प्रियंका शर्मा यांना अटक; बंगालमध्ये ममतांची हिटलरशाही

    11-May-2019
Total Views |



छेडछाड केलेला फोटो शेअर केल्याने प्रियंका शर्मा यांना केली अटक


कोलकत्ता : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा नेत्या प्रियंका शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्रियांका या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ता आहेत. प्रियांका यांनी ममता बॅनर्जी यांचा छेडछाड केलेला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. यावरून तृणमूल काँग्रेसचे नेते विभास हाजरा यांनी प्रियांका यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

 

मेट गाला २०१९मध्ये प्रियांका चोप्राने केलेल्या वेषभूषेमध्ये छेडछाड करून प्रियांका चोप्राच्या ऐवजी ममता बॅनर्जींचा चेहरा लावण्यात आला आहे. हा फोटो प्रियांका शर्मा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या फोटोमध्ये छेडछाड करणे हा अपराध असून ममता बॅनर्जींचा अपमान आहे. हा फक्त ममतांचा अपमान नाही तर बंगालच्या संस्कृतीचा अपमान असल्याचा आरोप, हाजरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. हाजरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रियांका शर्मा यांना अटक केली आहे.

 

प्रियांका शर्मा यांच्या अटकेच्या विरुद्ध भाजपच्या युवा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन याही आक्रमक झाल्या आहेत. प्रियांका यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांना ताबडतोब सोडून देण्याची मागणी महाजन यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, प्रियांका यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर #ISupportPriyankaSharma ही मोहीम चालवली जात असून नेटकऱ्यांनी ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat