चाकोरीबाहेरचा अभिजात 'अभिजीत'

    05-Apr-2019
Total Views |


 


“तुमचे तुमच्या मुलाकडे लक्ष आहे का?,” असे सांगत ‘रेगे’ साकारणारा, पहाडाएवढे कर्तृत्व असलेल्या बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक भूमिगत कामे मार्गी लावणारा आणि ठाकरेंवरील चित्रपटाचे शिवधनुष्य पेलणारा असा हा ईश्वर न मानणाऱ्या वडिलांचा प्रचंड सश्रद्ध बंडखोर मुलगा, झी टीव्हीवरील हल्ला, राज ठाकरेंना ‘रिप्लेस’ करणारा भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख ते आता ‘राज’ कारण करत असलेला मनसे नेता. सिद्धहस्त लेखक, दिग्दर्शक अभिजीत पानसे...


‘ठाकरे’ चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. दस्तुरखुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत चित्रपटाची घोषणा झाली आणि वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरू लागले. शिवसेनाप्रमुखांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन मनसे नेता करत होता. धक्के आणि नाट्यमयता हे कदाचित अभिजीत पानसे यांचे जीवनसंचित असावे. शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचा हा द्वाड मुलगा. लहानपणापासूनच अभिजीतला चाकोरी तोडण्याचा छंद असावा. आईवडील दोघेही शिक्षक. आजी अहिल्याताई रांगणेकर, सुशीलाबाई पानसे यांच्या सोबतीने समाजकार्यात रंगलेल्या, तर तिकडे आजोळी सगळं घराणच संगीतसेवेत रममाण झालेलं. वामनराव देशपांडे, पंडित सत्यशील देशपांडे, सहदेशपांडे अशा दिग्गजांची मांदियाळी आजोळी असे. घरात हजारो पुस्तकांचा खच. सुरेश भट, वसंत बापट, शंकर अभ्यंकर, सोपानदेव चौधरी, माधव गडकरी, नारायण सुर्वे, चंदर वैद्य, मनोहर जोशी अशा दिग्गज मंडळींचा वावर पानसेंच्या घरी नेहमीच असायचा. भाऊ पुष्करराज पानसे एकदमच स्कॉलर. सगळ्याच क्षेत्रात तो सर्वोत्तम असे. अभिजीत मात्र स्वत:च्या अटींवर जगणारा. अभ्यासापेक्षा मैदानात रमणारा. वयाची १७ वर्षे हनुमान व्यायामशाळेच्या मैदानात त्याने घालवली. आयुष्यात लढा देण्याचे बळ कदाचित त्या व्यायामशाळेच्या मातीने शिकवले असावे. खेळातील रोजच हरणं-जिंकणं जसा अभिजीत पचवत होता, तसेच आयुष्यात हरण्याची मानसिकता आणि जिंकण्यातील जल्लोष संयमीपणे पचविण्याचे धाडस या मातीतून अभिजीतला मिळाले.

 

अभिजीत मूळचा ठाणेकरच. शिक्षक असलेल्या आईवडिलांपैकी वडिलांनी आपल्या वयाच्या 50व्या वर्षी एसएनडीटीतील आपली नोकरी एकाएकी सोडली. संध्याकाळी घरी आले आणि सांगितले, “आजपासून मी नोकरी सोडली.” तेव्हा अभिजीत जेमतेम सातवीत होता. कुटुंबासाठी हा निर्णय तसा अनाकलनीय होता. शिक्षणक्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे काही काम करावे, या ध्येयाने रमेश पानसे प्रेरित झाले होते. अनुताई वाघ या शिक्षणविदुषीच्या कामाला पुढे नेण्यासाठी पानसेंनी थेट कोसबाड गाठले. पुढे ‘ग्राममंगल’चे काम उभे केले. हे करत असताना अभिजीत बेडेकर विद्यामंदिरातून दहावी उत्तीर्ण झाला. मो. ह. विद्यालयात अकरावी-बारावी केले. पुढे रुईयातून पदवीधर झाला. मात्र, या सर्व प्रवासात अभिजीत यांना समजून घेणारं जग घरापेक्षा बाहेर जास्त होतं की काय, इतका अभिजीत घराबाहेरच आपले स्वतंत्र अस्तित्व उभे करू लागला. त्या काळात नुकतेच टी.व्ही., केबल सुरू झाले होते. त्या केबल टीव्हीवर लोकल न्यूजदेखील लागत असत. या लोकल न्यूजमध्ये दर्जात्मक जाहिरात सुरू करण्याचा पायंडा अभिजीत पानसे यांनी पाडला. ‘केबल अ‍ॅडव्हर्टायझिंग’ या क्षेत्रातील अभिजीत पानसे हे ‘पायोनिअर’ म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मो. ह. विद्यालय असो, रुईया असो की, ठाण्यातील नाका असो, अभिजीतने त्याच्यासोबत सर्वच क्षेत्रातील तरुणांची मांदियाळी उभी केली होती. अनेकवेळा तर अभिजीतच्या नेतृत्वाखाली लहान-मोठ्या भांडणांचे न्यायनिवाडे होत असत. ठाणे-मुंबईपुरताच मर्यादित न राहता अभिजीतने या काळात महाराष्ट्रातील अनेक तरुणांना लोहचुंबकासारखे आपल्याकडे आकर्षित केले होते आणि हीच ताकद लक्षात घेऊन अभिजीतच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. तिथेदेखील अभिजीतने ‘किंगमेकर’चीच भूमिका बजावली. ‘काका मला वाचवा’, या कार्यक्रमाच्या निषेधार्थ काही प्रसारमाध्यमांवर जे हल्ले झाले, त्यानंतर महाराष्ट्रात ‘अभिजीत पानसे’ या नावाचा गवगवा सुरू झाला. इतका की, थेट राज ठाकरेंना अभिजीत पानसे यांनी शिवसेनेत रिप्लेस केले. राज ठाकरे यांच्या जाण्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद अभिजीत पानसे यांनी सांभाळले. अभिजीत पानसे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांची पितृवत माया होती. राज ठाकरे यांच्या ‘एक्झिट’नंतर जी तरुण पिढी शिवसेनेपासून लांब जाण्याची भीती होती, ती भीती अभिजीत यांच्या कर्तृत्वाने खोटी ठरली. मात्र, अभिजीत कधीच कुणाच्या व्यक्तिगत रागाच्या फंदात अडकले नाहीत आणि म्हणूनच ‘ठाकरे’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाला उद्धव ठाकरेंबरोबरच राज ठाकरे यांनीदेखील हिरवा कंदील दिला.

