गांधी घराण्याच्या अपप्रवृत्तीवर लत्ताप्रहार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीतील सात टप्प्यांपैकी पाच टप्पे आटोपले असून, अखेरच्या दोन टप्प्यांत मते पडायची आहेत. सुरुवातीच्या काळात संथ, शांत, संयमित असलेला प्रचार आता वैयक्तिक राग-लोभापर्यंत आणि शिवीगाळीपर्यंत खाली उतरला आहे. कॉंग्रेस आणि गठबंधनच्या नेत्यांनी तर शिवराळ भाषेचा उपयोग करून मतदानाची प्रक्रिया संघर्षावर आणली आहे. एकीकडे गठबंधन आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी वाचाळपणा चालवला असताना, भारतीय जनता पार्टी आणि तिच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांनी निरनिराळे मुद्दे उपस्थित करून, कॉंग्रेस पक्षाची कोंडी करत आणली आहे. प्रत्येक टप्प्यात मुद्दे बदलवून प्रचार केल्याने भाजपा आणि मित्रपक्षांनी कॉंग्रेस आणि गठबंधनच्या नेत्यांना भांबावून सोडले आहे. आतातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कॉंग्रेसच्या नेत्यांनी या देशाची कशी लूट चालवली याकडे देशवासीयांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन असल्याचे संबोधित करून, त्यांच्यावरील आरोपांची झाकली मूठ उघडी करून टाकली आहे.
 
प्रारंभी तर त्यांनी 1984 च्या शिखविरोधी दंग्यांवरून माजी पंतप्रधानांना लक्ष्य केले. एकीकडे आम आदमीला ‘अब मिलेंगा न्याय’ असे उच्चरवाने सांगणार्या कॉंग्रेसने, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात शिखांच्या ज्या सामूहिक कत्तली झाल्या, त्यासाठी कोण दोषी आहे, हे सांगायलाच हवे. केवळ न्यायाच्या बाता केल्याने कुणाला न्याय मिळत नाही. प्रत्यक्ष वस्तुस्थिती असे सांगते की, 1984 च्या दंगापीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही. शीखविरोधी दंगलीच्या वेळी राजीव गांधींची प्रतिक्रिया प्रचंड चीड आणणारी होती. केवळ इंदिरा गांधींचे मारेकरी शीख धर्माचे असल्याने एकट्या दिल्लीत तीन हजारांवर शिखांच्या कत्तली करण्यात आल्या आणि हे सामूहिक हत्याकांड कॉंग्रेसची सत्ता असलेल्या दिल्लीत घडले, ही सर्वात शरमेची बाब होती. त्या वेळी राजीव गांधी म्हणाले होते, ज्या वेळी वटवृक्ष कोसळतात, त्या वेळी जमिनीवर थोडेफार नुकसान होतेच. त्यांच्या या वक्तव्याबद्दल अजूनही जगभरातील शिखांच्या संघटनांनी त्यांना आणि कॉंग्रेस पक्षाला माफी दिलेली नाही. आतातर त्यांच्याच कार्यकाळातील आणखी एक मौजमस्तीचे प्रकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघड करून, कॉंग्रेसचे तोंड बंद केले आहे!
देशाच्या संरक्षणसज्जतेत ‘आयएनएस विराट’चे महत्त्व किती आहे, ते वेगळे सांगायला नको. देशावर आक्रमण झाल्यास जे जहाज शस्त्रसज्ज ठेवण्यात आलेले असे, देशावरील कुठल्याही संकटकाळात जे जहाज रात्रंदिवस समुद्रात जागता पहारा ठेवत होते, ते जहाज राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात सुट्या घालविण्याकरिता, मौज-मजा करण्याकरिता, कौटुंबिक सहलीसाठी वापरले. विशेष म्हणजे दहा दिवसांच्या या सहलीमध्ये सोनिया गांधींच्या माहेरचे, खास इटलीहून आलेले नातेवाईक सहभागी झाले होते. एखाद्या देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले विमानवाहू जहाज खाजगी कामासाठी वापरणे कितपत योग्य आहे, हे देशवासीयांनीच ठरवायला हवे. पण, असे घडले आणि त्याबद्दल फारशी वाच्यतादेखील झाली नाही. यासाठी भारताच्या नौदलाला बाध्य केले गेले आणि या कुटुंबाच्या सेवेसाठी वायुदलाचे एक हेलिकॉप्टरदेखील तैनात करण्यात आले होते. आता अशा प्रकरणात ज्या वेळी एखादे कुटुंब सर्वोपरी होत असेल तर त्यात देशाचे हित ते काय जोपासले जाणार? आजवर भारतीय युद्धनौका देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असल्याचा आपला गैरसमज होता. पण, या युद्धनौकांचा वैयक्तिक सहलींसाठीही वापर होतो, हे पंतप्रधानांच्या आरोपानंतर जगजाहीर झाले आहे. राज्यकर्त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जेव्हा देशाची यंत्रणा वेठीस धरली जाते, त्या वेळी देशाचा विकास न होता, सरकारी मालमत्तेची उधळण करणारी वृत्ती वाढीस लागते. याबाबत आर्य चाणक्याचे एक उदाहरण चांगलेच प्रसिद्ध आहे. चाणक्याच्या घरी दोन दिवे होते. एक राज्यकर्त्याने दिलेला आणि एक वैयक्तिक. सरकारचे काम करताना ते सरकारने उपलब्ध करून दिलेला दिवा वापरत आणि ज्या वेळी वैयक्तिक काम असे त्या वेळी घरच्या दिव्यातील तेल जाळून ते दिवा उजळत असत. राज्यकर्त्याने सरकारी संपत्तीचा वापर कसा करावा, याचे उत्तम उदाहरण चाणक्याने या देशापुढे प्रस्तुत केलेले आहे. पण, चाणक्याचे सल्ले कोण ऐकेल?
आपला तर या देशाची सरकारी संपत्तीची लूट करण्यासाठीच जन्म झाल्याची राज्यकर्त्यांची विशेषतः गांधी कुटुंबाची धारणा होऊन बसली आहे, त्याला काही उपाय नाही. राजीव गांधींच्या सरकारी संपत्तीच्या दुरुपयोगाबद्दल देशभरात चर्चा सुरू झाली असतानाच, असाच एक, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळातील प्रकार उघडकीस आला आहे. मुले नेहमी पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकतात, असे म्हटले जाते. त्याचीच प्रचीती या नव्या उदाहरणावरून आली आहे. त्यामुळे आयएनएस विराटवर सागरी सहलीचा आनंद घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आजोबा जवाहरलाल नेहरू यांच्याच पावलावर पाऊल टाकले आहे. जून 1950 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी नौसेनेच्या एका लढाऊ जहाजावर इंदिरा गांधी आणि लहानग्या राजीव आणि संजय गांधीसह सुट्या घालवल्याची बाब पुढे आली आहे. अशा या कार्यकलापामुळे प्रत्येक वेळी गांधी घराण्याला सावधपणे पावले टाकावी लागतात. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आयएनएस विराटचाच मुद्दा गाजल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
 
