लोखंडाचे सोने करणारा उद्यमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |




कौटुंबिक व्यावसायाची स्थिती नाजूक असतानाही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत 'श्री साई इंडस्ट्रीज' या भागीदारीतील कंपनीचा विस्तार सातासमुद्रापार पोहोचवत तितकाच हातभार समाजकार्यातही लावणारे धनंजय लोहार यांचा अवघ्या साडेतीन रुपयांपासून व्यवसाय सुरू करणारी संघर्षमय कथा खरचं प्रेरणादायक आहे.

 

धनंजय लोहार यांचा जन्म मूळचा नाशिकचा. त्यांचे वडील मोरेश्वर लोहार घरगुती वापराच्या लोखंडी वस्तूंची निर्मिती करत. त्यात स्वयंपाक घरातील विळी, कोयता आणि धारदार वस्तूंची निर्मिती एका लहानशा कारखान्यात होत असे. कालांतराने त्यांच्या या व्यवसायातून भावंडांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोरेश्वर यांनी चमचे बनवण्याचा स्वतंत्र कारखाना उभारला. काही काळ सारं काही सुस्थितीत चालू असताना अचानक लोहार कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आणि अचानक उद्योगाची गती मंदावली. मात्र, मोरेश्वर लोहार यांनी या परिस्थितीतही मुलाला उत्तम शिक्षण दिले. पूर्वीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या धनंजय यांनी घराबाहेर राहून शिक्षण पूर्ण केले. नाशिकच्या आर. वाय. के. महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे अभियांत्रिकीसाठी अमृतवाहिनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयाच्या पहिल्या वर्गातील 'उत्कृष्ट विद्यार्थी' अशी त्यांची ओळख झाली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी किशोर, प्रभाकर आणि सुरेश चाफेकर या त्यांच्या तिन्ही मामांनी हातभार लावला. त्यामुळे संपूर्ण लोहार कुटुंबातील शिकलेले आणि पदवीपर्यंत पोहोचलेले धनंजय हे एकमेव विद्यार्थी.

 

त्यांच्या घरची परिस्थिती शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही बदलली नव्हती. दिवसेंदिवस लोहार कुटुंबीयांवर वाढत्या कर्जामुळे घरातील दागिने विकण्याची वेळही आली होती. एकीकडे घरची परिस्थिती सावरण्यासाठी येणारा विचार आणि दुसरीकडे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर येणारे नोकरीसाठीचे दडपण यामुळे लोहार द्विधा मनस्थितीत अडकले होते. त्यांना शिक्षक म्हणून नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र, परिस्थितीकडे पाहता जी मिळेल ती नोकरी सुरू करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांच्या मित्रमंडळींपैकीच कोणीतरी त्यांचा बायोडाटा बरमॅको वॉल्स प्रायव्हेट लिमिटेड, तुर्भे या नामांकित कंपनीत व्यवस्थापक या पदासाठी पाठवला होता. लोहार यांनीही याच कंपनीत 'प्रशिक्षणार्थी' या पदासाठी अर्ज केला होता. दोन्ही पदासाठी एकाच दिवशी मुलाखतीघेतल्या जाणार होत्या. साहजिकच लोहार यांनी व्यवस्थापकपदासाठी अर्ज केला. मुलाखती झाल्या. पुढील प्रक्रियेसाठी लोहार यांचा अर्ज पाठवण्यात आला. मात्र, हाच दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. याच दिवशी एक मुलाखतकार धनंजय लोहार हे एका उद्योजकाच्या भूमिकेत शिरले होते. झालं असं की, कंपनीत मुलाखतीवेळी त्यांची ओळख रानडे नावाच्या सद्गृहस्थाशी झाली. रानडे यांना नोकरीत रस नव्हताच. ते मुलाखतीच्या निमित्ताने कंपनी आणि प्लांट पाहण्यासाठी आले होते. घरी जाण्यास निघाल्यावर रानडे यांनी आपल्या गाडीमधून धनंजय यांना सोयीच्या ठिकाणावर सोडले. हा प्रवास तसा लांबचा असल्याने दोघांचीही जरा सविस्तरपणे चर्चा झाली. यात लोहार यांना असलेल्या अडचणी आणि नोकरीची गरज हा उल्लेखही आलाच. मात्र, रानडे यांनी त्यांना उद्योग करण्याचा सल्ला दिला. “तुझ्याकडे एक व्यवसाय सुरू करण्यासाठीची किमान आवश्यक असलेली सर्व सामग्री उपलब्ध आहे. तू उद्योग सुरू कर,” असे सांगत त्यांनी त्यासाठीच्या मदतीचेही आश्वासन दिले. धनंजय यांनीही हा सल्ला स्वीकारत उद्योगात पाय रोवण्यासाठीचा निर्धार केला आणि १९८९ मध्ये सुरुवात झाली 'श्री साई इंडस्ट्रीज'ची...

