वाखाणण्याजोगा उत्साह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019   
Total Views |



नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात दि. २९ एप्रिल रोजी १७व्या लोकसभेसाठी मतदान पार पडले. दि. २६ पासून नाशिक शहरात असणारी उष्णतेची तीव्रता लक्षात घेता दि. २९ एप्रिलला नेमके काय चित्र राहील, पुण्यासारख्या शहरात घसरलेली मतदानाची टक्केवारीची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होईल का, असे नानाविध प्रश्न नाशिककरांना दि. २९ एप्रिलच्या सकाळपर्यंत सतावत होते. मात्र, सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सलग दिसणारा नाशिकमधील मतदारांचा उत्साह हा निश्चितच वाखाणण्याजोगा होता. प्रारंभी उन्हाच्या आत मतदार कर्तव्य बजावतील आणि नंतर गर्दी मोठ्या प्रमाणात रोडावेल, अशी शक्यता दिसत असतानाही दुपारनंतर गर्दी रोडावण्याचे प्रमाण त्या मानाने कमी दिसून आले. तसेच, प्रबोधन मंच, विविध औद्योगिक संघटना, सामाजिक संस्था, ‘वोटकर नाशिककर’ हे प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले अभियान अशा सर्व प्रयत्नांची एकत्रित फलश्रुती म्हणून नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात मतदानाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलांडली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील हा उत्साह दिसून आला, हे विशेष. सध्या नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग दुष्काळाच्या समस्येचा मोठा सामना करत आहे. पाण्यासारखी जीवनावश्यक बाबीची मोठी समस्या असतानाही मतदार राजाने आपले कर्तव्य बजावण्यास दिलेली पसंती ही निश्चितच स्पृहणीय आहे. दिंडोरीसारख्या वनवासीबहुल भागात झालेले ६४ टक्के मतदान, तर शहरातील सुशिक्षित मतदारांसाठी एक वस्तुपाठच आहे. वनवासीबहुल भागात प्रत्येक वाड्यापाड्यांवर मतदान केंद्र अस्तित्वात नसते. मतदानासाठी या भागातील वनवासी बांधवांना काही मैल अंतर कापावे लागते. त्यातच वाहतुकीच्या साधनांची संख्यादेखील तोकडी असते. अशा सर्व स्थितीतदेखील हे बांधव आपले कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले, हे कौतुकास्पद आहे. नाशिक जिल्ह्यातील मतदान पाहता यंदाच्या निवडणुकीत मतदारराजाला जागे करण्यात प्रयत्नशील असणाऱ्या संस्थांना यश आले, असे म्हणण्यास निश्चितच हरकत नाही. त्यातच नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही भावी पिढी लोकशाही आणि लोकशाहीच्या मूल्यांबाबत जागृत बसल्याचे द्योतक आहे, असे वाटते.

 

गरज सजगतेची...

 

कत्याच पार पडलेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेत प्रशासनाने अधिक सजगतेने कार्य करण्याची गरज असल्याचे नाशिक व दिंडोरी मतदार संघात दिसून आले. दि. २९ एप्रिल रोजी या दोन्ही मतदार संघांत पार पडलेल्या मतदानात अनेक मतदार इच्छुक असूनही त्यांना मतदान करता आले नाही. केवळ मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना निराशेस सामोरे जावे लागले. नाशिक शहरात तर याची प्रचिती बहुसंख्य मतदान केंद्रांवर दिसून आली. येथील मतदार याद्यांत अनेकांची नावेच नसल्याची अनेक उदाहरणे समोर आली, तर ज्या भागात मतदाराचे निवासस्थान आहे, तो भाग सोडून जेथे त्याचा काहीही संबंध नाही अशा भागात त्याचे मतदार यादीत नाव असल्याचेदेखील पाहायला मिळाले. काही मतदार जीवित असूनही त्यांची नोंद मयत म्हणून असल्याचे प्रकारदेखील समोर आले. काहींची तर नावेच बदलून त्यांचे प्रशासनाने नव्याने बारसे केल्याचेदेखील आढळले. मुळात मतदानापूर्वी प्रशासनाच्या माध्यमातून अनेकदा मतदार यादी फेररचना करण्यात आली होती. तरीही असे घोळ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाच्या या घोळामुळे अनेकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले; अन्यथा नाशिक व दिंडोरी मतदार संघातील मतदानाच्या संख्येत वृद्धी होण्यास नक्कीच चालना मिळाली असती. नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराताई भुजबळ यांनादेखील आपले नावच यादीत नसल्याने मतदान करता आले नसल्याची घटना घडली. तसेच, यादी तपासणी आणि चिठ्ठी वाटपासाठी नेमण्यात आलेल्या बीएलओची अवस्था तर पाहवत नव्हती. त्यांना उन्हापासून रक्षण करण्याकरिता ना मंडप होता ना बसण्याची सोय. सावली शोधत रस्त्यावरच आपले बस्तान मांडलेले अनेक बीएलओ यावेळी नजरेस पडले. भरपूर ताण असलेले निवडणूक कार्य पार पडताना प्रशासनानेदेखील थोडे सजग राहत आपले काम कसे बिनचूक होईल, याची सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मुळात मतदार यादीत समविष्ट नावांशी आवश्यकता नसताना छेडछाड न करता केवळ नवीन नावे बिनचूक समविष्ट केली तर या घोळापासून निशितच मुक्तता मिळण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@