जलसंकटाची नांदी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019   
Total Views |



ऐन उन्हाळ्यात सध्या मुंबईसह आसपासच्या परिसरातही पाणीकपात सुरु झाली आहे
. त्यानिमित्ताने जलस्रोत, जलसंचय आणि जलसंकटाची जागतिक परिस्थिती यांचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...

 

जगातील पाण्याच्या सर्व उगमस्रोतांचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच सर्वांनी त्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. सद्यस्थितीत जगभरात अब्जावधी लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी नशिबी नाही. त्यांच्या घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, कामाच्या ठिकाणी, शेतावर वा कारखान्यात काम करण्याच्या ठिकाणी पेयजलाची दुर्मीळता जाणवते. असा पेयजलाने वंचित राहिलेला समुदाय म्हणजे स्त्रिया, मुले, निर्वासित, देशवासी स्थानिक लोक, अपंग असलेली दुबळी जनता. यांना पेयजल उपलब्ध होत नाही. कारण, पाण्याकरिता भेदभाव केला जात आहे. ते नेहमी शुद्ध पाणी मिळण्यासाठीच्या प्रयत्नात असतात. परंतु, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही.

सुरक्षित जल म्हणजे काय?

सुरक्षित जल म्हणजे सुरक्षितपणे मिळालेली पेयजलाची सेवा. ते घरात मिळायला हवेच, त्याचप्रमाणे जेव्हा हवे तेव्हा व हव्या त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला हवे आणि ते जल दूषित असता कामा नये. पण, प्रत्यक्षात असे होताना आजही दिसत नाही. त्यामुळे पुढे-मागे भारतातही जलदुर्भिक्ष्यामुळे आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नीति आयोगाच्या अहवालाप्रमाणे, देशातील सुमारे १ अब्ज वा १०० कोटी लोक हे सध्या जलसंकटात आहेत व त्यापैकी ६० कोटी, तर जलदुर्मीळ अवस्थेत राहत आहेत. एकूण १२२ देशांच्या जलदर्जाच्या निरीक्षणाबाबतच्या सर्वेक्षणात भारत देश १२०व्या क्रमांकावर आहे. ‘वॉटर एड’ या सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार, सध्या जगभरात ४०० कोटी लोकांना जलसंकटात जीवन कंठावे लागते. हा ४०० कोटींचा जलसंकटग्रस्तांचा आकडा २०५० पर्यंत ५०० कोटींपर्यंत पोहोचू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘वॉटर एड’च्या अहवालात श्रीमंत देशांना ताकीद दिली आहे की, त्यांनी खाण्याचे पदार्थ, पिके व कपडालत्ता आयात करून गरीब देशांवर पाण्याचे संकट ओढवू नये. कारण, ही उत्पादने पाण्याच्या साहाय्याने घेतली जातात. त्या गरीब देशातील व जलसंकटांनी व्याप्त असलेल्या जनसमुदायाला पाण्यापासून वंचित राहावे लागते. कारण, वरील वस्तूंच्या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर जलसंपत्ती खर्च होते. ही जलसंकटे पाण्याच्या जास्त मागणीमुळे आणखीनच मोठ्या प्रमाणात निर्माण होतात व त्यात भर म्हणून लोकसंख्येची वाढ व हवामानात असंख्य बदल झाले की त्या कटू जलसंकटात भर पडू लागते. या अहवालात असेही म्हटले आहे की, २०५० मध्ये जगातील अर्धी लोकसंख्या ही जलसंकटाचा सामना करत असेल. परंतु, उलट २० टक्के लोकसंख्येला पुराच्या तडाख्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याकरिता या पुरांच्या संकटाशी सामना करण्यासाठी हरित व करड्या पायाभूत सेवा मिळवून देण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे. कारण, त्यातून हवामान बदलावर प्रक्रिया होऊन ते नित्यक्रमाचे बनून पुराचे वातावरण लोपेल.

 

या अहवालात असा अंदाल वर्तविला आहे की, २०४० मध्ये ३३ देशांतील जनतेला मोठ्या जलदुर्मीळतेला तोंड द्यावे लागेल. त्यातील मध्य-पूर्व प्रदेशातील १५ देश असतील. शिवाय उत्तर आफ्रिकेतील देश व पाकिस्तान, तुर्की, अफगाणिस्तान आणि स्पेन. शिवाय भारत, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे भूजलाचा साठा असलेले देश असले तरी, या देशातही मोठ्या जलसंकटांना सुरुवात होईल. भारतात भूजलाचा मोठा साठा असला तरी, त्यात नैसर्गिकरीत्या भर पडण्याच्या व्याप्तीपेक्षा, त्यातून पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया जास्त वेगाने होत असल्याने भूजलसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. सन २००० ते २०१० या काळात भूजलाचा साठा वाढण्याची नैसर्गिक क्रिया २२ टक्के होती, तर त्याच काळात मानवाकडून भूजल बाहेर खेचण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील २३ टक्के पाणी कमी झाले. अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात भूजलाचा साठा जागतिक भूजलाच्या साठ्याच्या २४ टक्के आहे व तो चीन व अमेरिका या दोन्ही देशांच्या एकत्रित जलसाठ्यांच्या म्हणजे १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 