 

त्याकाळी लोहार यांचे दोन्हीही बंधू राजेश आणि मनोज यांनीही धनंजय यांना साथ दिली. या पूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे रानडे यांनी सुरुवातीला पाठबळ म्हणून काही समांतर उद्योगातील व्यक्तींशी परिचय करून दिला. सुरुवातीच्या काळात 'श्री साई इंडस्ट्रीज'ला पाया रोवण्यासाठी त्याचा हातभार लागला. ही भागीदार तत्त्वावरील कंपनी विविध कंपन्याना लागणारे यंत्राचे सुटे भाग, मेटल शीट बनवण्याचे काम करत होती. अशाच प्रकारच्या हजारो कंपन्या मुंबईतल्या गल्लोगल्ली उपलब्ध होत्या. लोहार यांच्या कंपनीची स्पर्धा थेट याच कंपन्यांशी होती. मुंबईपासून आधीच लांब, त्यात तिथल्या दळणवळण सुविधा नाही. काहीच पथ्यावर पडणारे नसले तरी लोहार यांनी आपल्या कंपनीचे स्थान बाजारात निर्माण केले. त्यांना इथवर पोहोचेपर्यंत बर्‍याच अडथळ्यांना पार करावे लागले होते, त्याचाच एक किस्सा गणेशोत्सवावेळी झाला. मुंबईतून अशीच एक ऑर्डर त्यांना मिळाली होती. ऑर्डर मिळणार्‍या कंपनीत जाण्यासाठी त्यांच्या खिशात अवघे साडेतीन रुपये होते. कंपनी गाठण्यासाठी त्यांनी एका बसच्या मागे लटकत प्रवास सुरू केला. मात्र, काही किमी दूर जाताच त्यांचा हात दुखू लागला. त्यामुळे बस सोडून मालाड येथील त्यांच्या मावशीच्या घरी त्यांनी थांबायचे ठरवले. नव्या कामाविषयी आणि पैशांच्या अडचणीविषयी त्यांनी आपल्या मावशी आणि काकांना सांगितले. गणेशकृपेने काकांनी त्यांच्याकडे असलेले २१ हजार रुपये धनंजय यांना दिले आणि २१ हजार, ३ रुपये, ५० पैशांतून सुरू झालेल्या या उद्योगाने पहिल्या कामातून ३५ हजारांची उलाढाल पाहिली. तेव्हापासून आजतागायत लोहार कुटुंबाने मागे वळून पाहिले नाही.

 

यशाचा मूलमंत्र

 

"व्यापारात नगदी व्यवसाय करू नका. केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवा, पैसे घ्या आणि त्याची नोंद करा. पैसे देताना त्याची आधी नोंद ठेवा, मग पैसे द्या. तुमच्या वार्षिक उलाढालीपेक्षा 20 टक्क्यांहून अधिक कर्ज घेऊ नका, अन्यथा तुमचा उद्योग धोक्यात आहे, असे समजा. ज्या कामासाठी कर्ज घ्याल ते पैसे त्याच कामासाठी वापरा."

