आयुर्वेदाचा प्रचारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |




आयुर्वेद हा संस्कृत शब्द. ‘आयु’ म्हणजे ‘जीवन’ आणि ‘वेद’ म्हणजे ‘विद्या’ असा केला जातो. वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना परिस्थितीशी दोन हात करत कर्तृत्वाच्या जोरावर नवी मुंबईतील आयुर्वेद पंचकर्म उपचार पद्धतीमध्ये प्रसिद्ध असलेले डॉ. प्रशांत वाघमारे यांची ही यशोगाथा...

 

1982 मध्ये डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात सर्वसामान्य कुटुंबातील जन्म झालेल्या प्रशांत यांनी बालपणापासून काही बनण्याचे वेगळे स्वप्न बाळगले नव्हते. इतर मुलांप्रमाणे शाळा, खेळ, अभ्यास हा आठवीपर्यंत तसाच चालू राहिला. वाघमारे कुटुंबीय मूळचे पुण्याचे, वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आणि आई गृहिणी, असे सर्वसामान्य डोंबिवलीकर कुटुंब. कालांतराने वाघमारे परिवार नवी मुंबईत स्थायिक झाला. त्यामुळे प्रशांत यांनी पुढील शिक्षण याच शहरातून घेतले. बारावीनंतर त्यांचा पुढील भवितव्याच्या वाटचालीसाठी विचार सुरू झाला होता. त्यावेळी बारावीनंतर काय ? हा प्रश्न प्रशांतलाही पडला होता. बारावीनंतर विज्ञान शाखेकडे जाण्याची पद्धत त्यावेळच्या मुलांमध्ये होते. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्ताराचा तो काळ असल्यामुळे विज्ञान शाखेतून या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार त्यावेळच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये होता. याशिवाय मेडिकल क्षेत्रात एमबीबीएसला प्रवेश न मिळणारे विद्यार्थी आयुर्वेदाकडे जाण्याचा विचार करतात. त्यावेळचीही परिस्थितीही तशीच होती.

 

आयुर्वेदात शिक्षण घेऊन त्यात पुढे काहीतरी करण्याचा विचार करणारी मंडळी मुंबईसारख्या शहरी भागात तशी कमीच...आजही त्यात बदल झालेला नाही. मात्र, आठवीपर्यंत संस्कृत विषय असल्याकारणाने आयुर्वेदात बालपणापासूनच रस. त्यामुळे याच विषयात काहीतरी करू, असा विश्वास वाघमारे यांना होता. त्यानुसार आयुर्वेदातील काही डॉक्टरांना भेटत त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे आयुर्वेदातील शिक्षणाबद्दल माहिती घेतली. त्यावेळेस त्यांना वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अभियांत्रिकीकडे जा, असा सल्ला देण्यात आला. मात्र, निश्चय ठाम असल्याने त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश मिळाल्यानंतरही शिव आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण सुरू केले. आयुर्वेदातच काहीतरी करावे, असा निश्चय त्यांनी शिक्षण सुरू झाल्यावरही केला नव्हता. शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा यासाठी प्रशिक्षणाचीही सुरुवात केली. त्यानंतर अ‍ॅलोपॅथीच्या रुग्णालयात शिकवला जाणारा एक अभ्यासक्रम शिकण्याचाही त्यांनी निर्णय घेतला, तोपर्यंत पदवीचे शिक्षण पूर्ण झाले होते. इतर सर्वसामान्य घरातील मुलांप्रमाणेच लवकरात लवकर नोकरीला सुरुवात करण्याचा दबाव वाघमारे यांच्यावरही होता. मात्र, घरच्यांच्या परवानगीनंतर आणखी तीन वर्षे पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथून पदव्युत्तर पंचकर्म निष्णात हा वर्षभराचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताराचंद पंचकर्म रुग्णालयात प्रशिक्षण घेत असताना त्या काळात अनेक वैद्यांची चिकित्सापद्धती शिकायला मिळाली. वाघमारे यांचे गुरू वैद्य अतुलचंद्र ठोमरे यांच्याशी याच ठिकाणी भेट झाली. वैद्य ठोमरे हे त्या काळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथील आयुर्वेद विभागाचे प्रमुख होते. या ठिकाणी दीड वर्ष ठोमरेसरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर आयुर्वेदातील अन्य ज्ञान त्यांनी प्राप्त केले. ठोमरे यांनी ‘आणखी एका वैद्यांकडे शिकायला जा,’ असा सल्ला दिला. त्यानुसार वैद्य संजय पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि अखेर शिक्षण संपल्यावर घरी परतण्याचा विचार केला. निघताना त्यांच्या गुरूंनी दिलेला आशीर्वाद, इतक्या वर्षांचा अनुभव आणि कानमंत्र इतकीच जमापुंजी डॉ. प्रशांत वाघमारे यांच्या गाठीशी होती.