गांधी घराण्याचे कार्यकलाप दुर्लक्ष करण्यासारखे मुळीच नाहीत. आताही कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा पाहिला, तर हा पक्ष राष्ट्रद्रोह्यांच्या पाठीशी कसा उभा आहे, हे सहज कळून येते. ‘आफ्स्पा’ कायदा हटविण्याची भाषा, देशद्रोहाचे कलम संविधानातून नाहीसे करण्याचे आश्वासन काय दर्शविते? साध्वी प्रज्ञाचाच मुद्दा विचारात घेतला, तर तिच्या नावाने हिंदू धर्माची दहशतवादाशी सांगड घालण्याचे कट-कारस्थान कॉंग्रेसने कसे आखले, हे ध्यानात आल्याशिवाय राहात नाही. एकापाठोपाठ एक मुद्दे जे कॉंग्रेसने पुढे केले आहेत, ते देशविरोधकांच्या पथ्यावरच पडत आहेत. नक्षलवाद्यांना कॉंग्रेसबद्दल आणि कॉंग्रेसला नक्षल्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीमागे उभयतांमधील आत्मीयताच बाहेर आल्याशिवाय राहात नाही. गांधी परिवारातील सदस्यांचे व्यवहार नेहमीच संशयास्पद राहिले आहेत.
 
 
 
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असून, या प्रकरणात माय-लेक दोघेही जामिनावर आहेत. बोफोर्स घोटाळ्याचे आरोप या कुटुंबावर आहेत. विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा आहेच. शिवाय जावई रॉबर्ट वढेरा यांचे जमीन खरेदी व्यवहारही संशयाच्या जाळ्यात आहेत. विविध आरोपांचे मोहोळ पक्षाभोवती आणि गांधी घराण्याभोवती जमा झाल्याने, या पक्षाने आता मोदींची वैयक्तिक निंदा-नालस्ती चालविली आहे. मोदींना कुत्रा, बिच्छू, राक्षस, औरंगजेब, कायर, भगौडा अशा अनेक शिव्यांची लाखोली वाहून कॉंग्रेसजन त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचा मोदींना बदनाम करण्याचा आटापिटा चालला आहे. प्रत्येकाला मानाची खुर्ची हवी आहे, तिच्यावर त्यांचा डोळाही आहे, पण त्यावर बसण्याची पात्रता अंगी बाणवण्यास कुणी तयार नाही. असो. आयएनएस विराटच्या निमित्ताने गांधी घराण्याच्या अपप्रवृत्तीवर आणखी एक लत्ताप्रहार बसला आहे. तो त्यांना कितपत सत्तेपासून दूर ठेवतो, हे बघणेच तेवढे बाकी आहे...
@@AUTHORINFO_V1@@