 

काही वर्षांनी त्यांचा विवाह डोंबिवलीतील वंदना चिंचणकर यांच्याशी झाला. वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेल्या वंदना यांनीही अशाच बेताच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले होते. संसारही सुरू होताच. मात्र, अजूनही आव्हाने कायम होती. आता जबाबदारीही वाढत होती... संसार, काम आणि आधी असलेली आर्थिक स्थिती सुधारण्याची जबाबदारी तिन्ही भावंडांवर होती. दरम्यानच्या काळात काही मार्गदर्शकांची मदतही मिळत गेली. त्यापैकी मालाड येथील नंदकुमार चाफेकर एक! माल घेण्यापासून ते त्याची योग्य दरामध्ये विक्री आणि अन्य धंद्यातील बारकावे धनंजय यांना त्यांच्यामुळेच समजले होते. त्यानंतर १९९९ मध्ये सरवली येथे सध्याच्या जागेत 'श्री साई इंडस्ट्रीज'चा डोलारा हलवण्यात आला. लहान भाऊ राजेश याचा यामध्ये मोठा हातभार लागला. धनंजय लोहार यांनी गुणवत्ता आणि सरकारची मानके कंपनीला मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू केला. 'श्री साई इंडस्ट्रीज'ला आता २००८-२०१५ हे 'आयएसओ' हे मानांकन मिळाले आहे. त्याशिवाय 'क्रिसिल' या संस्थेकडून दर वर्षी पतमानांकन करून घेतले जाते. कंपनीने २०१२ मध्ये निर्यात परवानामिळाल्यावर स्वित्झर्लंड येथील एका कंपनीचे काम त्यांना मिळाले. २०१४ मध्ये जर्मनी, २०१६ मध्ये टर्की आदी देशांमध्ये निर्यात होऊ लागली. जून २०१७ मध्ये एका जर्मनीतील कंपनीने त्यांना बोलावण्यात आले. जगभरातील देशांमधून गेलेल्या तेथे गेलेल्या १२ व्यक्तींपैकी भारताकडून ते एकमेव उद्योजक होते. त्यावेळेस धातू उद्योगातील व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला. यासह अनेक मित्रही मिळाले. “मुंबईतील मूळ ग्राहकांसह जगभरातील ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादन प्रामाणिकपणे पोहोचण्यात आम्ही कटिबद्ध आहोत, हेच आमच्या यशाचे गमक आहे,” असे धनंजय लोहार सांगतात. “तुमचा ग्राहक कधीही असंतुष्ट राहता कामा नये. तुमचे उत्पादन गुणवत्तापूर्ण कसे होईल, त्यासाठीची पडताळणी यंत्रणा यामुळेच तुमचा ग्राहक तुमच्याशी जोडलेला राहील,” असा कानमंत्र ते इतरांना देतात. डहाणूसारख्या वनवासीबहुल भागातील ४०-४५ कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. त्यांच्या कारभारामुळे आजूबाजूच्या २५-३० कामगारांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. भविष्यात अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करून केवळ निर्यातीवर भर देण्याचे लक्ष्य लोहार यांनी ठेवले आहे. त्यातून आणखी शंभर जणांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

 

 
 

धनंजय लोहार यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा 'उद्योगश्री' प्रकाशनाद्वारे नुकताच 'उद्योगश्री' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. उद्योगात स्थिरस्थावर होत असताना गेली १५ वर्षे त्यांनी समाजकार्यालाही हातभार लावला आहे. डहाणू-पालघर येथील विविध महाविद्यालयांमध्ये ते तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो. रोटरी क्लब, आश्रम शाळा आणि अन्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार लोहार यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळ, शाखा डहाणू या मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. या संस्थेच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरण, उद्योग व्यवसायाला प्राधान्य, उपचार खर्चासाठी मदत, शिक्षणासाठी मदत आदी उपक्रम सुरू केले आहेत. डहाणूतील विकासकामांबद्दलही ते आग्रही असतात. इथल्या समाजाच्या व्यथा मांडून त्या शासन दरबारी सोडवण्यासाठी, या भागात किरकोळ उद्योग यावेत, रोजगार उभा राहावा यासाठी त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या पत्नी वंदना यांनीही त्यांच्यासह समाजकार्यात हातभार लावला आहे. आपल्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांना आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांना देतात. “त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळेच आम्ही इथवर पोहोचू शकलो,” असा अभिमान त्यांना आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@