जलसिंचनाकरिता भूजलसाठ्याचा वापर

वरील अहवालात असा उल्लेख आहे की, भारतात गहू व तांदळाची पिके ही महत्त्वाची असून या पिकांना सिंचनाकरिता भरपूर पाणी लागते. १ किलोग्रॅम तांदूळ व १ किलोग्रॅम गव्हाच्या पिकांना अनुक्रमे सरासरी २,८०० लिटर व १,६५४ लिटर पाणी लागते. उसाच्या सिंचनाकरिता भरपूर पाणी लागते. म्हणून जलसंकटसदृश परिस्थिती ओढवू नये, हे या पिकांकरिता एक आव्हान ठरते. कारण, जलटंचाईकडे बघितले की, ही या पिकांना पाणी पुरविण्याची सवय भारतीयांना आता बदलली पाहिजे व कमी पाणी लागणारी पिके शोधली पाहिजेत. हिशोबाकरिता आपण तांदळाच्या पिकाचा विचार करू. म्हणजे बघा, एका कुटुंबातील चार माणसे महिन्याला ३० किलो तांदूळ वापरण्याकरिता भासमानानी (virtually) ८४ हजार, ६०० लिटर पाणी सिंचनामधून खर्च करतात. २०१४-१५ या काळात भारताने ३७.२ लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला व त्याकरिता त्यांनी १० हजार कोटी लिटर (१० ट्रिलिअन लिटर) पाणी बासमती तांदळाच्या सिंचनाकरिता वापरले असावे. याचा अर्थ भासमानात भारताने १० हजार कोटी लिटर पाणी निर्यात केले असे म्हणता येईलवॉटर एड’चे भारतातील मुख्य अधिकारी व्ही.के. माधवन यांचे म्हणणे आहे की, या तांदळाच्या उत्पादनाऐवजी दुसरे कमी पाणी लागणारे व तितकेच खाण्याकरिता गुणकारी असलेले पीक मका, मिलेट, ज्वारी (sorghum) या तीन पिकांना गहू-तांदळापेक्षा एक तृतीयांश पाणी पुरते. म्हणून या निकषावरुन आपल्या खाण्याच्या सवयी बदलणे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे पाण्याच्या अवास्तव वापराची हीच स्थिती कायम राहिल्यास २०३० मध्ये जगातील ७० कोटी लोकांना अशा जलवंचित अवस्थेला तोंड द्यावे लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

पाण्याचे उगमस्रोत

एक मुख्य उगम म्हणजे पृष्ठभागावरचे पाणी - जे आपल्याला नदी, खाडी, तलाव, पाणथळी वा समुद्रातून मिळते. ही सगळी उगमस्थाने हल्ली प्रदूषित झाली आहेत. त्याला कारण औद्योगिक कारखाने व मानव प्राणी. दुसरा उगमस्रोत म्हणजे भूजल. भूजलातील पाण्यात खनिज व धातूंची द्रव्ये असल्याने ते पाणी शुद्ध असणे कठीण होते. आपल्या देशात बरेचसे पाणी भूजलातून पुरविले जाते. ते वापरण्याच्या आधी तपासून शुद्ध करणे जरुरी आहे. भूजलातील पाणी शेतीकरिता मानवाकडून पंपाने खेचले जात आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आणखीनच वाढत आहे. तिसरा उगमस्रोत म्हणजे पावसाचे पाणी. हे पाणी प्रथमच्या व दुसर्या उगमात जाऊन शेवटी ते समुद्रात पोहोचते. पावसाचे पाणी अडवून वा साठवून त्याचे संप्लवन (Harvesting) करणे जरुरी आहे. हल्ली आणखी एक उगम तयार होत आहे तो म्हणजे हवेतील पाणी. त्याकरिता तज्ज्ञांची मदत घेणे जरुरी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जलसंपदेतील ७८ टक्के पाणी शेतीकरिता आहे ते २०५० मध्ये ६८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. विश्वातील एकूण पाणी दशलक्ष घनकिमी त्यापैकी समुद्रात ९६.५ टक्के, खाडी वा इतर खारे पाणी ०.९ टक्के, ताजे पाणी २.५ टक्के, त्यात बर्फाच्छादित ६८.७ टक्के, ३०.१ टक्के भूजल व १.२ टक्के पृष्ठभागावर. भारताची लोकसंख्या जगाच्या १८ टक्के आहे, तर पाणीसाठा जगातील पाण्याच्या केवळ ४ टक्के इतकाच आहे. भारतात ताज्या पाण्याची एकूण व्याप्ती ४ हजार घ.मी.भारतीय लोक ८० टक्के भूजलसाठ्यातील पाण्यावर अवलंबून आहेत. त्यातील बाष्पीभवनात नष्ट होते १०४७ अब्ज घ. मी पाणी मिळू शकत नाही १०८४ अब्ज घ. मी पाणी मिळण्यासारखे १८६९ अब्ज घ. मी; त्यापैकी वापरण्यासारखे ११२३ अब्ज घ. मी भारतातील पाणी शेतीकरिता ८३ टक्के, उद्योगधंद्यांकरिता १२ टक्के व घरगुती कामाला ५ टक्के. भारतातील पाण्याची (घनमीटर) प्रतिव्यक्ती उपलब्धी वर्षावर्षानी कमी होत आहे - २०२५ व २०५० चे आकडे तज्ज्ञांनी अंदाजे वर्तविले आहेत. १९४७ (६०४२), २००१ (१८१६), २०११ (१५४५), २०२५ (१३४०), २०५० (११४०) जेव्हा पाणी व्यक्तीमागे १७०० घ.मी.ला पोहोचते, तेव्हा जलसंकट सुरू होते व १००० घ.मी.ला पोहोचते तेव्हा पाण्याची दुर्मीळता सुरू होते. म्हणूनच आपण पाणी जपून वापरले पाहिजे. पाणी आंघोळीसाठी, शौचालयाकरिता, कपडे-भांड्यांकरिता वा स्वयंपाकघरात काटकसरीने वापरावे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@