काकूंचा स्पर्श वात्सल्याचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |


 


मुलांचे संगोपन उत्तमरित्या व्हावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र, आजघडीला घर सांभाळण्याबरोबरच त्या घराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे. मुलं थोडी वयाने मोठी झाली की, नोकरदार महिलांना त्यांना पाळणाघरात ठेवून कामावर जावेच लागते. पाळणाघरापेक्षा दुसरे घरच म्हणता येईल, असे बदलापूरमधील टिळक काकूंचे सुरक्षित आणि संस्कारांची पखरण करणारे पाळणाघर.


घर-संसार आणि नोकरी-व्यवसाय या दोन्हींचा समतोल साधताना विभक्त कुटुंबात राहाणाऱ्या आजच्या नोकरदार महिलांना आपल्या लहान मुलांना कुठे ठेवावे, ही चिंता सतावत असते. तिची ही चिंता ‘पाळणाघर’ या संकल्पनेमुळे काहीशी दूर झाली. पाळणाघर चालवणाऱ्या महिलांनाही रोजगाराची नवी दिशा मिळाली खरी; पण या आधुनिक पाळणाघरांना आलेल्या व्यवहारीपणाचा साज मोडीत काढत बदलापूरच्या शर्मिला शरदचंद्र टिळक गेली ३७ वर्षे अविरतपणे पाळणाघर चालवत आहेत. मूळच्या अलिबाग-नागावच्या असणाऱ्या शर्मिला टिळक यांचे ८ जून, १९७२ साली लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत दाखल झाल्या. त्यांचे पती शरदचंद्र टिळक हे ‘बुश इंडिया’ कंपनीत कामाला होते. ठाण्यात राहत असताना त्या एकत्र कुटुंबात राहत होत्या. त्यावेळी त्यांचा, २ दीर, २ नणंदा, सासरे व आजेसासूबाई असा परिवार होता. काही वैयक्तिक कारणाने त्यांचे स्थलांतर बदलापुरात झाले. १९८३ साली पती शरदचंद्र टिळक यांची कंपनी बंद झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी डबे पोहोचविणे व पाळणाघराच्या कामाला त्यांनी सुरुवात झाली. काकू स्वतःच्या राहुल व हेमांगीला सांभाळत असताना त्यांच्याकडे तीन मुले सांभाळण्याची जबाबदारी आली. या तीन मुलांचा त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ केला व याच ओळखीतून मुलांची संख्या वाढत गेली.

 

 
 

१९८३ साली महिला नोकरी करीत असल्या तरी त्यांच्या नोकरीवर कुटुंब व समाजाची हरकत होतीच. ती झुगारून अनेक महिला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नोकरी करत होत्या. त्यापैकीच एक म्हणजे अर्चना घाणेकर. घरची परिस्थिती बिकट असताना स्वतःच्या दोन मुलांना उत्तम शिक्षण व संस्कार देण्यासाठी त्यांची तळमळ सुरू होती. शिक्षणासाठी त्या स्वतः झटत होत्या. मात्र, त्यांच्या दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार व त्यांचे बालमन जपण्यासाठीची साथ त्यांना टिळक काकूंनी दिली. त्यांचा दुसरा मुलगा सतत आजारी असायचा. पण, टिळक दाम्पत्याने कोणताही व्यवहारी दृष्टिकोन न ठेवता त्याची विशेष काळजी घेतली व त्याला जपले. मायेबरोबर टिळक काकूंनी या मुलांवर उत्तम संस्कार केल्याची आठवण आजही या मुलांचे पालक आवर्जून सांगतात. काका-काकूंकडे सांभाळायला असलेली कित्येक मुले चांगली शिकून मोठी झाली आहेत, तर कित्येक मुले स्वतः पालक होऊन त्यांची मुलेदेखील टिळक काकूंकडे सांभाळायला आहेत.

 

यशाचा मूलमंत्र

 

"स्वत:चे घर हे सर्वांनाच प्रिय असते. पण, माणसाने माणसाला माणुसकीने वागवावे अशा सरळ भावनेतून त्या प्रत्येक मुलाला सांभाळतात व त्याच्यावर मायेचा व वात्सल्याचा वर्षाव करतात."

 

बदलापूर शहर विकासाच्या मार्गावर चालत असले तरी मध्य रेल्वेच्या बेशिस्त, विस्कळीत वाहतुकीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. विशेषत: पावसाळ्यातील मध्य रेल्वेचे विस्कळीत वेळापत्रक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. या काळातही टिळक काकू या महिलांची बाजू लक्षात घेत मुलांना जेवू घालतात व त्यांचे उत्तम संगोपन करतात. या मुलांबरोबर टिळक काकू कधीकधी पाल्यांच्या आईवडिलांचीही भूमिका पार पाडतात. या पाळणाघराला आज ३७ वर्षे पूर्ण झाली असली तरी १९८३ साली हे बदलापुरातील पहिले पाळणाघर होते. काकूंच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे पाळणाघर मुलांनी गडबजलेले असते. आज वय झाले असले तरी त्या अगदी आनंदाने मुलांचा सांभाळ करतात. गेल्या वर्षभरापासून त्यांनी डबे पोहोचविण्याचे काम बंद केले असले तरी या मुलांना आवडणारे सर्व पदार्थ टिळक काकू आवडीने करतात. या मुलांना घरची ओढ लावण्याबरोबरच त्यांना सणांचे महत्त्वही त्या समजवितात. गणेशोत्सव, दहीहंडीसारख्या सणांना या घरात विशेष असा उत्साह असतो. टिळक काका-काकूंमुळे ही मुले स्वतःची कामे स्वतः करायला शिकली. वाढत्या आधुनिकीकरणामुळे मुले एकलकोंडी होतात. मात्र, टिळक काका-काकू त्यांच्यावर संस्कार घडवून, त्यांना आपलेपणाची भावना जोपासण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.

 

घरात आजी-आजोबांसारखी मोठी जबाबदार माणसं असली तरी त्यांची आजारपणं, वयानुरूप कमी होणाऱ्या शारीरिक क्षमता या सगळ्यामुळे पालक पाळणाघराचा मार्ग स्वीकारतात. पाळणाघरात मूल ठेवल्यानंतरही प्रत्येक आई निर्धास्त असतेच असे नाही. मूल दिवसभर काय करत असेल, खाणं-पिणं वेळेवर झालं असेल का, रडत तर नसेल ना, असे अनेक प्रश्न तिला सतावत असतातच. मात्र, कुटुंबात दोघांनी नोकरी करण्याची काळाची गरज म्हणून अनेक पालक नाईलाजाने पाळणाघरांचा मार्ग स्वीकारतात. अलीकडच्या घटनांमुळे आता प्रत्येक पालक आपलं मूल पाळणाघरात सुरक्षित आहे का, याच विचारात असताना टिळक काकूंचे पाळणाघर ३७ वर्षे मुलांचे उत्तमरित्या संगोपन करीत आहे. त्यांचे हे घरगुती पाळणाघर आधुनिक शास्त्र-स्वच्छता, आरोग्य यांनी परिपूर्ण असलेले घर असल्याचे स्वाती घांगेकर, प्राची बडे, चैताली हरदास, स्मिता कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, मेधा आगरकर, ज्योती तांबेकर, गौरवी रांगणेकर, मनाली राजे, रमाकांत लोगडे, पल्लवी पेंडसे व इतर अन्य पालकांचे म्हणणे आहे. टिळक काकू म्हणतात,“मी फोन करेपर्यंत काळजी करू नका.” त्यांच्या या उत्तरावर येथील पालक निर्धास्त असतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@