
मुंबईच्या शहरी आणि विक्रमगडच्या दुर्गम वनवासी भागामध्ये तळमळीने सकारात्मक बदल करणारे प्रा. हरेश शहा यांच्या कर्तृत्वाचा आवाका मोठाच म्हणावा लागेल. शिक्षणक्षेत्रामध्ये कार्यरत असताना हजारो युवा विद्यार्थ्यांना सक्रिय समाजशील बनवून त्यांना समाजकार्यात सहभागी करणारे प्रा. हरेश शहा...
स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आपल्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये योगदान देता आले नाही. मात्र, आता देशाला स्थिरता आणि सुबत्ता देण्यासाठी, देशाला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आपण योगदान देऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दा प्रा. हरेश शहा यांच्या जीवनाचे लक्ष्य बनला. हरेश दिवसेंदिवस या विचारांप्रती पोहोचले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपण देशासाठी, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. या देशाचे, समाजाचे ऋण पूर्णतः फिटू शकत नाही, पण अंशतः तरी त्याची परतफेड केली पाहिजे. मात्र, हे करत असताना ‘एकला चलो रे’ ची भूमिका न घेता पुन्हा पंतप्रधानांच्या सांगण्याप्रमाणे ‘सब का साथ, सब का विकास’ ही साधायला हवा. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘मेरा देश नही झुकने दूँगा,’ हिच लक्ष्यपूर्ती असावी, असे हरेश यांनी ठरवले.
डॉ. चंपक शहा आणि उषा शहा यांचे सुपुत्र हरेश. परिस्थिती ‘आहे रे’ गटातली असतानाच हरेश यांच्या मनात ‘नाही रे’ गटातील बांधवांबाबत नेहमीच आपुलकी होती. वडील डॉक्टर असल्याने गरीब रुग्णांची परिस्थितीही त्यांनी पाहिलेली. मुंबईतल्या वस्त्यांचे जीवनही जवळून पाहिलेले. समाजाचे वंचितपण कसे दूर करता येईल, हा विचार त्यांच्या मनात येई. त्यामुळेच की काय जेव्हा कुणीही त्यांना विचारे की, “तुला मोठेपणी काय व्हायचे आहे?” त्यावेळी हरेश म्हणत की,“दुःखी व्यक्तीच्या जीवनात थोडा तरी आनंद आणता येईल, असे काही तरी मला बनायचे आहे.” नुकतेच त्यांच्या ‘मेकिंग अ डिफरन्स फाऊंडेशन’तर्फे विक्रमगड येथे वसतिगृह उभारण्यात आले. वनवासी समाजातील दीडशे विद्यार्थ्यांना येथे निःशुल्क निवास आणि सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. हे वसतिगृह निर्माण करण्यामागचे कारण असे की, हा अतिशय दुर्गम भाग. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांना मैलोन्मैल पायपीट करावी लागे. शाळा दूर आहे म्हणून कितीतरी मुले अर्धवट शिक्षण सोडून देत. यावर उपाय एकच होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या जवळ शाळा आणणे किंवा शाळेजवळ विद्यार्थ्यांना नेणे. त्यासाठी हरेश यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच मग या वसतिगृहाची निर्मिती झाली. अर्थात, वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या खूप संस्था आणि व्यक्तीही आहेत. मात्र, हरेश यांचे वेगळेपण हे की, त्यांनी त्यांच्या लक्ष्यपूर्तीसाठी समाजाचा यशस्वी सहभाग घेतला. चांगल्या कामासाठी समाजाचे योगदान मिळवले. विश्वास मिळवला, जो आजच्या युगात जवळजवळ हरवला आहे. याआधीही हरेश यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेले प्रा. हरेश शहा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विद्यादानाचे कार्य ते गेली २० वर्षे करत आहेत. हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून शिकून गेले. हजारो विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, तरुण मग तो कोणत्याही युगातला असो, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. या उर्जेला सकारात्मक रूप मिळाले, तर त्यातून आशादायक वास्तव उभे राहते. त्यासाठी गरज आहे, ती युवकांना त्यांच्यातील शक्तीची जाणीव करुन देण्याची. त्यातूनच मग त्यांनी पहिल्यांदा १०० विद्यार्थ्यांसमवेत अभिनव उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहा महिने परिसरातील घरांमधून रद्दी झालेली वर्तमानपत्रे गोळा केली. जमा झालेली रद्दी विकून सुमारे एक लाख रुपये जमा झाले. या एक लाख रुपयांचा विनियोग समाजहितासाठी करायचा, हे आधीच ठरले होते. त्यामुळे या श्रद्धानंद महिला आश्रमातील २० मुलींच्या दोन वर्षांचा शिक्षणाचा खर्च या पैशांमधून केला गेला. प्रा. हरेश शहा यांचा हा उपक्रम तरुणाईला भावला. त्यातून शहा यांच्यासोबत समाजशील भाव असलेले तरुण जोडले गेले.
