कॉम्प्युटरचा मराठमोळा डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2019   
Total Views |


 


कॉम्प्युटर वापरकर्त्यांसाठी आजअॅन्टी व्हायरस’ हा परवलीचा शब्द. परंतु, ज्या काळात कॉम्प्युटरच काचेच्या खोलीत ठेवले जायचे, त्या काळात एका मराठमोळ्या माणसाने अॅन्टी व्हायरसचा शोध लावणे, आपल्या टूल्सचा प्रसार करणे आणि जिद्दीच्या, हिमतीच्या बळावर स्वतःची कंपनी स्थापन करणे, हा चमत्कारच म्हटला पाहिजे. पण, हे सत्यात उतरवून दाखवले कधीकाळी पुण्याच्या एका चाळीत राहणाऱ्या, रेडिओ रिपेरिंग करणाऱ्या अन् मंगळवार पेठेत कॉम्प्युटर रिपेरिंगचे दुकान असणाऱ्या कैलास काटकर यांनी. ‘क्विक हिलया भारतातील सर्वाधिक मोठ्या कॉम्प्युटर क्षेत्रातील कंपनीचे ते संस्थापक.


कैलास काटकर यांचा जन्म पुण्यातला मात्र, वडील साताऱ्यातल्या खटावसारख्या दुष्काळी तालुक्यातील लालगून गाव-भागातले. हाताला काम मिळण्याच्या आशेने ते पुण्याला आले आणि तिथलेच होऊन गेले. शिवाजीनगरच्या न. ता. वाडीत खोली पाहिली. तिथेच कैलास आणि भावंडांचा जन्म झाला. इथेच कैलास यांचे अवघे बालपणच नव्हे, तर वयाची १८-१९ वर्षे चाळीतल्या एका छोट्याशा खोलीत गेली. मात्र, कैलास यांची आई मोठी शिस्तीची. चाळीतल्या मुलांबरोबर राहिल्याने मुलावर चांगले संस्कार होणार नाहीत, काय चांगले, काय वाईट हे कळणार नाही, आयुष्याला वळण लागणार नाही, असा विचार करून कैलास यांना कायम कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवू लागली. परिणामी, घरातले कोणतेही काम असो, अगदी भांडी घासण्यापासून ते रेशनला रांगेत उभे राहण्यासाठी कैलासचे नाव ठरलेलेच असायचे. याचवेळी कैलास यांच्या वडिलांना वाटायचे की, मुलांनी शिकून-सवरून इंजिनिअर व्हावे व नाव कमवावे. म्हणून त्यांनी कैलास व भावडांचेही नाव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. पण, आई-वडील दोघांचेही कमी शिक्षण झालेले असल्याने इंग्रजी माध्यमाचा अभ्यास कोणी घ्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला. मग काय, दरवेळी प्रगतीपुस्तकावर लाल शेरा ठरलेलाच. तेव्हा चांगले गुण मिळावे म्हणून शिक्षकांच्या सांगण्यावरून कैलास व भावंडांनाही शिकवणी लावली. आता शालेय खर्चाबरोबरच शिकवणीचाही खर्च वाढला, तो भागवण्यासाठी वडिलांना जादा काम करणे आलेच.

 

आर्थिक ओढाताणीमुळे, शिकवणीचे पैसे जुळवण्यासाठी वडिलांनी घरी स्क्रिन प्रिंटिंगचे काम करायला सुरुवात केली. मात्र, वडिलांना नेहमीच्या कामातून या कामासाठी वेळच मिळत नसे. म्हणून हे काम कैलास स्वतः करू लागले व त्यांना ते आवडतही असे. दरम्यानच्याच काळात कैलास यांनी नववीनंतर शाळा सोडली. कारण, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घ्यायचे, शिकवणी लावायची, घरी अभ्यास घेणारे कोणी नाही व त्याचा आलेला कंटाळा. शाळा सोडल्याने शिक्षक नाराज झाले, त्यातल्याच एका शिक्षिकेने कैलास यांचे वर्ष वाया जाऊ नये किंवा त्यांचे चांगले आयुष्य घडावे म्हणून त्यांच्या घरची परिस्थिती पाहून कमी फी घेऊन घरी शिकवायला सुरुवात केली. पुढे १८ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी बाहेरून परीक्षा दिली व ते पासही झाले. याचवेळी कैलास यांनी रेडिओ रिपेरिंगची कामे करायला सुरुवात केली. रेडिओ रिपेरिंगमध्ये पैसेही चांगले मिळत असत, पण तरीही त्यांच्या मनात नवीन काही शिकण्याचे कुतूहल होतेच. म्हणूनच पुढे त्यांनी कॅलक्युलेटर दुरुस्तीच्या, पण कमी पैसे मिळवून देणाऱ्या कामाची निवड केली. अन् आपण असे म्हणू शकतो की, हाच कैलास यांच्या आयुष्यात एक ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. कारण, ते जर कॅलक्युलेटर दुरुस्तीकडे वळले नसते, तर आजही एका मोठ्याशा रेडिओ रिपेरिंगच्या वा इलेक्ट्रॉनिक सामान विक्रीच्या दुकानाचे मालक असते फक्त, कंपनीचे नव्हे! रेडिओ रिपेरिंग करणारे बरेच जण होते, तेव्हा आपले काहीतरी वेगळेपण असावे, अशी त्यांची इच्छा होती. कॅलक्युलेटर दुरुस्तीचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली व ते संबंधित ठिकाणी जाऊ लागले. इथूनच कैलास यांचा डिजिटल विश्वात प्रवेश झाला.

