प्लम्बिंगमधील परिपूर्ण प्रवाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |



फारसा प्रतिष्ठित नसणारा आणि कमी महत्त्व दिला जाणारा, परंतु, अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे ‘प्लम्बिंग. मात्र, आपल्या कार्याने सामाजिक बांधिलकीने तसेच विविध परिषदांच्या आयोजनातून या व्यवसायाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणारेप्लम्बिंग कन्सलटंट मिलिंद शेटे यांची ही यशोगाथा.


निरोगी जीवनाचा मूलमंत्र म्हणून ‘प्लम्बिंग व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांनी नवीन दृष्टिकोन दिला. ‘आयपीए’ची यशस्वी धुरा सांभाळून कौटुंबिक विचार व शिस्त यांच्यासह अथक परिश्रमाच्या जोरावरप्लम्बिंग व्यवसायातील नवविचारांची गुढी उभारणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ही कहाणी... आपल्या जीवनात आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि तितकाच सामाजिकदृष्ट्या अदखल असा व्यवसाय म्हणजे ‘प्लम्बिंग. मात्र, या व्यवसायाला आपल्या कार्यकर्तृत्वाने जागतिकस्तरावर सन्मान प्राप्त करून देण्याचे काम नाशिक येथील ‘इंडियन ‘प्लम्बिंग असोसिएशन’ अर्थात, ‘आयपीए’चे अध्यक्ष मिलिंद शेटे करत आहेत. मिलिंद शेटे यांचा जन्म एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी ‘इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक’ या विषयात धुळे येथील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. दरम्यान, त्यांच्या वडिलांना असणाऱ्या विविध आरोग्य समस्यांमुळे त्यांनी प्लम्बिंग क्षेत्रात प्रवेश केला. कुटुंबाचा तंत्राधिष्ठित विचार, तंत्रशुद्ध काम शिकणे यांचा प्रभाव हा त्यांच्या मनावर होताच. यातच त्यांनी पुणे येथून एम. आय. टी. महाविद्यालयातून ‘पीजी डिप्लोमा इन पायपिंग इंजिनिअरिंग’चे शिक्षणदेखील पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे एका प्रख्यात पायपिंग इंजिनिअरिंग फर्ममध्ये अर्धवेळ कामदेखील केले.

 

हे सर्व वडिलांचा नाशिकमधील व्यवसाय सांभाळून त्यांनी केले. शिक्षण व व्यवसाय सांभाळत असताना त्यांना खूपच तारेवरची कसरत करावी लागली. परंतु, आई-वडिलांच्या संस्कारांमुळे हे अशक्य कार्य शक्य होऊ शकलेसन 1995 मध्ये स्वत:चा ‘मिलिंद सर्व्हिसेस’ या नावाने औद्योगिक व गृहप्रकल्पांचे आरोग्य अबाधित राखणारा प्लम्बिंग व्यवसाय त्यांनी सुरू केला. मागील 24 वर्षांत त्यांनी हाती घेतलेल्या असंख्य प्रतिष्ठित प्रकल्पांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यात मुख्यत्वे निवासी व औद्योगिक प्रकल्पांसोबतच, स्टार हॉटेल्स, रिसॉर्ट्स, मॉल्स, हॉस्पिटल्स, वायनरी, शैक्षणिक संस्था, विमानतळे, स्टेडियम आदींचा समावेश आहे. नाशिकमधील सुला, योर्क, सोमा आदी वायनरींचे प्लम्बिंग, सिटी सेंटर मॉल, नाशिक रोड येथील बिग बझार, बीयॉन्ड रिसॉर्ट, नाशिकमधील हाय-फाय, ग्रांट रिओ हे स्टार हॉटेल, राजस्थानमधील अनुराग रिसॉर्ट, नाशिक विमानतळ आदी ठिकाणी मिलिंद शेटे यांच्या माध्यमातून प्लम्बिंग आकारास आले आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे नव्वदच्या दशकात ‘प्लम्बिंग’ या विषयावर भारतात कोणतेही शिक्षण उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या काळी मधल्या फळीतील कामगार जसे की, प्लम्बिंग इंजिनिअर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ उपलब्ध नव्हते. त्यामुळे कंपनी संचालकांबरोबरच या सर्व भूमिका पार पडून उपलब्ध कामगारांकडून उत्तम दर्जाचे काम करून घेणे हे आव्हान असल्याचे मिलिंद शेटे आपला कार्यप्रवास उलगडून सांगताना आवर्जून नमूद करतात. परंतु, तंत्रशुद्ध, दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करणे आदी गुण उपजतच प्राप्त झाले असल्याने हे कामदेखील मिलिंद शेटे लीलया करू शकले. प्लम्बिंग क्षेत्रात आपले योगदान देण्यासाठी आणि हाती घेतलेले कार्य अचूक व नीटनेटके पूर्णत्वास जावे, याकरिता आजही ते सकाळी 6 ते रात्री 8 असे 14 तास काम करतात.

 

यशाचा मूलमंत्र

 

आपल्या ‘पॅशन’लाच आपले काम बनवावे. त्यामुळे यशस्वी आणि समाधानी असे जीवन जगता येते. जे काही कार्य कराल, ते सर्वोत्तम करावे. ध्येय मोठे असावे व त्याचा पाठलाग करायची तयारी असावी. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वप्न पाहावे व ते साकार करावे. अडचणी या कायम संधी असतात, असे मानून त्यावर मात करत पुढे जाणे आवश्यक असते. 

