‘ज्ञानदीप’ लावू जगी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |




जग बदललं तसा काळही बदलला. जगण्यासाठी तिने शिक्षणाला प्राधान्य दिलं, मात्र तरीही रूढी-परंपरांचा पगडा कायमच राहिला. शिक्षण घेत समाजात व जीवनात होणारे बदल स्त्रियांनी आपसूक आत्मसात केले. पण, समाजबदलात रूढींना तिलांजली देणे गरजेचे असते, याकडे मात्र आजही स्त्रीवर्गाचेही दुर्लक्ष झाले. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या शिक्षेसाठी कायदा कठोरतम बनत चालला आहे. पण, समाजाच्या खासकरून स्त्रियांकडूनच स्त्रियांवर होणाऱ्या मानसिक आघाताबाबत मात्र चर्चा होताना दिसत नाही. अशा समाजातील एकल महिलांसाठी डोंबिवलीतील भारती मोरे काम करतात. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. चाळ संस्कृतीत लहानाच्या मोठे झालेल्या भारती मोरेंनी चाळीतील अडीअडचणीला धावून जायची पद्धत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अवलंबली.

 

शिक्षण, नोकरी, लग्न-संसार अशा ठराविक चाकोरीतून त्यांचे आयुष्य पुढे जात असतानाच 1982 साली त्यांच्या आयुष्यात एक ‘टर्निंग पॉईंट’ आला व त्यांचा परिचय ‘ज्ञानदीप’ संस्थेशी झाला. मुंबई दूरदर्शनवरील ‘ज्ञानदीप’ कार्यक्रमापासून समाजकार्याची प्रेरणा घेऊन आकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक ज्ञानदीप मंडळे 80च्या दशकात कार्यरत होती. त्यापैकी डोंबिवलीत ‘अभंग’ आणि ‘अद्वैत’ या दोन ज्ञानदीप मंडळांनी एकत्र येऊन ‘ज्ञानदीप स्त्री जागृती मंच’ या संस्थेची स्थापना केली. 12 जानेवारी, 1995 रोजी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्त्रीजागृती आणि स्त्रियांचे सक्षमीकरण हे प्रमुख ध्येय समोर ठेवून संस्थेचे स्त्रीविषयक कार्य सुरू झाले. स्त्री शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, स्त्रीविषयक कायदे, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्त्रियांच्या विविध प्रश्नांबाबत जाणीव जागृती निर्माण करणारे विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आणि हा सिलसिला आजतागायत सुरू आहे.

 

1995 ते 2000 या पाच वर्षांच्या कालावधीत संस्थेने अल्पशिक्षित, कष्टकरी, ग्रामीण महिलांसाठी सावित्री प्रकल्प, शहरातील शिक्षित महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘दृष्टी’ प्रकल्प, युवतींसाठी ‘दिशा’ प्रकल्प आदी उपक्रम हाती घेतले. 2001 पासून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. एकल म्हणजे एकट्याने जीवन जगणाऱ्या महिला. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, प्रौढ अविवाहित महिला अशा स्त्रियांना संघटित करून त्यांचे आधारगट सुरू करण्यात आले. या आधारगटांचा आढावा घेता ‘स्वानंद आधार गट’ आणि ‘मैत्रीण आधारगटा’ची निर्मिती करण्यात आली. आर्थिक समस्या, घराचा प्रश्न, एकेरी पालकत्वाचे आव्हान, अनिष्ट रुढींमुळे होणारा सामाजिक भेदभाव, मानसिक ताणतणाव अशाच सर्वच आघाड्यांवर त्यांचा संघर्ष चालू असतो. या महिलांना ‘मैत्रीण आधार गटा’च्या रूपाने एक विश्वासाची जागा मिळाली आणि त्यांना स्वाभिमानाने जगणे समजू लागले. एकत्र राहून एकजुटीने अनुभवांची देवाणघेवाण करत, आपण कोणतेही अवघड काम करू शकतो, हा आत्मविश्वासही या महिलांच्या मनात जागृत झाला. रुजलेला आहे. अल्पशिक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील एकल महिलांना ‘मैत्रीण’शी जोडून घेण्यासाठी पाथर्ली येथील शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालय आणि एमआयडीसीमधील उदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या केशव रामभाऊ कोतकर विद्यालय या शाळांच्या सहकार्याने या शाळांमध्ये माता पालकांचे आधारगट त्यांनी सुरू केले आहेत. एकल महिलांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या जुन्या अनिष्ट रूढी-परंपरा नष्ट व्हाव्यात, त्यांना सन्मानाने जगता यावे, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना समाविष्ट करून घेतले जावे, यासाठी जनजागृती करणे, तसेच एकल महिलांचे प्रश्न व मागण्या शासनासमोर मांडणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मंचाला संपूर्ण सहकार्य देणे, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील एकल महिलांच्या मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, स्वतःच्या पायावर उभे राहून उर्वरित आयुष्यात त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, या हेतूने ज्ञानदा स्त्री शिक्षण प्रकल्प 2002 पासून हाती घेण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त माता पालक असलेल्या कुटुंबातील इयत्ता 8 वी ते 12 वी मधील मुलींची निवड शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहकार्याने केली जाते व योग्य विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करण्यात येते. ‘ज्ञानदा’ प्रकल्पाने आतापर्यंत अनेक गरजू व अभ्यासू मुलींना मदतीचा हात दिला आहे. समाजातील दानशूर व्यक्ती देत असलेल्या देणगीतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