 

 
 

जातिवंत कलावंत असलेला हा प्रचंड क्षमतेचा माणूस कला, क्रीडा आणि राजकारणामध्ये लिलया वावरत राहिला. स्वत:ला ‘उद्धव सैनिक’ म्हणवून घेणार्‍या या कडव्या शिवसैनिकाला पुढे काही कारणास्तव जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला, तेव्हा राज ठाकरे यांनी या हिर्‍याला आपल्या कोंदणात घेतले. तेव्हादेखील सर्व प्रसारमाध्यमांमध्ये ‘ब्लू आय बॉय एम्पटेड मातोश्री’ मथळ्याच्या बातम्या झळकल्या. टिळक विद्यापीठातून एम.ए. करण्यासाठी पुण्यात दाखल झालेला हा कलावंत अभ्यासात रमण्याऐवजी कलाक्षेत्राकडे वळला. बालपणी शाळेत तसेच महाविद्यालयातदेखील नाटक, एकांकिकेच्या मुशीतून या कलावंताच्या कलेला धुमारे फुटत होते. त्याची झलक, “तुमच्या मुलाकडे तुमचे लक्ष आहे का?” असे सांगत आलेल्या ‘रेगे’ नावाच्या अद्वितीय चित्रपटातून महाराष्ट्राला पाहायला मिळाली. ज्ञानेश्वरांपासून ते रॉय किणीकरांपर्यंतच्या कवितांचा अभिजीत निस्सीम चाहता. स्वत: सिद्धहस्त कवी असलेला अभिजीत नेहमीच परखडपणे आणि थेट व्यक्त होतो. आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाची माणसं अभिजीतची मित्रमंडळी. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचं संचितदेखील अभिजीतला सतत मिळत राहीलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट साकारत असताना अभिजीतमधील सैनिक, कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, कवी ताकदीने महाराष्ट्राला पाहायला मिळाला.

 

यशाचा मूलमंत्र

 

"आयुष्यात खेळ खूप महत्त्वाचा असतो. खेळाने जिंकण्याची आणि हरण्याची प्रेरणा मिळते. हारणं आणि जिकणं कधीच चिरकाल नसतं. आज हारलेला उद्या जिंकू शकतो आणि आज जिंकलेला उद्या हरू शकतो. हे समजणे हेच यशाचे खरे संचित आहे. त्यातून निरोशला दूर सारता येतं. जग डोळे उघडून जगायला हवं आणि स्वत:वर तसेच चांगुलपणावर विश्वास ठेवायला हवा."

 

लौकिकार्थाने अभिजीत हा कधीही राजकारणी भासला नाही. त्याच्यातील राजकारण्यावर नेहमीच कलाकाराने बाजी मारली. आज अभिजीत मनसेतील पहिल्या फळीतील नेता समजला जात असताना दुसरीकडे भारतातील सर्वोकृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत अभिजीतचे नाव आहे. राजकारणी, कलावंत याचबरोबर समाजकारणी म्हणूनदेखील अभिजीत तितकाच संवदेनशील. पुरात बुडालेला ‘अभिनय कट्टा’ नव्या दमाने उभा करणारा अभिजीत, सिग्नल शाळेत नाट्यशास्त्राचे धडे देणारा अभिजीत, दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात दौरे करणारा अभिजीत, महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांवर लघुपटांची मालिका साकारणारा अभिजीत अशी अभिजीतची अनेक सामाजिक रूपे पाहायला मिळतात आणि मग वाटतं, दगडी चाळीत थेट अरुण गवळीशी संवाद साधणारा अभिजीत खरा, बाळासाहेब ठाकरे यांचा पट्टशिष्य अभिजीत खरा, ‘रेगे’, ‘ठाकरे’ साकारणारा दिग्दर्शक अभिजीत खरा, ‘नाम’च्या जलसंधारणात अल्प-स्वल्प योगदान देणारा अभिजीत खरा की ‘ग्राममंगल’ शिक्षणविषयक संस्थेच्या उभारणीत खंबीरपणे उभा राहणारा अभिजीत खरा? इतकी अभिजीतची नानाविध रूपे तितकीच अनाकलनीय आहे. अभिजीतने ‘शांतिनिकेतन’च्या धर्तीवर शिक्षण क्षेत्रातील ’क्रांतीनिकेतन’चे स्वप्न बाळगले आहे. मनसेच्या कागदावरच्या ब्लू-प्रिंटपेक्षाही अभिजीतच्या खोल काळजात रेखाटलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्त वास्तवदर्शी वाटतो. महाराष्ट्रातील हा अवलिया तरुण ज्या सहजपणे विविध भूमिका ताकदीने साकारतोय, त्या पाहता अनेक तरुणांना आशादायी असायला हरकत नाही, असेच म्हणावे लागेल.

 

 

 - भटू सावंत
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat