नवविचारांच्या नांदीचा सूर्योदय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2019   
Total Views |



आजवरच्या नेपाळच्या इतिहासात एव्हरेस्टवर चढाई केलेल्या चार हजार शेर्पांच्या वारसांत अद्याप कोणत्याही विधवा महिलेने एव्हरेस्ट सर करण्याचा किंवा वाटाड्या म्हणून आपले कार्य पार पाडण्याचा साधा प्रयत्नदेखील केलेला नाही.

 

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, अशी म्हण आपल्या मातृभाषेत प्रचलित आहे. त्यामुळे समाजजीवनात वावरताना अनेक श्रद्धा आणि बहुसंख्य अंधश्रद्धा मानवी जीवनात नित्यनियमाने डोकावत असतात. अशीच एक समजूत किंबहुना अंधश्रद्धा ही नेपाळमध्ये पाहावयास मिळत असे. नेपाळ हा देश तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर यांचे असणारे तेथील स्थान यामुळे विश्वविख्यात आहेच. तसेच, येथील एव्हरेस्ट चढाई व त्याअनुषंगाने येथे होत असलेले पर्यटन हा नेपाळचा आणि शेरपा समाजाचा आर्थिक कणादेखील आहे. मात्र, शेर्पा महिलांनी आपल्या पतीनिधनानंतर त्यांचा व्यवसाय म्हणजेच एव्हरेस्ट चढाई करणे म्हणजे ‘महापातक’ मानले जात असे. आजवरच्या नेपाळच्या इतिहासात एव्हरेस्टवर चढाई केलेल्या चार हजार शेर्पांच्या वारसांत अद्याप कोणत्याही विधवा महिलेने एव्हरेस्ट सर करण्याचा किंवा वाटाड्या म्हणून आपले कार्य पार पाडण्याचा साधा प्रयत्नदेखील केलेला नाही आणि विशेष म्हणजे, शेर्पा समाजातील काही लोकदेखील या समजुतीचा पक्ष घेत होते. त्यामुळे जगातील सर्वात उंच ठिकाणी गिर्यारोहकांना, पर्यटकांना पोहोचविण्याचे कार्य करणारे शेर्पा या गैरसमजुतीच्या विचारांची उंची कमी न करता त्याची खोलीच अधिक वाढवित होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

 

मात्र, आता असले तरी नेपाळमधील ४३ वर्षीय फुर्वा दिकी शेर्पा व ३४ वर्षीय निमा डोमा शेर्पा या दोन महिला यंदा जगातील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्टची मोहीम फत्ते करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नेपाळमधील या कुप्रथेला आता कोठे तिलांजली मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पतिनिधनाचे दु:ख गिळून एव्हरेस्टच्या दिशेने पाऊल टाकणार्या या दोन महिलांचा निर्णय हा निश्चितच नवविचारांची उत्तुंग गुढी उभारणारा ठरेल, अशी आस या निमित्ताने बाळगावयास हरकत नाही. अशा प्रकारची घटना नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याचेदेखील वृत्त या निमित्ताने समोर येत आहे. आमच्या नसानसांत हिमालयाचे वास्तव्य शेकडो वर्षांपासून असून हिमालयाचा कणखरपणा आणि उत्तुंगता ही आमच्या मानसिक आणि वैचारिक जडणघडणीचा भाग असल्याची प्रतिक्रिया या दोन महिलांनी आपल्या या कृतीतून दिली आहे, असे वाटते. तसे, पाहिले तर शेर्पा समाज हा शेकडो वर्षांपासून हिमालयाच्या अंगाखांद्यांवर वाढलेला. त्यामुळे या समाजातील पुरुष जितके हिमालयाची जाण ठेऊन असतात, तेवढीच जाण या समाजातील महिलांनादेखील आहेच. या समाजातील महिलांचे पती जेव्हा एव्हरेस्टच्या मोहिमेवर जातात, तेव्हा या समाजातील महिला त्यांची मोहीम निर्विघ्न पार पडावी, यासाठी घरत दिवा तेवत ठेवत असतात. मात्र, पतीचे निधन झाल्यावर आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या महिलांनी उचललेले हे पाऊल नक्कीच तेथील समाजाला प्रकाशमान करणारे ठरेल, अशी आशा करावयास हरकत नाही.

 

मुळात व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर समजते की, शेर्पा समाजाचे जीवनमान हे एव्हरेस्टवरच अवलंबून आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष निर्वतल्यानंतर त्याच्या पश्चात कुटुंबाचा सांभाळ या महिला कोणत्या आधारावर करतील, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या दोन्ही महिलांनी हा निर्णय घेतला आहे. काही माध्यमांना आपल्या या निर्णयाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, “काठमांडूच्या बुद्ध स्तूपात आमची भेट झाली. यादरम्यान आपण ट्रेकिंग गाईड होऊ शकतो, असा विचार मनात आला व त्यानंतर या क्षेत्रात करिअर करण्याचा आम्ही निर्णय घेतला.” यासाठी इंग्रजी भाषेचे शिक्षण देखील घेतल्याचे या दोघी आवर्जून सांगतात. त्यानुसार या दोघींनी नोव्हेंबर २०१८ मध्ये ६ हजार मी. उंच आइसलँड शिखर सर केले. आता एव्हरेस्ट हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. आजवर नेपाळच्या इतिहासात चार हजार शेर्पांनी एव्हरेस्ट सर केले आहे. यात शेर्पा महिला फक्त ३४ आहेत. यात विधवा महिला एकही नाही. मात्र, या दोघींच्या या निर्णयाने नेपाळमधील ही कुप्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे दिसते. त्यामुळे नेपाळमध्ये नवविचारांच्या नांदीचा सूर्योदय होण्याची शक्यता आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@