डहाणूचा ग्रीन मॅन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2019   
Total Views |



आपल्या कृषिप्रधान देशात शेतात राबणारे करोडो हात असले तरी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फारच कमी. पण, डहाणूच्या आशितकुमार सुमेरमल बोथरांसारखी काही व्यक्तिमत्त्वं याला अपवादही ठरतात. स्वत:ची शेती, नर्सरी, हॉर्टिकल्चर आणि लँडस्केपिंग व्यवसायाच्या व्यापातही ते डहाणूच्या शेतकऱ्यांच्या सर्वोपरी मदतीसाठी सदैव सज्ज असतात. म्हणूनच ते ठरतात डहाणूचे ‘ग्रीन मॅन’

 

पालघर जिल्ह्यातील डहाणू गाव. मुंबईपासून रेल्वेने अंतर जवळपास 90 किमी. साधारण दोन दशकांच्या मागणीनंतर मुंबईहून डहाणूला रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी 2013 साल उजाडावे लागले. त्यानंतर मात्र डहाणूमध्ये विकासाने वेग घेतला. पण, आजही या डहाणूतील स्थानिक, वनवासी बांधवांचे उत्पन्न हे शेतीवरच आधारलेले. याच शेतकरी बांधवांना शेतीसंबंधीत मोफत मार्गदर्शनाचे महत्कार्य हाती घेतले ते खुद्द शेतकरीच असलेल्या आशितकुमार बोथरा यांनी. एका जैन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बोथरांचे शिक्षण मराठी माध्यमातच झाले. वडिलांची शेती आणि अ‍ॅग्रो सर्व्हिस सेंटर असल्याने लहानपणापासून मातीशी आपसूकच नाळ जोडलेली. ज्याकाळी डहाणूत एकही अ‍ॅग्रो सेंटर नव्हते, त्याकाळी आशितकुमार यांच्या वडिलांनी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची विक्री करणे, युरियाचा पुरवठा करणे ही कामे अगदी प्रामाणिकपणे केली. एक रुपयाही कधी शेतकऱ्यांकडून अधिक घेतला नाही की कोणाला लुबाडलं नाही. वारशाने लाभलेला कृषिसेवेचा हा वारसा आशितकुमार यांनीही आपले जीवनध्येय म्हणूनच निर्धारित केला. आशितकुमार यांच्या रूपाने बोथरा घराण्याची ही शेतीलाच सर्वस्व मानणारी चक्क नववी पिढी. दहावीनंतर अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात पदवी शिक्षणासाठी ते दाखल झाले. त्यांचे भाग्य म्हणजे, 1988 सालीच या विद्यापीठात हॉर्टिकल्चरचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि बोथरा हॉर्टिकल्चरसाठी प्रवेश घेणारे दापोली विद्यापीठाचे ते पहिले विद्यार्थी ठरले. त्यानंतर त्यांनी एमएससी करायलाही सुरुवात केली. पण, त्यांच्या घरच्यांचं म्हणणं होतं की, एमएससी केलं की मुलगा डॉक्टरेटच्या, पीएचडीच्या मागे लागेल. तो शेतात राबणार नाही. म्हणून बोथरांनी एमएससी मध्येच सोडून दिलं आणि वडिलोपार्जित शेतीमध्ये ते सक्रिय झाले.

 