 

यशाचा मूलमंत्र

 

तुम्ही जिथे आहात तिथे असण्याचे कारण हे दैवीच असेल. त्यामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा पुरुषार्थ प्राप्त केल्यास यशस्वी व्हाल. मी आयुर्वेदाचा अभ्यासक असल्याकारणाने त्यानुसार अंमल केल्यामुळेच इथवर पोहोचलो आहे.

 

नवी मुंबईत परतल्यावर पुढील वाटचालीची सुरुवात करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला. पंचकर्मामध्ये नैपुण्य मिळवल्यावर घरानजीकच रुग्णांवर उपचार सुरू करण्याचा विचार त्यांनी केला. कारण, पंचकर्म उपचारपद्धती या पहाटेपासूनच सुरू केल्या जातात. त्यामुळे घराजवळ असलेले उपचार केंद्र कोणत्याही ऋतूत सोयीचेच, असा विचार करत त्यांनी नवी मुंबईत सानपाडा येथील घराजवळच एक गाळा घेतला आणि सुरुवात झाली पुनर्वसू आयुर्वेदिक चिकित्सालय’ आयुर्वेदिक केंद्र आणि पंचकर्म केंद्राची... सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली. मात्र, उद्योगातील बारकावे काही वैद्यकशास्त्र शिकवत नाही, वाघमारे यांनाही तशीच अडचण येऊ लागली. काही काळ व्यवसायातील या गोष्टी शिकण्यात गेला. कोणत्या औषधांवर गुंतवणूक कशी करावी, रुग्णाकडून शुल्क आकारण्याची पद्धती, किमान शुल्क काय याची गणितेही शिकावी लागली. चार वर्षांनंतर व्यवसायवृद्धी करण्याचा विचार डॉक्टरांनी केला. बँकेकडून कर्ज घेऊन विस्तार करण्यापेक्षा उपलब्ध रकमेतून पाऊल पुढे टाकले. चार वर्षांपर्यंत हजारएक रुग्णांवर त्यांनी उपचार केले होते. हाताशी असलेला अनुभव आणि मित्रांच्या मार्गदर्शनातून औषधनिर्मितीच्या क्षेत्रात ते उतरले. च्यवनप्राश, तेल, काढा यांसह अन्य आयुर्वेदिक औषधे त्यांनी आपल्या केंद्रात बनविण्यास सुरुवात केली. त्यातील काही औषधांना चांगली मागणीही मिळाली. मात्र, आयुर्वेदिक कंपन्यांच्या स्पर्धेमुळे यात आणखी गुंतवणूक कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाचव्या वर्षात पुनर्वसू आयुर्वेदिक चिकित्सालय स्वतःच्या जागेवर उभे राहिले, स्वतःची जागा असल्याने रुग्णांचा विश्वासही वाढत होता.

 

प्रशात यांच्या लग्नानंतर पत्नी फिजिओथेरपिस्ट असल्याने कंबरदुखी, संधीवात आदींच्या रुग्णांवर आयुर्वेदिक उपचारही केले जाऊ लागले. फिजिओथेरेपी आणि आयुर्वेद यांच्या एकत्रित उपचारानंतर रुग्णांचा प्रतिसादही वाढू लागला. पुनर्वसू आयुर्वेदिक चिकित्सालयात फिजिओथेरेपीही केली जाऊ लागली. यासह भविष्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीची औषधनिर्मिती व समाजात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचे ध्येय प्रशांत वाघमारे यांनी स्वतःसमोर ठेवले आहे. आरोग्यसंपन्न जीवनासाठी आयुर्वेदिक जागृतीविषयक उपक्रम, नेत्रदान जागृती उपक्रम ते राबवत असतात.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@