यशाचा मूलमंत्र

 

भारती मोरे महिलांना कायम समजावण्याचा प्रयत्न करतात की, “तुमच्या हातात स्मार्ट फोन आला पण बायांनो तुम्ही ‘स्मार्ट’ कधी होणार? तंत्रज्ञान बदलत चालले, पण तुमची रुढींची बंधनं काही सुटेना. शिक्षण घेतले तरी समाजात तुमच्यासाठी बदल होणे गरजेचे आहे, हे तुम्हीच मान्य करीत नाही,” असं काहीसं त्यांचं सर्व स्त्रियांना सांगणं असतं.

 

महिलांमध्ये जनजागृतीसाठी संस्थेच्या वतीने लोकसंगीताच्या माध्यमातून पारंपरिक चळवळीतील गाणी कलापथकाच्या कार्यक्रमात सादर केली जातात. ही गाणी स्वतः अध्यक्षा भारती मोरे आणि त्यांचे सहकारी गाऊन महिलांमध्ये प्रबोधनाचे काम करतात. गरीब वस्तीतील मुलींसाठी ‘घेऊ उंच भरारी’ व ‘वयात येताना’ अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाते. तसेच समाजात कष्ट करून मुलांचे पोषण करणाऱ्या एकट्या आईच्या कष्टाची जाणीव मुलांना होण्यासाठी त्या मायलेकींचा मेळावा तसेच ‘माझी आई’ या विषयावर निबंधस्पर्धेचेही आयोजन केले जाते. दरम्यान, समाजात एकट्याने स्वतःच्या घराची जबाबदारी स्वीकारत स्वकर्तृत्वावर जगणाऱ्या स्त्रिया अनेकदा लैंगिक शोषणाला बळी पडतात. अशा महिलांसाठीही ‘ज्ञानदीप स्त्री जागृती मंचा’च्या वतीने काम केले जाते. तसेच गेल्या सात-आठ वर्षांत ‘ज्ञानदा’ने पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले आहे. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सहकार्याने दरवर्षी दहा मुलींची यासाठी निवड केली जाते. शक्यतो तळागाळातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आणि ज्यांची आई एकटीने कुटुंब चालवत आहे, अशा मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न असतो. आठवी ते दहावीमधल्या गरजू, हुशार मुलींना प्रत्येकी रु.500/- शालेय साहित्यासाठी देण्यात येतात. आम्ही सर्व जणी शाळेत जाऊन या मुलींच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतच असतो. अर्थात, ‘ज्ञानदा’ हा उपक्रम केवळ देणगीदारांच्या सहकार्यामुळे चालतो.

 

डोंबिवली शहरात एकल महिलांसाठी काम करणारी तसेच स्त्रियांसाठी काम करणारी कौटुंबिक सल्ला केंद्रे तसेच स्त्री मुक्ती संघटना तयार होण्याची गरज आहे. पण, शहरात तयार होणाऱ्या संस्था आर्थिक मदतीअभावी किंवा जागेअभावी बंद पडत असल्याने अशा संस्थांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मदत करावी, असेही मोरे यांचे मत आहे. एकल महिलांना समाजात वावरताना काही रूढी, बंधने ही समाजाने घालून दिली आहेत व त्यांना त्याचे पालन करावे लागते. जसे की, विधवा महिलांना सणासुदीला हळदीकुंकू लावण्याचा हक्क नसतो, तसेच त्यांना संक्रांतीला इतर सवाष्ण महिलांप्रमाणे वाणही लुटता येत नाही. भारती मोरे या स्वतः तरुणींना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. स्वतःच्या खाजगी आयुष्यात अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी नोकरी सोडून पूर्ण केले. 1982 साली मुंबई दूरदर्शनवरील ‘ज्ञानदीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याची सुरुवात त्यांनी केली. यानंतर ‘अभंग ज्ञानदीप मंडळ,’ ‘अश्विनी ज्ञानदीप संघ,’ ‘ज्ञानदीप स्त्री जागृती मंचा’च्या संस्थापिका व अध्यक्षा म्हणून त्या काम पाहत आहेत. तसेच ‘ज्योत एक सेवेची’ या ‘ज्ञानदीप’च्या मासिक मुखपत्राचे व दूरदर्शनच्या ‘ज्ञानदीप’ मासिकाचे संपादनही त्या गेली तीन वर्षे करीत आहेत. याव्यतिरिक्त भारती मोरे यांनी लिहिलेली ‘तुझी माझी जोडी’ व स्त्री जीवनाचे वास्तव मांडणारी ‘माहेरचा आहेर’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महिलांसाठी भारती मोरे यांचे अविरत काम पाहता त्यांना ‘सौदामिनी पुरस्कार’ देण्यात आला आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्राकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@