आशितकुमार बोथरा केवळ शेती आणि नर्सरीच सांभाळत नाही, तर सिंचनाच्या पद्धतींविषयीही ते शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करतात. ज्या काळात भारतात सिंचनासाठी लागणाऱ्या डाय आणि ड्रिपर्सचे उत्पादन होत नव्हते, त्यावेळी त्यांचे वडील आणि त्यांचे पार्टनर नरेश बाफना यांनी इस्रायलवरून प्लास्टिक ड्रिपर्स मागवून घेतले आणि बाजारात उपलब्ध असलेल्या पाईपच्या मदतीने डहाणूमध्ये ठिबक सिंचनाचा प्रयोग यशस्वीपणे राबविला. त्यामुळे आजही बोथरा यांना सिंचनाचे पाईप, प्रकार, त्यांची मापे अगदी तोंडपाठ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणीय परिस्थितीनुसार कोणते पीक घ्यावे, कोणती सिंचन पद्धती वापरावी, कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी, इथपासून ते त्यांच्या शेतमालाच्या विपणनापर्यंत बोथरा शेतकऱ्यांना एकही रुपया न घेता विनामूल्य मार्गदर्शन करतात. सेंद्रिय शेतीवर आज त्यांचा भर असून जैविक पीक संरक्षण उपाययोजनाही ते राबवितात. यामागे उद्देश एवढाच की, त्यांच्या ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. आज शेती, नर्सरीचा इतका मोठा व्याप हाताळणाऱ्या बोथरा यांनी सुरुवात मात्र चिकूची कलमं बांधण्यापासून केली आणि आज वाढत वाढत त्यांच्याकडे एकट्या चिकूचेच 800-900 प्रकार उपलब्ध आहेत. खरं तर पारशी माणसाने डहाणूत चिकूची शेती रुजवली. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात असलेली चिकूची शेती कालांतराने कमी कमी होत गेली. कारण, चिकू उत्पादनाचा खर्चही वाढत गेला. पण, त्या तुलनेत नफा मात्र वाढलेला नाही. त्यामुळे जिथे सुरुवातीला त्यांना 40-50 हजार चिकूची कलमं बांधायला लागायची, तिथे आता फक्त चार ते पाच हजार कलमांची मागणी असल्याचे ते सांगतात. मात्र, आंब्याची मागणी वाढली असल्याचेही ते आवर्जून नमूद करतात. चिकूपासून लोणचे, चिप्स, कोरफडीचे क्रीम, तेल यांसारखी कृषी मालावर आधारित उत्पादने तयार करून ते इनरव्हील क्लब आणि गृहोद्योगाला पुरवठा केला जातो.

 

यशाचा मूलमंत्र

बरेचदा आम्ही बांधलेली कलमं विक्रीस जात नाही. ती तशीच उरतात. पण, या उरलेल्या कलमांचीही आम्ही तितकीच काळजी घेतो. कारण, भविष्यात त्याची किंमत वाढूही शकते. त्यामुळे शेती असो अथवा अन्य कुठलाही व्यवसाय, संयम हा अतिशय महत्त्वाचा. आव्हाने तर येणारच, पण त्यांचा सामना आपण किती नेटाने करतो, यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. 

 

आज त्यांच्या 32 एकर क्षेत्रात पसरलेल्या नर्सरीत वर्षभरात 12 ते 14 लाख रोपट्यांची लागवड केली जाते. यामध्ये चिकू, आंबा, नारळ, पेरू, लिंबू, लिची अशी फळपिकांची कलमे, औषधी वनस्पती, शोभेची झाडे, भाज्या, फुलझाडे, जंगलातील वृक्ष यांचाही समावेश आहे. 1997 साली त्यांनी आपल्या नर्सरीत स्वत:ची माती व बियाणे परीक्षण प्रयोगशाळा स्थापन केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. शिवाय, शेतीला सुव्यवस्थित पाणीपुरवठ्यासाठी सिमेंट बंधारे, वनराई बंधारेही त्यांनी बांधले आहेत. ग्रीनहाऊसच्या विकासाचेही त्यांचे काम सुरू आहे. पण, शेतीमधील आव्हाने आणि खासकरून डहाणूत प्रामुख्याने जाणवणाऱ्या अडचणींविषयीही त्यांनी मनमोकळेपणाने बातचीत केली आणि त्यांच्यापरीने परिस्थिती सुधारण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत, या विषयीचीही माहिती दिली. शेतजमिनीत गुंतणूक करणारे गुंतवणूकदार डहाणूतही वाढले आहेत. पण, ते स्वत: शेतात राबत नाहीत. राबणारे शेतकरी आणि शेताची काळजी घेणारे वेगळे नोकर-चाकर. ही परिस्थिती पाहता, शेतमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून वाढत्या शहरीकरणामुळेही शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवलेली दिसते. त्यामुळे डहाणू भागात शेती करताना, पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितके शेतमजूर उपलब्ध होत नाहीत, ही मोठी समस्या. 200 रुपये प्रति दिवस इतकी मजुरी मिळत असली तरी शेतमजुरांचा कल इतर जास्त कमाई देणाऱ्या कामांकडे अधिक दिसून येतो. पण, अशा सगळ्या परिस्थितीतही बोथरांनी हार मानली नाही. ते त्यांची मुळं आजही डहाणूच्या मातीत घट्ट रोवून तग धरून आहेत.

 

ॅग्रीकल्चरला नाविन्यपूर्ण हॉर्टिकल्चरची जोड देऊन बोथरा याच क्षेत्रात गेली कित्येक वर्ष व्यवसायही करत आहेत. शिवाय, लँडस्केपिंगचेही अनेक सरकारी, खाजगी प्रकल्प ते हाती घेतात. लँडस्केपिंग म्हणजे एखाद्या भागाचे हिरवाईने केलेले सौंदर्यीकरण, सुशोभिकरण. अशाप्रकारे महाराष्ट्रातील आरटीओ अंतर्गत येणारे 22 चेकपोस्ट बोथरांनी विविध फुलझाडे तसेच इतर वृक्षांच्या मदतीने सुशोभित केले आहेत. केवळ डहाणू आणि महाराष्ट्रापुरतेच बोथरांचे हे हरितकार्य मर्यादित नाही, तर छत्तीसगढ, जोधपूर, उदयपूर, वापी, नाशिक, संगमनेर यांसारख्या ठिकाणीही त्यांनी शेती मार्गदर्शन तसेच लँडस्केपिंगचेही काम केले आहे. पण, असे असले तरी प्रगतिशील शेतकरी असलेले बोथरा स्वत: मात्र कुठल्याही आयात-निर्यातीच्या व्यापाऱ्यात नाहीत. मात्र, देशीविदेशी प्रवास करून भारतीय वातावरणातही तग धरू शकतील अशा फळांच्या, फुलांच्या प्रजाती भारतात आणून त्यांची लागवड करायचाही त्यांचा मानस आहे. बोथरांना आपल्या पत्नीचीही या व्यवसायात साथ लाभली असली तरी एकटा माणूस सगळीकडे लक्ष देऊ शकत नसल्यामुळे अॅग्रो टुरिझमचा प्रयोग ते सध्या करत नसले तरी आगामी काळात त्यांना तो करायला नक्की आवडेल, असेही ते सांगतात. अशाप्रकारे शेतीसोबतच सामाजिक जाणिवांच्या शिवारांचीही ते मशागत करतात. त्यांच्या शेतावर भारतकृषक समाज, इनरव्हील क्लब, विविध शैक्षणिक संस्था, महिला मंडळे व सामाजिक संस्थांचे पीक परिसंवाद, मेळावे, भेटी तसेच प्रशिक्षण यांचेही आयोजन केले जाते. 2010-11 साली बोथरांनी फळबाग लागवड व नर्सरी उभी करण्यासाठी बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फळपिकांची कलमे आणि रोपांचे प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. झाडेझुडपे आणि वसुंधरेच्या हिरवळीत रमणारे बोथरा यांनी वृक्षारोपणाच्या कामातही पुढाकार घेतला असून आजवर एक हजार रोपटी त्यांनी शाळांच्या आवारात लागवडीसाठी विनामूल्य बहाल केली आहेत. त्यांच्या एकूणच शेती आणि शेतीसंबंधित मोलाच्या कार्याची दखल घेता त्यांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा या डहाणूच्या ‘ग्रीन मॅन’च्या कर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@