 

 
 

कॅलक्युलेटर दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी कैलास यांचा संबंध मेकॅनिकल मशीन्स, लेझर पोस्टिंग मशीनशी आला व ते शिकायलाही मिळू लागले. अर्थात हे सगळेच ते स्वतः शिकले. कोणी शिकवले नाही की कसला कोर्सही केला नाही. पण म्हणतात ना, शिकण्याची आस असली तर काहीही होऊ शकते. या कामातूनच कैलास यांची कॉम्प्युटरशी ओळख झाली. त्याचाही एक किस्सा आहे. कॅलक्युलेटर किंवा लेझर पोस्टिंग मशीन दुरुस्तीसाठी ते बँकेत गेले, त्यावेळी त्यांना तिथे काचेच्या खोलीत कॉम्प्युटर नामक यंत्र दिसले. एवढ्या बंदोबस्तात ठेवलेले हे यंत्र काय, हा प्रश्न त्यांना पडला व तो त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला. अधिकाऱ्याने माहिती दिली, ती ऐकून कैलास अचंबितही झाले आणि असुरक्षितही! कारण आपण सध्याच्या घडीला दुरुस्त करत असलेली सगळ्याच यंत्रांची कामे कॉम्प्युटरच्याच साह्याने होऊ शकतात, हे त्यांना समजले. मग आपण आता जे काही दुरुस्त करतो, त्यांचे तर काहीच भविष्य नसेल, ही यंत्रे संपून जातील आणि यंत्रच नसतील तर दुरुस्ती कशाची करणार? याच असुरक्षिततेच्या आणि नाविन्याच्या, कुतूहलाच्या संमिश्र अशा भावनेने कैलास यांनी कॉम्प्युटर शिकण्याचा चंग बांधला. अर्थात नवीन आलेल्या कॉम्प्युटरचे शिक्षण काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते, जे काही शिकायचे, ते स्वतःच. म्हणून कैलास यांनी कॉम्प्युटरची पुस्तके आणली, वाचली व त्यातूनच ते शिकत गेले आणि कॉम्प्युटर दुरुस्तीच्या क्षेत्रात उतरले. कैलास यांनी जेव्हा कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम सुरू केले, तेव्हा संपूर्ण पुण्यात १५-२० लोक हे काम करत असत. सर्वांच्यात परस्पर व्यावसायिक सामंजस्य असल्याने जी व्यक्ती एखाद्या पार्टच्या दुरुस्तीच्या कामात एक्स्पर्ट असे, त्याच्याकडे ते पाठवून दिले जाई. पण, तेव्हाही कैलास यांना आपल्यात या सर्वांव्यतिरिक्त काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असावे, असे वाटू लागले.

 