यशाचा मूलमंत्र
"गतिमान समाजाचे विकासशील नीतिमान जपण्यासाठी कार्य करताना माझी प्रेरणा नरेंद्र मोदी आहेत. ‘मेरा देश नही झुकने दूँगा,’ हे त्यांचे वाक्य मला नेहमी प्रेरणा देते. आपला समाज अत्यंत नीतिमान आणि स्नेहशील आहे. चांगल्या कामाला समाज स्वतःहून मदत करतो."
हरेश यांच्यासोबत विद्यार्थी तसेच समाजसेवेसाठी संघटित केलेल्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यातूनच मग अत्यंत वेगळा उपक्रम हरेश यांच्यातर्फे राबवला गेला. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ३६ रेल्वेस्थानकांचा परिसर रंगवणे, २ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या एका आठवड्यात मुंबईतल्या या स्थानकांवर त्या त्या स्थानकाच्या वैशिष्ट्यानुसार चित्र रंगविण्याचे काम प्रा. हरेश शहा आणि त्यांच्या टीमने केले. या कामामध्ये २५ हजार स्वयंसेवक स्वतःहून सहभागी झाले होते. दररोज रात्री ९ ते १ वाजेपर्यंत प्रत्येक स्थानकावर १०० ते १५० लोक जमत. दिलेल्या संकल्पनेनुसार चित्र काढीत, ते रंगवत. त्यामुळे मुंबईच्या रेल्वेस्थानकाचे रूप पालटले. पण, याची आवश्यकता काय होती? तर हरेश यांचे म्हणणे होते की ”पंतप्रधान मोदींनी अत्यंत परिणामकारकरित्या स्वच्छता अभियान लोकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्वच्छता झालीही. हे मोठे यश आहे. पण, लोकांच्या सवयी सहजासहजी सुटत नाहीत. रेल्वेस्थानक, पुलाचे कोपरे, पायऱ्या यांची स्वच्छता जरी केली तरी ती स्वच्छता काही दिवस राहायची. त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पुन्हा हळूहळू तिथे कचरा, अस्वच्छता होई. हे कसे थांबेल? नकारात्मक गोष्ट केवळ दूर सारून फायदा नाही, तर नकारात्मकतेच्या जागी सकारात्मकता निर्माण केली, तरच पुन्हा तिथे नकारात्मकता येणार नाही. त्यामुळे जिथे जिथे घाण, कचरा, अस्वच्छता असेल तिथे तिथे चांगली चित्रे काढली, सुविचार लिहिले तर तिथे वेगळे, सकारात्मक वातावरण निर्मिती होईल. त्यातूनच मग रेल्वेस्थानकाच्या कायापालटाचे काम सुरू झाले. ‘मेरा देश नही झुकने दूँगा’साठीचे हे सुद्धा एक छोटेसे काम आहे. आजही या कायापालट केलेल्या स्थानकांवर स्वच्छताच आढळून येते.”
शहरातील हा उपक्रम अत्यंत धाडसीपणे त्यांनी राबवलाच, पण वनवासीबहुल क्षेत्रामधील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे आणखीही खूप कल्पना आहेत. त्या कल्पना नुसत्या कल्पना न राहता त्यांनी त्यावर कामही करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक म्हणजे वनवासी क्षेत्रातील शाळांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा नसते. या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयोग करता यावेत यासाठी ‘सायन्स हब’ असावा, ही कल्पना. या कल्पनेवरही हरेश यांनी काम सुरू केले. लोकसहभागातूनच अद्ययावत आणि अतिशय महत्त्वपूर्ण ‘सायन्स हब’ विक्रमगड येथे सुरू होणार आहे. या क्षेत्रातील मुख्य समस्या म्हणजे बेरोजगारी. आताच्या युगात केवळ जंगलांवर अवलंबून चालणार नाही, तर कालानुरूप वनवासी बांधवांनी बदलायला हवे. पण नुसते असे बोलून चालणार नव्हते, तर वनवासी बांधवांना नव्या युगातील अर्थार्जनाच्या संधी देणेही आवश्यक होते. त्यासाठी हरेश यांनी कौशल्य विकास योजना सुरू केली. या कौशल्य योजनेतून शेकडो बांधव प्रशिक्षित झाले आणि रोजीरोटी कमवू लागले. आता त्यांना वीटभट्टीवर वेठबिगारी करावी लागत नाही किंवा उपासमारीने तीळ तीळ जगावे लागत नाही. हरेश यांच्या समाजकार्याचा केंद्रबिंदू आहे समाजप्रगतीची कल्पना आणि लोकसहभाग. समाजाला आपल्यासोबत घेत समाजचित्र पालटणाऱ्या हरेश यांच्या कर्तृत्वाची गुढी विलक्षण प्रेरणादायी आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat