म दिला की ती माता होते, आई होते, ही समजच चूक आहे. ती त्यावेळी तिच्या निसर्गधर्माचे पालन करते. ती जन्मदात्री होते. जन्मदात्री ते माता हा प्रवास तिचा तिला करायचा असतो. तो सगळ्याच स्त्रियांना साध्य होतोच असे नाही. किंबहुना बहुतांश स्त्रियांना तो साध्य होत नाही. संगोपन हीदेखील निसर्गदत्त जबाबदारी आहे. स्तनदा ही जन्मदाती असते, ती आई होऊच शकते असे नाही. आई ही अवस्था प्राप्त करण्यासाठी मुळात ती व्यक्ती स्त्रीच असावी, असेही नाही. स्त्रियांना मात्र आई अवस्थेला गतीने पोहोचता येते, कारण त्यांचा निसर्गच तो आहे.
ती मूळ अस्तित्व आहे. ती शक्ती आहे. म्हणून ती आई पदाला पोहचू शकते. तिला तिचे हे मातृरूप कळले तर ती ते प्राप्त करू शकते. तिचे असे आई होणे म्हणजे तिचा पूर्ण विकास. खरेतर कुठल्याही जिवाचे आई अवस्थेला पोहोचणे म्हणजे पूर्ण विकास.
अनुसया मातेकडे त्रिदेव कामेच्छेने गेल्यावर तिने आपल्या मंत्र सामर्थ्याच्या पाण्याने त्यांची बाळे केली. तिच्याकडे तपसामर्थ्य होते, मग तिने त्यांना जाळून का टाकले नाही? कारण ती माता होती. विकारांनी पेटलेले पुरुष असले तरीही तरीही ती तिची बाळे होती. म्हणून तिने त्यांच्यातले विकार जाळून त्यांची निरागस बाळे केली. स्त्रीचा माता होण्याचा, आईपण विकसित करण्याचा क्षण असतो. तो प्रत्येकच स्त्रीच्या वाट्याला येतो का, हे सांगता येत नाही, मात्र येत असावा. केवळ स्त्रीच्याच नाही प्रत्येकच जीवाच्या वाट्याला स्वत:तले आईपण उजागर करण्याची संधी येत असावी. सानेगुरुजींनी ती साधली. एकदा रेल्वेत प्रवास करत असताना एक बाई तिच्या लहान्या लेकराला खूप मारत होती. ते लेकरू रडत होते. गुरुजींना पहावले नाही. त्यांना रडायला आले. त्यांनी ते लेकरू त्याच्या जन्मदात्री पासून हिसकावून घेतले आणि रागाने तिला म्हणाले, ‘‘माझ्या लेकराला का मारतेस?’’ आणि मग त्या मुलाला शांत केले... मातृदिन का पाळायचा? या दिवशी आपल्यातल्या मातृबिजाचा शोध घ्यायचा, त्याचे दर्शन घ्यायचे आणि आपल्यात क्षमता असेल तर करंटेपणा जाळून मातृबीज फुलवायचे.
@@AUTHORINFO_V1@@