अशातच कॉम्प्युटर व्हायरसनेही या क्षेत्रात उच्छाद मांडला होता. स्वतः कैलास यांच्या कॉम्प्युटरलाही व्हायरसचा प्रॉब्लेम येतच असे. मात्र, कैलास यांचे धाकटे भाऊ संजय ज्यावेळी कॉम्प्युटर हाताळत, त्यावेळी तो व्यवस्थित चालत असे. हे कसे? हा प्रश्न कैलास यांना पडला व त्यांनी तो भावाला विचारला. तेव्हा संजय यांनी सांगितले की, “कॉम्प्युटर इन्फेक्टेड असतात, पण मी त्यातले व्हायरस मॅन्युअल टूल्सच्या साह्याने काढतो. ते ऐकल्यावर कैलास यांच्या मनात एक कल्पना चमकून गेली की, हाच व्हायरसचा, इन्फेक्टेड कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम माझ्या ग्राहकांनाही येतो, त्यांचा प्रॉब्लेम या मॅन्युअल टूलच्या साह्याने सोडवला तर?” अन् विशेष म्हणजे संजय यांनी शोधलेले हे टूल्स कॉम्प्युटरची डेटा फाईल तशीच ठेवून केवळ व्हायरसच डिलीट करत असे, जे तत्कालीन अॅन्टी व्हायरसपेक्षा आधुनिक होते. झाले. ठरले, या टूल्सच्या वापरातून आपल्या ग्राहकांनाही सेवा देण्याचे कैलास यांनी निश्चित केले. मग काय, संजय यांनी अशा १५-२० निरनिराळ्या व्हायरससाठी किंवा प्रॉब्लेमसाठी वेगवेगळे टूल्स तयार केले व कैलास यांनी ते आपल्या ग्राहकांच्या प्रॉब्लेम्सवेळी वापरले. खरे म्हणजे हीच सुरुवात होती, एका मोठ्या कंपनीची!

 

यशाचा मूलमंत्र

 

"कोणतेही काम करतेवेळी ते ग्राहककेंद्री असणे सर्वात महत्त्वाचे असते. ग्राहकाला काय हवे, हे ओळखता आले पाहिजे; अन्यथा ज्याला मागणीच नाही, खरेदीदारच नाही, अशी कितीही चांगली गोष्ट तुम्ही तयार केली तरी ती कोणी घेणार नाही. असे केल्यास अपयशाची संधीच नसते. म्हणूनच ग्राहककेंद्री काम कैलास काटकर यांच्या आयुष्याचा मूलमंत्र ठरला व ते यशस्वीही झाले."

  

संजय यांनी शोधलेले टूल्स फ्लॉपी डिस्कमध्ये टाकून कैलास आपल्या ग्राहकांकडे जात. टूल्सच्या वापराने अन् कोणतीही फाईल डिलीट न होता व्हायरस डिलीट होत असल्याने अल्पावधीतच ते लोकप्रिय ठरले. याचवेळी १९९४च्या अखेरीस संजय यांनी व्हायरसच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून टूल्स बाजारात आणले. यातूनच ‘क्विक हिल’ कंपनीची संकल्पना मांडली गेली व त्यांचा पहिला क्लायंट होता ‘टाइम्स ऑफ इंडिया.’ तेव्हा कैलास यांनी विचार केला की, हे काम आपण फक्त पुण्यात करतोय, पण असेच प्रॉब्लेम्स अन्य ठिकाणीही येत असतीलच की! पण त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकवेळी एकटे कैलास जाऊ शकत नव्हते. त्यासाठी आवश्यकता होती सहकाऱ्यांची. मग जसजसे हे टूल्स सर्वांना समजत गेले तसतसे कामही वाढत गेले. मग कंपनीची पहिली शाखा नाशिकमध्ये सुरू करण्यात आली. नंतर नागपूर, इंदोर असे काम वाढत गेले. आज ‘क्विक हिल’च्या संपूर्ण भारतात २६ शहरांत शाखा आहेत व त्यातून आजूबाजूच्या १५-२० शहरांत सेवा दिली जाते. शिवाय कंपनीचे जगातल्या ४० देशांत डिस्ट्रिब्युटर्स आहेत आणि टोकियो, दुबई, अमेरिका, केनिया इथेही कार्यालये आहेत. आज १३०० पेक्षा अधिक कर्मचारी इथे कार्यरत असून २०१६ मध्ये कंपनीने आयपीओदेखील बाजारात आणले.

 

दुसरीकडे कैलास काटकर केवळ कंपनी सुरू करूनच थांबले नाहीत, तर आपण समाजाकडून घेत आलो म्हणून समाजाचे देणे लागतो, ही भावनाही त्यांच्या मनात जागली. मग ‘क्विक हिल फाऊंडेशन’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील कातकरी वनवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले जाऊ लागले. सोबतच ‘शाळांगण प्रकल्पा’तून शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण, एचआयव्ही-एड्सची माहिती व लाइफ स्किल प्रोजेक्टच्या साह्याने कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. याबरोबरच सायबर सिक्युरिटी अवेरनेसचा उपक्रमही राबवला जातो. शिवाय कैलास काटकर कंपनीव्यतिरिक्त वैयक्तिक स्तरावर आपले मूळ गाव लालगून आणि खटाव व परिसरातील नागरिकांचे शहरांकडील स्थलांतर थांबावे, शेतीसह पूरक उद्योगांतून आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणूनही काम करतात.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@