 

जो व्यवसाय मानसिक समाधान देईल आणि ज्याची आवड आहे, अशा व्यवसायाची सेवा करण्याची आवड शेटे यांना मुळातच होती. ‘अदखलपात्र’ म्हणून गणला गेलेल्या प्लम्बिंग व्यवसायाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा, त्यासाठी मानांकनेही आंतरराष्ट्रीयस्तरावर मिळावीत, अशी सुप्त इच्छा शेटे यांच्या मनी असल्याने ती शोधत असताना 2003-04 दरम्यान ते ‘आयपीए’च्या संपर्कात आले. 2012 मध्ये ‘आयपीए नाशिक चाप्टर’ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासूनसंस्थापक अध्यक्ष म्हणून मिलिंद शेटे प्रत्येक तीन वर्षांनी एकमताने या पदावर विराजमान होत आले आहेत. ‘आयपीए’च्या माध्यमातून मिलिंद शेटे यांनी 10 व 11 सप्टेंबर, 2015 मध्ये 20वी ‘राष्ट्रीय प्लम्बिंग परिषद’ नाशिकला आयोजित केली होती. या परिषदेमध्ये देशभरातून 700 तज्ज्ञांनी विचारमंथन करत प्लम्बिंग क्षेत्राला एक दिशा दिली. यात सुमारे 21 वक्त्यांनी आपले विचार मांडत उपस्थितांना मार्गदशन केले. नाशिकच्या माध्यमातून भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीयस्तरावरील ‘कम्युनिटी प्लम्बिंग चॅलेंज’ या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यात भारत, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार देशांचा सहभाग होता. तसेच यासाठी 70 आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आपला सहभाग नोंदविला होता. यात ‘आयपीए,’ ‘आयएपीएमओ’ व ‘डब्ल्यूपीसी’तर्फे ‘स्वच्छ भारत संकल्पनेने प्रेरित’ या स्पर्धेची दखल ‘वर्ल्ड स्कील फाऊंडेशननेदेखील घेतली होती. द. आफ्रिकेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले. ‘इंडियन प्लम्बिंग प्रोफेशनल लीग’ या स्पर्धांचे आयोजन सुयोग्य व शास्त्रशुद्ध प्लम्बिंगबाबत जनजागृती व या क्षेत्रात नव्याने दाखल होणारे तंत्रज्ञान याबाबत माहिती व्हावी, यासाठी वास्तुविशारद व अभियंते यांच्यासाठी ‘आयपीए’मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

 

प्लम्बिंगच्या स्तरामध्ये सुधारणा व्हावी व जलसंधारण व्हावे यासाठी शेटे व संस्था यांच्या माध्यमातून विविधांगी प्रयत्न केले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिरे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट चाप्टर, गृहिणींसाठी लेडीज प्लम्बिंगचे प्रशिक्षण घेतले जाते. या माध्यमातून प्लम्बिंग या क्षेत्रात 100 महिलांना स्वावलंबी बनविण्याचे कर्तृत्व शेटे यांनी केले आहे. प्लंबर हा डॉक्टरांइतकाच महत्त्वाचा असल्याचे शेटे आवर्जून नमूद करतात. ‘स्वच्छ पाणी’ हा आरोग्याचा मूलमंत्र असल्याने त्यासाठी तंत्रशुद्ध प्लम्बिंग आवश्यकच आहे. तसेच, जलसंधारणातदेखील वाटा मोठा आहे. त्यामुळे प्लंबर हा देशाचा आरोग्यकर्मी आहे, ही भावना जागृत होणे आवश्यक असल्याचेदेखील मिलिंद शेटे आवर्जून नमूद करतात. आजमितीस ‘आयपीए’च्या माध्यमातून ‘प्लम्बिंग इंजिनिअरिंग’ हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात सुरू आहे. आजवर 200च्या आसपास मुलींनी हा कोर्स पूर्ण केला आहे. प्लम्बिंगला प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्लंबरलासुशिक्षित करणे, त्याला नावापुढे ‘पीएल’ लावता यावे यासाठी शेटे कार्य करत आहेत. शेटे यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘इंडियन प्लम्बिंग स्कील कौन्सिल’ अर्थात ‘आयपीएससी’ या राष्ट्रीयस्तरावरील संस्थेच्या संचालक तसेच भारताच्या ‘वर्ल्ड स्कील कॉम्पिटिशन’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या अंतर्गत सध्या ज्या प्लंबर्सना प्रशिक्षण मिळालेले नाही किंवा मान्यता मिळालेली नाही, त्यांना प्रशिक्षित करून व प्रमाणपत्र देऊन त्यातून त्यांची श्रेणीवार वर्गवारी करण्यात येते. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते. याअंतर्गत भारतातील प्लम्बिंग व्यवसायाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा व जागतिक दर्जाच्या प्लंबर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी प्लंबर्सना प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते व आता जागतिक पातळीवर भारतीय प्लंबर सहभाग नोंदविणार आहेत. शेटे यांनी आजवर विविध देशांत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निरीक्षक, परीक्षक म्हणून अभिमानास्पद भूमिका बजाविली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@