'अमृताचा अथांग सागर’ ग्रंथाचे रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजींच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019
Total Views |


पुणे : "टेंबेस्वामीच्या जीवन व वाङ्मयाचे दर्शन घडवणारा ’अमृताचा अथांग सागर’ हा ग्रंथ जे वाचतील, समजून घेतील आणि आचरणात आणतील, त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे ’शुभंकर दीप’ ठरेल," असे उद्गार सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी 'अमृताचा अथांग सागर’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी काढले. सा. ‘विवेक’ (हिंदुस्थान प्रकाशन संस्था) आणि ’श्री वासुदेव निवास’ यांच्यावतीने साकारण्यात आलेल्या, प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या जीवन व वाङ्मयाचे दर्शन घडवणार्‍या ’अमृताचा अथांग सागर’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ सोमवार, दि. ८ एप्रिल रोजी मनोहर मंगल कार्यालय, पुणे येथे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते पार पडला. या वेळी 'श्री वासुदेव निवास’चे प्रधान विश्वस्त शरदराव जोशी, प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी, ‘हिंदुस्थान प्रकाशन’ संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, सा. ‘विवेक’च्या कार्यकारी संपादिका अश्विनी मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व विवेक सिन्नरकर यांनी म्हटलेल्याघोराष्टक स्तोत्रा’ने झाली. प्रास्ताविकात सा.‘विवेक’च्या कार्यकारी संपादिका अश्विनी मयेकर यांनी ‘विवेक’च्या गेल्या ७० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ’अमृताचा अथांग सागरया ग्रंथाच्या निर्मितीत समन्वयक म्हणून काम पाहिलेल्या उल्का मोकासदार यांनी हा ग्रंथ कसा आकाराला आला त्याची माहिती दिली. त्यानंतर सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले.

 

'श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त शरदराव जोशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, "टेंबेस्वामींची स्तोत्र तरुण पिढीला भयग्रस्ततेतून मुक्त करणारी आहेत. आपण देवाच्या पाठी लागतो. परंतु, देव ज्यांच्या पाठी लागला असे टेंबेस्वामी हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. वाङ्मयीन रूपाने ते आजही आपल्यात आहेत.” प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त करताना आपल्या उद्योजकीय वाटचालीत स्वामींच्या वाङ्मयातून सकारात्मक ऊर्जा कशी मिळत राहिली याबद्दल विवेचन केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भारतीय अध्यात्माबद्दल मौलिक विचार आपल्या मनोगतात मांडले. “समाजात आध्यात्मिक तेजोवलय निर्माण करण्याचा संकल्प घेतलेल्या अध्यात्म पुरुषांपैकी टेंबेस्वामी हे एक होते. या सर्व महापुरुषांनी माणसांना त्यांच्यातल्या अनित्याची जाणीव करून दिली. अशा थोर व्यक्तींचे आशीर्वाद नेहमीच आपल्या भारतीयांच्या पाठीशी राहतील,” असे उद्गार भैय्याजींनी यावेळी काढले.

 

या प्रकाशन समारंभाला टेंबेस्वामींच्या भक्तगणांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उल्का मोकासदार, कमलेश पांचाळ, विलास आराध्ये, वासुदेव कुंटे, श्रीधर सहस्त्रबुद्धे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ’मिशन शक्ती’मध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेले शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा नातू यांनी केले. केतकी देशपांडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@